मेघ-महामार्ग

मेघ-महामार्ग

दोन हजार छत्तीस सालचा उन्हाळा संपत आला होता. हवामान खात्यानं महाराष्ट्रात मान्सून जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला दाखल होईल असा अंदाज व्यक्त केला होता. गेल्या कांही वर्षांत हवामान इतकं बेभरवश्याचं झालं होतं की अंदाजांना फारसं महत्व उरलं नव्हतं. जवळ जवळ वर्षाआड एल निन्यो परिणाम दिसून येत होता. पावसाळ्याच्या आगमनाची आणि समाप्तीची तारीख या मोठ्या अंतरानं पुढं मागं होत होत्या. पावसाचे दिवस कमी झाले होते आणि आषाढात मुसळधार आणि श्रावणात सरी हे देखील पूर्वीप्रमाणे राहिलं नव्हतं. अचानक अतिवृष्टी होई, मग अनेक दिवस कोरडे जात. पावसाळ्याचं वेळापत्रक बिघडल्यामुळं शेती करणं जवळ जवळ अशक्य झालं होतं. सरकारी तिजोरीतला बराचसा पैसा माणसं आणि दुभती जनावरं यांना पिण्याचं पाणी पुरविण्यात खर्च होत होता.  आजूबाजूच्या राज्यांमध्येही थोड्या फार फरकानं हीच परिस्थिती होती.  मिळेल त्या किमतीला जमीन विकून, खेडी सोडून लोक शहरांकडं जात होते.  अनेक देशांमध्ये आर्थिक मंदीची लाट आली होती. जागतिक हवामान बदलामुळं आधी शेतीची व्यवस्था आणि त्यानंतर अर्थव्यवस्था संकटात आली होती. ज्या जलमार्गांवर पूर्वी इंधन तेलाचे टँकर्स ये जा करायचे त्यावर आता गोड्या पाण्याचे टँकर्स वाहतूक करत होते. विशीच्या दशकाच्या अंती देशा देशांमधील बेबनाव वाढला. प्रत्येक सरकारनं स्वतःची सत्ता आणि प्रत्येक देशानं स्वतःची अर्थव्यवस्था यांच्या पुरता विचार केल्यानं जागतिक तापमान वाढ, हवामानातील बदल यांच्याकडंआंतरराष्ट्रीय स्तरावर फारसं लक्ष दिलं गेलं नाही.  खर्च आणि वेळ वाचवण्यासाठी आर्क्टिक बर्फातून नवे सागरी मार्ग सुरु करण्यात आले. त्याचा परिणाम असा झाला की उत्तर ध्रुवावरचं   बर्फ प्रचंड प्रमाणात वितळलं आणि समुद्राच्या पाण्यात वाढ झाली.  सूर्यापासून येणारी उष्णता आणखी शोषली जाऊन तापमान वाढीचा वेग आणखी वाढला. पुरातन काळात बर्फाखाली तयार झालेलं पर्माफ्रॉस्ट वाढलेल्या तापमानाला वितळू लागलं, त्यातून मिथेन आणि कार्बन डाय ऑक्साईड मुक्त होऊन वातावरणात मिसळले. हे दोन्ही हरित गृह परिणाम करणारे वायू असल्यानं तापमान वाढीची समस्या हाताबाहेर गेली. आधी केलेली सर्व आकडेमोड, अंदाज आणि उपाय यांना कांहीच अर्थ उरला नाही. चार-पाच वर्षे अशा परीस्थितीत गेल्यानंतर बहुतेक देशातील नेत्यांना याची जाणीव झाली होती की ही परिस्थिती अभूतपूर्व असल्यानं  मानव, पाळीव पशू , उपयुक्त वनस्पती यांचंच नव्हे तर निसर्गाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं. जुन्या कल्पना, विचारधारा यांचा या परिस्थितीत कांहीच उपयोग होणार नव्हता.

