क्षितीजाच्या रेषेखाली गडद केशरी सूर्य बुडाला

कालौघाच्या तीरावरचा एक बावटा मागे पडला

निर्गुण, निरव, निरंतर काळाचा हा प्रवाह वाहे

उगम कुठे अन कुठे चालला हे ही कुणाला नच ठावे

सरितेसम तो प्रवाह वाहे अमूर्त जल, आभासी रंग

कुणी असती त्यावर लहरी, कुणी असती सूक्ष्म तरंग

आकार घेती आणि विरती प्रत्येकाचे कर्म जसे

भाग्यवंत कुणी क्षणिक चमकती जलपृष्ठावर जसे कवडसे

घेऊन येईल नवीन ऊर्जा पुन्हा सकाळी सूर्य उद्याचा

आपण त्याला बहाल करू या नव्या खुणेची नवी पताका

काळ आणि जाणीव या दोन अमूर्तांची  जादू असे

घुसळून त्यांना आयुष्याचा प्याला सुखाने भरतसे

गतवर्षातील उत्तम सारे शिदोरीत बांधून घेऊ

नववर्षाच्या प्रवासात या हर्षाने सामील होऊ

पूर्वजांच्या सत्कर्मांची आपण उपभोगतो फळे

पिढी दर पिढी विणले जाते जाणिवांचे घट्ट जाळे

आपणही  विणूया जाळे कांही धागे त्यात भरू

हितचिंतनाने सर्वांच्या नववर्षाची सुरवात करू

                     -सुरेश गोपाळ भागवत (३१/१२/२०२४)

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *