अशी उसनवारी नको

जयकरांची पिंकी आणि रेडकरांचा वरुण
एकमेकांना ओळखत होते दोन वर्षांपासून
वरून होता विशीत आणि पिंकी असेल अठराची
कॉलेज मधे त्यांची नेहमी गाठ पडायची

एके दिवशी वरुणने तिला व्हिडिओ पाठवला
सुंदर कवितेत प्रेमाचा विषय होता गुंफला
मन जडलंय तुझ्यावर धरलाय त्यानं हेका
तुला एक विचारायचंय, माझी होशील का?

व्हिडीओ पाहून पिंकी गालातल्या गालात हसली
प्रेमानं सुखावली नाही तर तरुण मुलगी कसली!
पण पिंकी होती हुशार, तिला पटकन आठवलं
दोन दिवसांपूर्वी दुसऱ्या मित्रानं पत्र होतं लिहिलं

त्यानंही अप्रतिम कविता होती पाठवली
सुंदरश्या उपमा आणि विशेषणांनी नटलेली
पिंकीनं दोन्ही समोर समोर धरल्या
गम्मत अशी की, नव्वद टक्के सारख्याच भरल्या!

झाला प्रकार पिंकीच्या लक्ष्यात आला
तिनं दोघांनाही मेसेज पाठवला
मला नक्कीच नकोय चॅट जीपीटी कवी
अक्कल फार नसली तरी चालेल, पण स्वतःची हवी

Similar Posts