जगातल्या बहुतेक सर्व देशांनी पाण्याच्या वापरासाठी नव्या नियोजन पद्धतींचा अवलंब केला होता. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पाणी नियोजन प्रकल्प सुरु करण्यात आले होते. ज्या देशांमध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं होतं त्यांना जागतिक बँकेनं सहाय्य्य केलं होतं. महाराष्ट्रातील एक प्रकल्प गेली दोन वर्षे जागतिक बँकेच्या साहाय्यानं सुरु होता. दहा वर्षे आधी या प्रकल्पाची कल्पना पुढं आली होती परंतु  सरकारी विभाग, सामाजिक संस्था, पर्यावरणवादी वगैरेंच्या आक्षेपांमुळं प्रकल्प मंजूर होत नव्हता. मात्र दरवर्षी उन्हाळा जास्त तीव्र होऊ लागला, एल निन्यो वारंवार होऊ लागले, पाण्याच्या समस्या फारच गंभीर झाल्या. या सर्वांमुळं पाण्याची उपलब्धता वाढवू शकणाऱ्या सर्वच प्रकल्पांना असणारे विरोध मावळले.

सह्याद्री हे महाराष्ट्राचं भूषण, परंतु सह्याद्रीच्या दक्षिणोत्तर रांगेनं महाराष्ट्राचे दोन भाग केले आहेत; पश्चिमेकडची भरपूर पाऊस असणारी, जवळ जवळ समुद्र सपाटीला असणारी चिंचोळी कोकण पट्टी आणि पूर्वेकडचा विखुरलेल्या टेकड्यांचा, पठारांचा, उंच सखल असलेला आणि कमी पावसाचा प्रदेश. महाराष्ट्राच्या बहुतांश भागाला नैऋत्येकडून येणारा मोसमी पाऊस हा पाण्याचा स्रोत आहे परंतु सह्याद्रीची रांग या पावसाच्या ढगांना अडवते, त्यामुळं बहुतेक ढग कोकणात रिकामे होतात. थोडा पाऊस पूर्वेकडं पोचतो परंतु कांही जिल्हे कायमचे दुष्काळी राहिलेले आहेत. बरचसा भाग पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, म्हणजे ढगातून पाऊस पडण्या ऐवजी ढग तिथली आर्द्रता घेऊन पुढं जातात. अशी पावसाची विभागणी सह्याद्रीनं केली आणि महाराष्ट्रानं ती सोसली. परंतु बदलत्या हवामानामुळं कमी पावसाच्या पूर्वेकडील भागात जगणंच अशक्य होऊन बसलं.  हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक उपाय सुचवले गेले. नद्या जोडण्याची किंवा, पाइपलाइननं पाणी आणण्याची कल्पना कित्येक वर्षे विचाराधीन होती, परंतु संपूर्ण देशातच पाऊस अनियमित झाल्यानं ते पर्याय आपोआपच मागे पडले. ज्याला आपण पश्चिम घाट म्हणतो ती डोंगर-पर्वतांची मालिका महाराष्ट्रापासून केरळम पर्यंत जाते. ती महाराष्ट्रात सलग आहे परंतु केरळम राज्यात त्यात खंड पडतो. कर्नाटक, तामिळनाडू राज्यांमधील निलगिरी आणि केरळम मधील अन्नामलाई डोंगर या दोन हजार मीटर्स उंचीची शिखरं असणाऱ्या डोंगरांच्यामध्ये ३२ किमी लांबीच्या भागाची उंची समुद्र सपाटी पासून १०० ते ३०० मीटर्स आहे.  या भागाला ‘पालघाट गॅप’ असं म्हणतात. या खिंडीसारख्या भागातून अरबी समुद्रावरील वारे पश्चिम घाटाच्या पूर्वेला पोचू शकतात. केरळम, तामिनाडू आणि कर्नाटक या राज्यांच्या हवामानावर या खिंडीचा मोठा आणि सकारात्मक परिणाम होतो. अशी एखादी खिंड महाराष्ट्राच्या वाट्याला आली असती तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं दिसलं असतं. पूर्वीचा काळ असा होता की निसर्गानं जे दिलं ते मान्य करण्या खेरीज मानवाला पर्याय नव्हता. आता परिस्थिती बदलली होती, मोठमोठे प्रकल्प राबवण्यासाठी यंत्रसामग्री उपलब्ध होती आणि महत्वाचं म्हणजे आता ती काळाची गरज होती. जागतिक पातळीवरच्या संस्था अशा प्रकल्पांना मदत करण्यासाठी पुढं येत होत्या.  प्रचंड प्रमाणावर विचारमंथन झाल्यानंतर सह्याद्रीचा साधारण दहा किलोमीटर लांबीचा भाग निवडण्यात आला. या भागात डोंगरांची उंची इतर भागांपेक्षा कमी होती आणि रांगेची रुंदी देखील कमी होती. डोंगरांच्या पलीकडं पठार होतं, नद्यांची खोरी होती. जर डोंगरांची उंची इथं कमी करता आली तर तिथून अरबी समुद्रावरील वारे सह्याद्री ओलांडू शकणार होते. पहिल्या टप्प्याच्या कामानंतर या वाऱ्यां कडून सह्याद्री पार करणं अपेक्षित होतं. दुसऱ्या टप्प्यात हरिश्चंद्र -बालाघाटातील डोंगरांवर काम करून हे वारे मराठवाड्यापर्यंत जातील अशी अपेक्षा होती. नैऋत्य मोसमी पावसाच्या ढगांना पुढे जाण्याचा रस्ता करून देण्याच्या या प्रकल्पाला मेघ-महामार्ग असं नाव देण्यात आलं होतं.

