प्रत्यक्ष दीस म्हणू कसा तुला
माझ्या सीमांची जाणीव आिे मला।
डोळे दिपवतो सूर्य माझे
सहन होईल कसे तेज तुझे॥ १॥

अति अरुंद माझी नजर
विराट तू डोळ्यांत कसा मावणार।
दृष्टी माझी अपुरी पाहायला अणूरेणू
सूक्ष्माहून सूक्ष्म तू पुरेसे भिंग कुठून आणू॥ २॥

न दिसते ते असते न असते ते दिसते
भ्रम आणि वास्तव मला कुठे उमजते।
माझ्या सीमांची जाणीव तुलाही आहे
म्हणूनच का सर्वत्र विखरून राहिला आहेस?॥ ३॥

तुझ्या रूपाची साक्ष जीव-जीवाणू
जसे तुषारांतुन दिसते इंद्रधनू ।
वाऱ्याच्या झुळकेत अन् फुलांच्या सुवासात
तूच तर दडला आहेस सौम्य स्वरूपात॥ ४॥

ममतेचे पाझर, कल्पनेची फेक
प्रतिभेचा आविष्कार तुझ्या चैतन्याची झाक।
जरी भासत राहतोस साऱ्या आसमंतातून
जसा गंधार उमटे सुरेल तंबोऱ्यातून ॥ ५॥

एक मागणे मागतो मला नि:सीम होऊ दे
तुला प्रत्यक्ष पाहण्या बळ अंगी येऊ दे।

Similar Posts