किमया

किमया

वैशाखातील संध्या होती
संधिप्रकाश विरत होता
मावळतीवर खिन्न लालिमा
विझण्या आधी रेंगाळत होता II१II

क्षितिजावरचा निरोप सोहळा
मेघांनी आच्छादित होता
मावळतीला धीर द्यावया
शुक्र पिवळसर तेवत होता II२II

दूर उभ्या त्या वृक्ष-तरूंच्या
गर्द, स्तब्ध अन गूढ आकृत्या
त्यांच्यामधुनी रातकिड्यांचा
आर्त मारवा क्रंदत होता II३II

होडी मनाची उर्जे वाचून
अथांग, विषण्ण सिंधूत हरवली
कातरवेळी काहूर, हुरहूर
यांच्या लाटांवर डगमगली II४II

तशात अवचित श्रांत तनूला
सुखद वायूचा स्पर्श जाहला
आणि त्याच्यासवे चहूकडे
निशिगंधाचा गंध पसरला II५II

नजर वळविता शुभ्र फुलांची
चादर जशी चांदण्यात भिजली
असे वाटले मला रिझविण्या
नक्षत्रे भूवरी उतरली II६II

अन पूर्वेला चमकत होते
गोरसरंगी चंद्रबिंब ते
त्याच्या मृदू तेजावर भाळून
तिथे नभांगण निरभ्र होते II७II

काहूर शमले, मन मोहरले
पाहून अविष्कार निसर्गाचा
चांदणे, एकांत अन परिमळ
बनला अनुभव अति मोलाचा II८II
– सुरेश गोपाळ भागवत (०१/६/२०२३)

Similar Posts

  • बळ अंगी येऊ दे

    प्रत्यक्ष दीस म्हणू कसा तुला माझ्या सीमांची जाणीव आिे मला। डोळे दिपवतो सूर्य माझे सहन होईल कसे तेज तुझे॥ १॥ अति अरुंद माझी नजर विराट तू डोळ्यांत कसा मावणार। दृष्टी माझी अपुरी पाहायला अणूरेणू सूक्ष्माहून...
  • जागेचं महत्व

    आयुष्यात अक्षांश-रेखांशाचं महत्व आता जास्त जाणवू  लागलंय योग्य जागेवर असणारे म्हणजे भाग्यवान असं वाटू लागलंय   II१II तिकडे रॉकेट्सचा पाऊस पडतोय जमीन भिजतेय रक्तानं रडणाऱ्यांचे आक्रोश थांबतायत उगी राहिल्यानं नाही, तर जीव गेल्यानं II२II इकडे पाऊस…

  • नववर्ष २०२१

    नववर्ष २०२१ नवं वर्ष येतं आहे त्याशी नातं जोडा काय होणार, कसं होणार याची काळजी सोडा II१II कोविड साथ शमते आहे मेंदूचा लॉकडाउन काढा हे नाही, ते नाही वाचू नका पाढा II२II नको वांगी पुराणातली...
  • पुढे कसे जाणार ?

    पुढे कसे जाणार ? काळ पुढे जातो, वय पुढे जाते आपणही तेच करायचे आहे भूतकाळात न अडकता प्रगतीच्या वाटेने जायचे आहे II१II डोळे समोर आहेत त्यातून धडा घ्यायचा आहे जमेल त्या मार्गाने पुढे काय याचा...
  • अशी उसनवारी नको

    अशी उसनवारी नको जयकरांची पिंकी आणि रेडकरांचा वरुण एकमेकांना ओळखत होते दोन वर्षांपासून वरून होता विशीत आणि पिंकी असेल अठराची कॉलेज मधे त्यांची नेहमी गाठ पडायची एके दिवशी वरुणने तिला व्हिडिओ पाठवला सुंदर कवितेत प्रेमाचा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *