रोग वेव्ह
मंत्रीसाहेब त्यांच्या न थकता काम करत राहण्यासाठी प्रसिद्ध होते, परंतु आजच्या कामकाजाने त्यांना दमवले होते. प्रशासकीय कामे, राजकीय चर्चा, मुलाखती हे सर्व दिवसभर सुरु होते. प्रत्येक कामात ठरल्या पेक्षा थोडा जास्त वेळ लागल्याने काम उशिरापर्यंत सुरु होते. शेवटचे चर्चेसाठी आलेले प्रतिनिधी मंडळ निघून गेल्यावर ते खुर्चीत मागे रेलून बसले. समोरच्या आजच्या दिवसभराच्या कार्यक्रमाच्या यादीच्या शेवटी एक हाताने लिहिलेली ओळ होती : अमित तातडीचे निवेदन, ७.३० ते ७.३५. हस्ताक्षर त्यांच्या स्वीय सचिवाचेच होते. मंत्रीसाहेबांना आपल्याच कार्य प्रणालीचे हसू आले. तातडीचे निवेदन दिलेला वेळ पाच मिनिटं ! तोही टळून गेल्याला दोन तास झाले होते. तेव्हढ्यात स्वीय सचिव आत आला, मंत्रीसाहेब म्हणाले “तू सकाळी मला घाईत असताना वेळ देऊ का विचारलंस खरं, पण मला फारसा उलगडा झाला नाही”.
“सर, हा माझ्या दूरच्या नातलगाचा कॉलेज मध्ये जाणारा मुलगा आहे, गेले दोन दिवस माझा नातलग मला सारखा फोन करतो आहे की हा मुलगा गेले कांही दिवस अतिशय बेचैन आणि घाबरलेला आहे, आणि त्याला तुम्हाला कांही सांगायचंय” सचिव म्हणाला.
“अरे, त्याला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडं घेऊन जायचं” मंत्री साहेब म्हणाले.
“सर, तो दुसऱ्या कोणाशीही बोलायला तयार नाही, तुम्ही सर्वात वरिष्ठ म्हणून त्याला तुमच्याशी बोलायचं आहे, फक्त पाचच मिनिटं हवी आहेत त्याला” सचिव म्हणाला. ” ठीक आहे, येऊ दे त्याला” मंत्रीसाहेब म्हणाले.
सचिव बाहेर गेला आणि मिनिटा भरातंच अमितला घेऊन आत आला. अमित दबक्या पावलांनी मंत्रीसाहेबांच्या टेबल पर्यंत गेला आणि मागे हात बांधून उभा राहिला.
” ये मुला, बैस इथे खुर्चीवर, काय निवेदन करायचे आहे तुला? ” मंत्रीसाहेबांनी विचारले.
“सर, माझं कांही वैयक्तिक निवेदन किंवा मागणी नाहीये, मला अभ्यासाचा प्रोजेक्ट करता करता जी जाणीव झाली, ते तुमच्या कानावर घालायचं आहे” अमित एका दमात म्हणाला.
“तू एव्हढा दडपणाखाली असल्यासारखा का वागतो आहेस? आता तुला वेळ दिलेला आहे, जे निवेदन आहे ते व्यवस्थितपणे मांड” मंत्री साहेब म्हणाले.
“सर, मला खूप भीती वाटते आहे आणि हे इतरांना सांगितलं तर त्यांनाही त्रास होईल म्हणून मी कुणाशी बोललो नाही. मी कॉलेज मध्ये प्रोजेक्टसाठी त्सुनामी हा विषय घेतला होता. कॉम्पुटर सिमुलेशन करून दाखवायचं होतं. त्याच्यासाठी इंटरनेटवर वाचता वाचता मी समुद्री लाटांचा अभ्यास केला. त्यात मला असं समजलं की समुद्रात महाकाय लाटा अचानक उसळतात” अमित म्हणाला.