साधारणपणे ७३ ते ७४ रेखांश आणि १७ ते १८ अक्षांश या दरम्यानच्या महाराष्ट्राच्या भूभागाचं हवाई सर्वेक्षण करण्यात आलं होतं. या प्रदेशातील डोंगर टेकड्यांना हिरवाई निर्देशांक दिला गेला होता. ऑगस्ट महिन्यातील घनदाट वनराईला १०० मानून ज्या डोंगरांवर ३० पेक्षा कमी हिरवाई निर्देशांक आढळला त्या डोंगरांच्या शिखराकडची माती काढून त्यांची उंची कमी करण्यात आली होती. डोंगरांवरून हलवलेली माती आणि दगड वापरून जवळपासच्या भागात बंधारे तलाव किंवा रिंगण तलाव तयार करण्यात आले होते. बहुतेक डोंगर-टेकड्या पाचशे मीटर्सच्या आतल्याच होत्या, माती काढून त्यांची उंची समुद्र सपाटीपासून ३०० मीटर्स इतकी करण्यात आली होती. डोंगरांची शिखरं सोडली तर इतर कोणत्याही भागाला धक्का लावलेला नव्हता. सह्याद्रीच्या मुख्य रांगेच्या पूर्वेकडचं आणि पश्चिमे कडचं काम या आधीच पूर्ण झालं होतं. राजगड ते प्रतापगड यांच्या मधील सह्याद्रीची मुख्य रांग उंच सखल भागाची असली तरी या भागात डोंगरांची उंची साडेसातशे मीटर्स पेक्षा जास्त नसल्यानं या भागाची निवड करण्यात आली होती. पालघाट गॅपचा अभ्यास करून आणि कॉम्पुटर सिम्युलेशन करून असं समजलं होतं की सह्याद्रीच्या रांगेची उंची ३०० मीटर्स इतकी कमी असेल तर अरबी समुद्रावरून येणारे वारे सह्याद्री ओलांडू शकतील.  पालघाटची उंची १४० मीटर्स असली तरी राजगड आणि प्रतापगडच्या मधल्या भागात वारे दोन्ही बाजूंनी अडवले गेल्यामुळं ते समोरचा ३०० मीटर्सचा अडथळा सहज पार करू शकतील असं सिम्युलेशनमध्ये आढळलं होतं. सह्याद्रीच्या मुख्य रांगेचा दहा किलोमीटर लांबीचा भाग या प्रकल्पात समाविष्ट होता. शेकडोंच्या संख्येनं मोठं मोठे पोक्लेन, एक्सकॅव्हेटर, माती वाहणारे डंपर आणि ट्रॅक्टर्स यांच्या कामाची जागोजाग धुमश्चक्री सुरु होती. यंत्रांचा खडखडाट टेकड्यांमध्ये दुमदुमत होता. अचानक वळवाचा पाऊस येऊन कामात अडथळा येऊ नये म्हणून लवकरात लवकर काम पूर्ण करण्याची सर्वांनाच घाई झाली होती. सह्याद्रीची रांग ओलांडताच वाऱ्याचा प्रवाह दोन भागांमध्ये विभागला जाणार होता. एक भाग सासवडच्या पठाराच्या उत्तरेकडून पूर्व दिशेनं आणि भीमा नदीच्या खोऱ्यातून पुढं जाणार होता. पहिल्या टप्प्याचे परिणाम पाहून पुढच्या टप्प्यात हा प्रवाह इंदापूर, बार्शी, तुळजापूर, धाराशिव असा जाणार होता. दुसरा प्रवाह सासवड पठाराच्या दक्षिणेकडून नीरा नदीच्या खोऱ्यातून जाणार होता आणि दुसऱ्या टप्प्यात तो अकलूज, पंढरपूर, सोलापूर असा जाणार होता. नैऋत्य मोसमी पावसाचे वारे पश्चिमेकडून पूर्वेकडे नैसर्गिकपणे वाहतील आणि सोबत पावसाचे ढग आणतील आणि त्यामुळं सह्याद्रीच्या पूर्वेच्या प्रदेशात पावसाचं प्रमाण वाढेल अशी योजना होती. उत्तरेला हरिश्चंद्र -बालाघाट आणि दक्षिणेला महादेव डोंगरांची रांग यांच्या दरम्यानच्या बराचश्या टापूला या पहिल्या टप्प्याच्या     कामामुळं फायदा होईल अशी अपेक्षा होती.

