नच आठवते नक्की केंव्हा
असाच अनुभव आला होता
असाच होता प्रवास तेंव्हा
सौम्य ताप अन सौम्य आर्द्रता II१II
स्पर्श होई क्षितिजास दृष्टीचा
खुलून दिसे प्रत्येक रंग
सुखद वाटे संपर्क हवेचा
जसे जिभेला खाद्य खमंग II२II
तिरके कोवळे किरण उन्हाचे
उजळले शेत पाचूच्या छटांचे
उभवून गुच्छ सरळ पानांचे
ऊस झेलतो कण ऊर्जेचे II३II
नभाच्या निळाईस नक्षी खडीची
भुरे पांढरे कापसाचे ढिगारे
टिपया तजेला, लज्जत क्षणांची
हवा स्तब्ध झाली, स्थिर झाले वारे II४II
दूर कुठेसे साग वृक्ष ते
पुष्प -तुऱ्यांचे आले भरते
फुल तयाचे जणू लाजते
हिरवाईतच लपु पाहते II५II
कुठे उतावीळ सोनमोहर तो
सर्वां आधी हळू मोहरतो
निरोप घेण्या नाखूष दिसतो
गुलमोहर तो अजून फुलतो II६II
कुठे सुबकश्या घराभोवती
गायी, वासरे निवांत चरती
जसे आरसे तश्या चमकती
स्वच्छ घरांची छपरे, भिंती II७II
असतील अनेक दशके सरली
देखावा परि तसाच दिसतो
कांही क्षण स्थळ, काळ परतली
मी ही तन्मय बालक होतो II८II
-सुरेश गोपाळ भागवत, १४/१०/२०२४.