“”बरं, मग! अशा लाटा आपल्या जवळपास निर्माण होतील अशी भीती वाटतेय का तुला?” मंत्री साहेबांनी विचारले.” नाही सर, मी त्सुनामीच्या सिम्युलेशन नंतर महाकाय लाटा तयार होतात त्याचं सिम्युलेशन केलं आणि ते करत असताना मला असं वाटलं की याच तत्वाचा वापर कुणीतरी सामाजिक अशांतता निर्माण करण्यासाठी करतं आहे, एव्हढंच मला तुम्हाला सांगायचं होतं” अमित म्हणाला. एव्हाना पाच मिनिटं झाली होती, स्वीय सचिव दरवाज्यावर टकटक करून आत आला, त्याला पाहून अमित जाण्यासाठी खुर्चीतून उठला. मंत्रीसाहेब सचिवाकडे पाहून म्हणाले “आम्हाला थोडा जास्त वेळ लागणार आहे, मग त्यांनी डोळे किलकिले करून अमितकडे पाहिलं आणि म्हणाले लाटांचा आणि सामाजिक अशांततेचा संबंध कसा जोडतोयस तू? जरा वेळ लागला तरी चालेल पण नीट सांग”. “सर मोठ्या जलाशयावर मोठ्या लाटा उसळतात, जोराचा वारा पाण्याच्या पृष्ठभागाला ढकलतो त्यामुळे लाटा उत्पन्न होतात आणि विरतात असं सतत होत असतं. लाटेला उंच शिखर असतं आणि दोन लाटांच्या मध्ये खोल गर्त असते. जेंव्हा लाटा तयार होण्याचं प्रमाण जास्त असतं तेंव्हा विरण्या आधी एका लाटेची दुसऱ्या लाटेशी गाठ पडू शकते. अशा वेळी दोन लाटांची शिखरं मिसळली तर आधीच्या पेक्षा जास्त उंचीचं शिखर असणारी लाट बनते, एका लाटेचं शिखर आणि दुसऱ्या लाटेची गर्त एकमेकात मिसळले तर ती एकमेकांना नष्ट करतात आणि लाट नाहीशी होते” अमितने विषयातलं मूळ विज्ञान समजावून सांगितलं.” हे समाजात कुठे लागू पडतं?” मंत्रीसाहेबांनी विचारलं. “सर आता कल्पना करा, मोठा जलाशय म्हणजे समाज किंवा आपले नागरिक, नागरिकांमध्ये होणारे छोटे मोठे वाद, लोकांनी केलेली छोटी छोटी निदर्शने, ही म्हणजे छोट्या लाटा. जोपर्यंत या छोट्या लाटा विरळ आहेत आणि एकमेकात मिसळत नाहीत तो पर्यंत त्या स्थानिक असंतोषासारख्या असतील, परंतु याच लाटा जास्त प्रमाणात निर्माण झाल्या आणि जास्त काळ टिकल्या तर त्यांच्या पासून मोठ्या असंतोषाच्या मोठ्या लाटा बनू शकतील” अमित म्हणाला. “पाण्याच्या लाटा वेगळ्या आणि जनमताच्या लाटा वेगळया त्यांची तुलना कशी होईल?” मंत्री साहेब म्हणाले. “सर, लाट ही एक भौतिकशास्त्रीय रचना आहे, प्रकाश लहरी, ध्वनी लहरी यांची रचना देखील अशीच असते. जनमताला देखील कुणीतरी फुंकर घालत असतो, लोक एकत्र येऊ लागतात त्यांची संख्या वाढते, एका विशिष्ट उंचीला पोचते, मग त्यांना उद्युक्त करणारा गप्प झाला की लोक पांगतात आणि लाट विरते. या घटनेत सामील न होणारे किंवा विरोध दर्शवणारे म्हणजे शिखरांच्या मध्ये असणारी गर्त. भौतिक शास्त्रातील लाटेची आणि समाज भावनेच्या लाटेची रचना आणि कार्य अगदी सारखंच आहे” अमित म्हणाला. “हं! मंत्रीसाहेब उद्गारले आणि म्हणाले ही तुलना तुला सुचली की तुझ्या निरीक्षणात कांही आलं आहे?” “सर, छोट्या लाटा एकमेकात मिसळत मिसळत अचानक उद्भवणाऱ्या अति मोठ्या लाटेला इंग्रजीत रोग वेव्ह म्हणतात. मी जेंव्हा या शब्दाचा इंटरनेट आणि सोशल मीडियावर तपास केला तेंव्हा मला असं आढळलं की हा शब्द नेहमीच्या अनुभवातला नसूनही याचा वापर गेल्या कांही आठवड्यात वाढला आहे. हा शब्द असणाऱ्या अनेक पोस्ट्स मला असंबद्ध वाटल्या, म्हणजे ते सांकेतिक संदेश असावेत. विशेष म्हणजे नजीकच्या भूतकाळात जेंव्हा मोर्चे, आंदोलने, निदर्शने होत होती, त्याच्या आधी कांही दिवस असे संदेश जास्त आढळायचे, मला वाटलं हा योगायोग नसून त्यामागे कांहीतरी कारण असावं. मी गेल्या कांही आठवड्यतील असंतोषाच्या अभिव्यक्तीच्या घटनांची माहिती गोळा केली आणि मी बनवलेल्या सिम्युलेशनच्या प्रोग्रॅम साठी इनपुट म्हणून वापरली