नारायण ! नारायण !
भगवान विष्णू नुकतेच वामकुक्षी संपवून उठले होते. पुढच्या कामकाजाची सुरवात करणार एवढ्यात त्यांच्या कानी वीणेचा झंकार पडला. कांही क्षणातच नारदमुनी त्यांच्या समोर प्रकट झाले. “नारायण! नारायण!” नारद म्हणाले. ” या नारदा, या, बऱ्याच काळानंतर आज तुमचं दर्शन घडतं आहे, चेहरा जरा सुकल्या सारखा दिसतो आहे, फार जास्त प्रवास केलात का ? ” विष्णू म्हणाले. ” फार नाही पण बऱ्याच दिवसांनी पृथ्वीवर भ्रमण करून आलो आणि तिथलं वातावरण इतकं तापलं आहे की त्याच्यामुळे जरा त्रास झाला” नारद उत्तरले.
” म्हणजे तुम्ही सुपर एलनिन्योबद्दल बोलता आहात का?” विष्णूंनी विचारले. ” ते तर आहेच, त्याचा एव्हढा त्रास नाही वाटला, पण सामाजिक आणि राजकीय वातावरण इतकं बिघडलं आहे की तुम्ही बनवलेली पृथ्वी ती हीच का? असा प्रश्न पडतो आहे” नारद म्हणाले. यावर विष्णू किंचित हसून म्हणाले “नारदा आपण सृष्टी निर्माण केल्यानंतर तिला तिच्या नियमा प्रमाणे पुढे जाऊ देतो. आता तिथे मानव वर्चस्व गाजवत आहेत, त्यानुसार तिथल्या घटना घडत आहेत”.
” हो, ते बरोबर पण मानवांची आधीची युद्धं सैनिकांपुरती मर्यादित असायची, आता कुठेही क्षेपणास्त्रांचा हल्ला करताहेत, संपूर्ण देश रणभूमी बनले आहेत” नारद म्हणाले.
” हा तर काळाचा आणि त्यानुसार विकसित झालेल्या तंत्रज्ञानाचा महिमा आहे” विष्णू म्हणाले.
” त्याही पेक्षा काळजीची बाब म्हणजे कित्येक देशांमध्ये शाळकरी विद्यार्थी रस्त्यावर निदर्शनं करत आहेत, त्यांचं बालपण हरवलंय याचं वाईट वाटलं मला” नारद म्हणाले. ” कांही देश जे स्वतः ला श्रीमंत आणि तंत्रज्ञान दृष्ट्या पुढारलेले म्हणतात, त्यातल्या मुलांचं बालपण फार पूर्वी हरवलंय. आता दिसतंय हे त्याचे परिणाम आहेत. मानव हा सामाजिक आणि कौटुंबिक प्राणी होता. एकेका कुटुंबात तीन-चार पिढ्या एकत्र राहत असत. लहान मुलांना आजी -आजोबा यांचा सहवास लाभत असे. प्रगत देशांमध्ये मुलं फार लवकर घराबाहेर पडतात, स्वतंत्र होतात आणि आणि आई वडिलांचे छत्र आणि आजी आजोबांचे प्रेम हरवून बसतात. कितीसं बालपण त्यांच्या वाट्याला येतं ?” विष्णू म्हणाले. ” देवा, तुम्हाला सगळं जर माहिती आहे तर तुम्ही यावर उपाय का नाही करत ? वेळीच उपाय केला नाही तर हे लोण भारतवर्षात पोचेल” नारद म्हणाले.
” भारतवर्षाची संस्कृती वेगळी आहे, तिथे अजूनही लोक कुटुंबासाठी जगतात. तिथे अजूनही माता पित्यांना अपत्यांकडून मान मिळतो, नातवंडांना आजी आजोबा हवे हवेसे असतात आणि आपल्या कुटुंबातील थोरले आपल्या भल्यासाठी राबतात याची खात्री मुलांना असते. विद्यार्थी अजूनही शिक्षकापुढे नतमस्तक होतात. हे सर्व हजारो वर्षे सुरु आहे, अनेक स्थित्यंतरे झाली पण समाजाने आणि कुटुंबांनी कांही गोष्टी टिकवून ठेवल्या आहेत, त्यामुळे भारतवर्षात समस्या आल्या तरी त्या सोडवण्याचे मार्ग वेगळे आहेत ” विष्णू म्हणाले. “तुम्हाला भारतवर्षातील लोकांबद्दल फारच भरवसा आहे असं दिसतंय” नारद म्हणाले. “त्याचं काय आहे नारदा, बाकीच्या देशातील लोकांना सस्टेनेबिलिटी हा शब्द गवसला त्याला पाच एक दशकं झाली असतील आणि त्याचंआचरण त्यांना अजूनही जमलेलं नाही, पण भारतवर्षातील लोकांची संस्कृती गेली कित्येक हजार वर्ष त्या तत्वावर आधारित आहे, जे चिरंतन आहे त्याचा त्यांना ध्यास आहे, आणि गोंधळ क्षणिक आहे, शांती चिरंतन आहे याचं ज्ञान भारतवर्षातील लोकांना आहे याची मला खात्री आहे, त्यांच्या सूज्ञपणावर तुम्हीही विश्वास ठेवा” विष्णू म्हणाले. प्रत्यक्ष विष्णूंनी भीतीचे निराकरण केल्यामुळे नारदांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले आणि हात जोडून ते म्हणाले नारायण नारायण!
-सुरेश गोपाळ भागवत (२५/१०/२०२६).