मुख्य रांगेच्या दोन्ही बाजूंचं आणि दोन्ही टोकाकडच्या भागाचं काम आधीच झालं होतं, आता  सर्व यंत्रसामुग्री मुख्य रांगेच्या  मध्यभागी असलेल्या शिखरांवर कामाला जुंपलेली होती. दर तासा गणिक रचनेत बदल झालेला दिसत होता. हळू हळू खिंड तयार होताना दिसत होती ऐतिहासिक महत्वाच्या आणि उच्च हिरवाई निर्देशांक असलेल्या जागा सोडता समुद्र सपाटी पासूनची खिंडीची कमाल उंची आता ३०० मीटर्सवर आलेली होती. कंत्राटदारांनी नियोजित काम झाल्याचं सांगितल्या नंतर ड्रोनच्या साहाय्यानं खिंडीचं सर्वेक्षण करण्यात आलं, छायाचित्रं आणि आकडेवारी संगणकाला पुरवण्यात आली आणि नैऋत्य मोसमी वारे कसे वाहतील याचं सिम्युलेशन करण्यात आलं. सामान्य परिस्थितीत जून महिन्याच्या मध्यापासून ते ऑगस्ट महिन्याच्या मध्यापर्यंत खिंडीतून पुरेसा वाऱ्याचा प्रवाह राहील आणि नद्यांची खोरी आणि पठारी प्रदेश यातील पावसाचं प्रमाण वाढेल असं सिम्युलेशनमध्ये स्पष्ट होत होतं. सारे कनिष्ठ अभियंते, उप अभियंते आणि कांही कंत्राटदार मुख्य अभियंत्याच्या तात्पुरत्या कार्यालया जवळ जमले होते. मुख्य अभियंत्यानं त्यांना  सिम्युलेशनमध्ये काय दिसतं आहे ते दाखवलं. या आधी प्रकल्प कसा होईल याचं सिम्युलेशन करण्यात आलं होतं, परंतु आता प्रत्यक्ष जागेची छायाचित्रं आणि आकडेवारी यांच्यावर आधारित सिम्युलेशन पाहताच सर्व जण उल्हसित होऊन टाळ्या वाजवू लागले. एक तरुण अभियंता म्हणाला “सर, प्रत्यक्ष परिणाम बघायला आपल्याला मॉन्सूनचे वारे सुरु होईपर्यंत वाट बघायला लागेल नं!” त्यावर मुख्य अभियंता म्हणाले “हो, ते खरं आहे पण दुधाची तहान ताकावर म्हणतात नं, तसा एक तात्पुरता पुरावा मी तुम्हाला देणार आहे, त्यासाठी आपल्याला त्या टेहळणी मचाणावर जावं लागणार आहे.” मुख्य अभियंता टेहळणी मचाणावर चढले, त्यांच्या पाठोपाठ इतरही कांहीजण मचाणावर चढले. मुख्य अभियंत्यानं आपल्या मोबाईल वरून एक दोन फोन केले आणि म्हणाले “कांही मिनिटं आपल्याला वाट बघावी लागेल”. कांही मिनिटं गेली त्यांच्या फोनची रिंग वाजली, त्यांनी त्यांच्या बॅगमध्ये असलेला बायनॉक्युलर काढून डोळ्यांना लावला आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं स्मित  झळकलं. नवीन तयार झालेल्या खिंडीत त्यांनी पश्चिमेकडून पूर्वेकडं असे थोड्या थोड्या अंतरावर, विमानतळावर धावपट्टीच्या बाजूला लावतात तसे वाऱ्याची दिशा आणि वेग दाखवणारे “विंड सॉक्स” ठेवायला सांगितले होते. आता समुद्राकडून जमिनीकडं वाहणारे खारे वारे वाहण्याची वेळ झाली होती. एरवी डोंगरांना धडकून थांबणारे वारे आता खिंडीतून पलीकडं जाऊ शकत होते, त्यामुळं जिथपर्यंत दिसत होतं ते सर्व “विंड सॉक्स” वाऱ्यावर फडफडत होते. या क्षणाला ते विंड सॉक्स नसून प्रकल्पाच्या यशाच्या पताका आहेत असं सर्वांना वाटलं.