तेंव्हा असं दिसलं की या घटना एकमेकांशी संबंधित नसल्या तरी त्यांचा एक पॅटर्न आहे. या घटना दूरदूरच्या ठिकाणी आणि छोट्या प्रमाणावर सुरु झाल्या, आता या घटनांच्या जागा एका केंद्राच्या बाजूला सरकताना दिसत आहेत आणि प्रत्येक घटनेची व्याप्ती मोठी आहे. जास्त लोक निदर्शनात सामील होत आहेत आणि दोन-तीन दिवस आंदोलन सुरु राहते आहे.” अमित म्हणाला. “अरे पण ही आंदोलने, निदर्शने वेगवेगळ्या कारणांसाठी होती, त्यांचा एकमेकांशी संबंध कसा जोडता येईल? “मंत्रीसाहेब म्हणाले. ” सर, तोच मुद्दा महत्वाचा आहे, वेगळेपणाच्या पडद्यामागे एका धाग्याने ही सर्व एकत्र जोडलेली आहेत, तो धागा म्हणजे असंतोषाची किंवा अस्थिरतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न. आंदोलनांची कारणं वेगळी दिसत असली तरी त्यांच्या मध्ये सामायिक असलेल्या कांही व्यक्ती, आधीच्या आंदोलनातील नकारात्मक परिणाम पुढच्या आंदोलनाला ऊर्जा देत आहेत. लाटेचं कारण कांहीही असलं तरी तिची ऊर्जा दुसऱ्या लाटेला मिळू शकते” अमित म्हणाला. “या सर्व घटनांवर आम्ही नियंत्रण ठेवलं होतं आणि परिस्थिती नियंत्रण खाली आहे, तुला इतकी भीती वाटण्याचं कारण काय?” मंत्रीसाहेब म्हणाले. “सर, समुद्रात जेंव्हा रोग वेव्ह तयार होते तेंव्हा तिची उंची इतर उंच लाटांच्या तुलनेनं तिप्पट किंवा जास्त असते, अटलांटिक महासागरात अशा लाटांची उंची शंभर फूट इतकी असू शकते. मला असं वाटतं की या सर्व आंदोलनांमागे एक यंत्रणा काम करते आहे. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हा कार्यक्रम चालवला आहे, पुढची आंदोलनं अशी विशिष्ट दिशेनं आणि विशिष्ट वेळी केली जातील की एका विशिष्ट दिवशी आणि ठिकाणी याची “रोग वेव्ह” होऊन असंतोषाचा भडका उडेल. भीती वाटण्याचं कारण म्हणजे आपल्या शहरात, इतकंच नव्हे तर आमच्या उपनगरात याचं लोण पोचलं आहे अशी मला शंका आहे. यात कोण सामील आहे हे सांगता येत नाही पण समाज विघातक तत्वांना ही मोठी संधी ठरेल याची मला भीती वाटते,” अमित म्हणाला. “कोणत्या उपनगरात राहतोस तू?” मंत्रीसाहेबांनी विचारलं. अमितनं आपला पत्ता सांगितला. हं! मंत्रीसाहेब उद्गारले आणि टेबलाचा ड्रॉवर उघडून कागद चाळू लागले, मग एक प्रिंटाऊट बाहेर काढला आणि अमित समोर ठेवला आणि म्हणाले “पहा यात कांही ओळखीचं वाटतं आहे का?” अमितने त्यावर नजर टाकली, त्याच्या भागातल्या उपद्रवी व्यक्तींनी, टोपण नावांनी सांकेतिक भाषेत केलेल्या संभाषणाचा तो प्रिंटाऊट होता. जे बोलून सांगायला अमितला भीती वाटत होती त्याचा लेखी पुरावाच मंत्री साहेबांनी त्याच्या समोर ठेवला होता, तो आश्चर्याने बघतंच राहिला. मंत्री साहेब म्हणाले “मी तुला दाखवलेला कागद गोपनीय नसला तरी तू याच्या विषयी कुणाला सांगणार नाहीस असे मी समजतो. तू केलेलं काम महत्वाचं आहे, पण तुला भिण्याचं कारण नाही, आम्ही या प्रोजेक्टला “रोग वेव्ह” नाव दिलं नसलं तरी जे घडतंय यावर आम्ही बारकाईने नजर ठेऊन आहोत आणि लक्षणं दिसताच कार्यवाही सुरु करणार आहोत. आमच्या दिमतीला नुसती कृत्रिम बुद्धिमत्ताच नव्हे तर नैसर्गिक बुद्धिमत्ता आणि विवेक देखील आहेत. मला तुझ्या जागरुकपणाचं आणि कौशल्याचं कौतुक वाटतं. ‘ऍलर्ट इज अलाइव्ह’ हे आताच्या जमान्याचं समीकरण आहे. स्टे ऍलर्ट अँड डोन्ट वरी, यू आर इन सेफ हॅन्ड्स. मंत्रीसाहेब खुर्चीतून उठले आणि अमितशी हस्तांदोलन करून त्याला निरोप दिला. अमितच्या मनावरचं दडपण गेलं होतं, छोट्या लाटांचं “रोग वेव्ह” मध्ये रूपांतर होण्या आधीच त्यांचा निचरा होणारआहे अशी सकारात्मक भावना त्याच्या मनात निर्माण झाली होती.
०९/१०/२०२६
