किमया
वैशाखातील संध्या होती
संधिप्रकाश विरत होता
मावळतीवर खिन्न लालिमा
विझण्या आधी रेंगाळत होता II१II
क्षितिजावरचा निरोप सोहळा
मेघांनी आच्छादित होता
मावळतीला धीर द्यावया
शुक्र पिवळसर तेवत होता II२II
दूर उभ्या त्या वृक्ष-तरूंच्या
गर्द, स्तब्ध अन गूढ आकृत्या
त्यांच्यामधुनी रातकिड्यांचा
आर्त मारवा क्रंदत होता II३II
होडी मनाची उर्जे वाचून
अथांग, विषण्ण सिंधूत हरवली
कातरवेळी काहूर, हुरहूर
यांच्या लाटांवर डगमगली II४II
तशात अवचित श्रांत तनूला
सुखद वायूचा स्पर्श जाहला
आणि त्याच्यासवे चहूकडे
निशिगंधाचा गंध पसरला II५II
नजर वळविता शुभ्र फुलांची
चादर जशी चांदण्यात भिजली
असे वाटले मला रिझविण्या
नक्षत्रे भूवरी उतरली II६II
अन पूर्वेला चमकत होते
गोरसरंगी चंद्रबिंब ते
त्याच्या मृदू तेजावर भाळून
तिथे नभांगण निरभ्र होते II७II
काहूर शमले, मन मोहरले
पाहून अविष्कार निसर्गाचा
चांदणे, एकांत अन परिमळ
बनला अनुभव अति मोलाचा II८II
– सुरेश गोपाळ भागवत (०१/६/२०२३)