-सुरेश गोपाळ भागवत (संपूर्णपणे काल्पनिक आणि मानवनिर्मित, ०४/११/२०२६).

 

Similar Posts

  • जायंट व्हील

    देशमुख साहेब स्वतः आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ऑफिस मध्ये येण्या जाण्याच्या वेळे बाबतीत खूप काटेकोर असत. सखाराम काल ऑफिस मध्ये थोडा उशिरा आला होता हे त्यांना माहित होते. आजही तो वेळेवर आलेला नव्हता. ऑफिसची वेळ होऊन…

  • साहेबांचा जपानी भाचा

    साहेबांचा जपानी भाचा बिटबाइट टेक कंपनी कर्मचाऱ्यांच्या संख्येनं  लहान होती परंतु कार्यक्षमतेच्या बाबतीत खूपच नावाजलेली होती. कंपनीत काम करणारा प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात तरबेज तर होताच, परंतु स्वतःचं  काम सर्वोत्कृष्ट असावं या विचारानं झपाटलेला होता....
  • नेति नेति

    नेति नेति आयुष्य म्हणजे दात आणि चण्याच्या म्हणी सारखं झालंय! असं वाटतंय की विधाता मला एखाद्या एखाद्या गोष्टीच्या बदल्यात दुसरी देतोय. काकांनी सांगितलेल्या गोष्टी अनुभवाला येत होत्या. काका भेटले त्यानंतर वाटत होतं की मला एक...
  • वसुंधरा वैविध्याची वाहिनी

    प्राध्यापक चंद्रशेखर श्रोत्यांच्या पहिल्या रांगेत बसून वक्त्याचे सादरीकरण पाहत होते, परंतु त्यांना त्यावर लक्ष केंद्रित करणे अवघड जात होते. या वक्त्यानंतर त्यांचे सादरीकरण होते आणि नाही म्हटले तरी त्यांच्या मनावर थोडे दडपण आले होते. त्याचे...
  • खारीचा वाटा

    कांही दिवसांपूर्वी माझी कामं आटोपून मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट) स्थानकावर पोचलो तेंव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. पनवेलची लोकल फलाटावर उभी होती. गाडी प्रवाशांनी भरली होती आणि तरीही लोक डब्यांमध्ये चढतंच होते, मीही त्यापैकीच...
  • तर्कानं सुटलं कोडं

    तर्कानं सुटलं कोडं बाबा कुलकर्ण्यांचे दोन चिरंजीव आणि एक कन्या आज सर्वात थोरला दिनू याच्या घरी जमणार होते. ही  तीन भावंडं दोन-अडीच वर्षांच्या अंतराने जन्मली होती. तिघंही अतिशय सुस्वभावी होते. तिघंही सेकंड क्लास मध्ये पास...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *