एकदा एका माणसाला
कोड्याचा नाद लागला
साधे बोलायचे सोडून
कोड्यात बोलायला लागला   II१II

कुणीतरी त्याला नाव विचारले
म्हणाला “आडनाव वेडेच्या विरुद्ध असलेले
माझे नाव चार अक्षरी
तेज मोजण्याच्या पलीकडे असलेले”   II२II

गेला किराणा दुकानात
आणि मागणी केली जोरात
“एक किलो सारांश द्या
पण आकाश हवे त्याच्या आत”  II३II

पाहिली बागवानाच्या गाड्यावर

फळे रसाळ आणि सुंदर

म्हणाला “चांगलेसे बघून द्या

आधी खिल्ली पुढे आदर”  II४II
एकाचे मन दुसऱ्यासाठी
एक कोडेच असते
आणखी कोड्यात बोलल्याने

सारेच अगम्य होते    II५II
कोडे करमणुकीला छान
पण व्यवहारात काय कामाचे ?
वागण्यात आणि बोलण्यात
स्पष्टता असणे महत्वाचे   II६II

(कोड्यात बोलला त्याचा अर्थ : आडनाव -शहाणे, नाव -अमिताभ, किराणा दुकानात मागितलेली वस्तू – साखर, बागवानाला मागितलेली वस्तू -टरबूज.)

Similar Posts