पुढे कसे जाणार ?

काळ पुढे जातो, वय पुढे जाते
आपणही तेच करायचे आहे
भूतकाळात न अडकता
प्रगतीच्या वाटेने जायचे आहे II१II

डोळे समोर आहेत
त्यातून धडा घ्यायचा आहे
जमेल त्या मार्गाने
पुढे काय याचा वेध घ्यायचा आहे II२II

इतिहास तर अमूल्य आहे
पण ते पूर्वजांचे वर्तमान होते
आपल्यासाठी आता
वेगळे वर्तमान तयार आहे II३II

संग्रह, संग्रहालये मन रिझवतात
म्हणून काय कोणी त्यातच रहातात?
भूतकाळात खोलवर मुळे असतात
त्यावर आपण वृक्ष फुलवायचे असतात II४II

कित्येक देश गेले पुढे
दौडवून तंत्रज्ञानाचे घोडे
आपणच का राहायचे मागे
कवटाळून आठवणींचे गाठोडे? II५II

मागे पाहावे सिंहावलोकना पुरते
भवितव्यावर नजर असेल तो तरणार
नुसते मागेच बघत राहिलो
तर पुढे कसे जाणार? II६II
-सुरेश गोपाळ भागवत (२०/४/२०२३)

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *