प्राध्यापक चंद्रशेखर श्रोत्यांच्या पहिल्या रांगेत बसून वक्त्याचे सादरीकरण पाहत होते, परंतु त्यांना त्यावर लक्ष केंद्रित करणे अवघड जात होते. या वक्त्यानंतर त्यांचे सादरीकरण होते आणि नाही म्हटले तरी त्यांच्या मनावर थोडे दडपण आले होते. त्याचे कारण भीती नव्हते तर त्याला थोडा इतिहास होता. या आंतरराष्ट्रीय संमेलनाला येण्या आधी त्यांनी या संशोधनाचा कांही भाग भारतातच भरलेल्या एका संमेलनात सादर केला होता. त्यावेळी कांही शास्त्रज्ञांनी त्यांचा अहवाल अतिरंजित असल्याची टीका केली होती आणि संशोधकांनी संपूर्ण खात्री असल्याशिवाय कामाची प्रस्तुती करू नये अशी सर्वांना सूचनाही करण्यात आली होती. या टीकेचा रोख त्यांच्या दिशेला होता हे त्यांना ठाऊक होते. संमेलनानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांबरोबर सखोल चर्चा केली होती आणि त्यांच्या हितचिंतकांनी त्यांना दिलासा दिला होता की त्यांच्यावरील टीका ही वैयक्तिक स्वरूपाची, अशास्त्रीय आणि बहुधा असूयेपोटी केलेली होती. सर्वांशी सल्ला मसलत करून त्यांनी या आता सुरु असलेल्या आणि अत्यंत उच्च दर्जाचे समजल्या जाणाऱ्या संमेलनासाठी आपला शोध निबंध पाठवला होता आणि त्यांना निमंत्रण मिळाले होते. अगदी जय्यत तयारी करून ते आले असले तरी आधीच्या टीकेचा परिणाम बाकी होताच.
त्यांच्या मनात उजळणी सुरु होती. जैविक विविधतेचा अभ्यास हा उद्देश असलेल्या एका आंतरराष्ट्रीय प्रकल्पामधे काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती. सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील जैविक विविधता यावर त्यांनी निरीक्षणे आणि अभ्यास करायचा होता, त्याच बरोबर पश्चिम आफ्रिका खंडातील कांही ठिकाणांचा अभ्यास करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली होती. कांही ठिकाणी जैविक विविधतेची इतकी रेलचेल का असते याचे कारण शोधणे हा या प्रकल्पा मागचा उद्देश होता. प्रा. चंद्रशेखर आणि त्यांच्या चमूने पश्चिम घाटातील वनस्पतींचा अभ्यास तर केला होताच परंतु आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागातील कांही ठिकाणी दुर्मिळ असलेल्या वनस्पतींची इतकी उदाहरणे शोधली की ऐकणाऱ्याला अचंबा वाटावा. त्याच भागातील जीवाश्मांचा अभ्यास हा देखील प्रकल्पाचा एक भाग होता. साधारण दीड ते दोन अब्ज वर्षांपूर्वीचे जीवाश्म त्यांना मिळाले होते. त्या जीवाश्मांमधे आढळलेली विविधता देखील आश्चर्यकारक होती. या विविधतेच्या अहवालावरच कांही भारतीय शास्त्रज्ञांनी शंका उपस्थित केली होती.
आपण अत्यंत काळजीपूर्वक आणि चोखपणे केलेल्या कामाबद्दल कुणी शंका व्यक्त करावी यामुळे त्यांच्या संवेदनशील आणि प्रामाणिक मनाला अतिशय क्लेश झाले होते. त्यानंतर त्यांनी आपल्या चमू समवेत सर्व प्रकल्पाचा आढावा घेतला होता. जीवाश्मांमधे आणि सध्या आढळणाऱ्या वनस्पतींमधे आढळणाऱ्या विविधतेचे कारण आपल्याला गवसले आहे असा त्यांना विश्वास वाटत होता. राष्ट्रीय पातळीवर शास्त्रज्ञांनी अविश्वास दाखवला तरी आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांसमोर शहनिशा व्हावी असे त्यांना वाटत होते. आज ती वेळ येऊन ठेपली होती. विविध विषयांवर प्रभुत्व असलेले मातब्बर शास्त्रज्ञ इथे हजर होते. प्रा. चंद्रशेखर यांच्या मनात दडपण आणि उत्साह यांचा लपंडाव सुरु होता. एवढ्यात समोरच्या वक्त्याचे सादरीकरण संपले, त्यावर प्रश्नोत्तरे झाली आणि त्यानंतर व्यासपीठावर बसलेले त्या सत्राचे अध्यक्ष प्रा. झिमरमन यांनी प्रा. चंद्रशेखर यांचे नाव पुकारले, त्यांची थोडक्यात ओळख वाचून दाखवली आणि माईक त्यांच्या हवाली केला.
प्रा. चंद्रशेखर यांनी संथपणे सुरवात केली. प्रथम त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रकल्पाची माहिती दिली. त्या नंतर त्यांनी विविध ठिकाणच्या वनस्पतींचा अभ्यास कसा केला, वनस्पतींची ओळख चुकीची होऊ नये म्हणून काय काळजी घेतली, वैविध्य मोजण्यासाठी काय निकष लावले, वनस्पतींच्या परस्पर संबंधांचे मोजमाप कसे केले याची विस्तृत माहिती दिली. मग आफ्रिका खंडाच्या पश्चिम भागात असलेल्या एका देशातील ठिकाणांच्या अभ्यासावर माहिती द्यायला सुरवात केली. पर्वतराजी आणि वनराई यांनी समृद्ध असलेल्या या भागात आदिवासी लोकांचे वास्तव्य होते आणि आतापर्यंत या भागाचा अभ्यास झाला नव्हता. या टापूमधे डोंगरांवर किंवा दऱ्यांमधे अशी ठिकाणे होती की जिथे दुर्मिळ वनस्पती होत्या. या वनस्पती फक्त एखाद्याच ठिकाणा पुरत्या मर्यादित असत. आदिवासींना या टापूची चांगली माहिती होती त्यामुळे हा अभ्यास पूर्ण होऊ शकला होता आणि त्याचे निष्कर्ष आश्चर्यकारक होते.
त्यांच्या सादरीकरणाचा नंतरचा भाग होता जीवाश्मांच्या अभ्यासाचा. जीवाश्मांचे हे नमुने जवळ पास त्याच भागातील होते. साधारण दीड अब्ज वर्षांपूर्वीच्या जीवसृष्टीचे दगडांमध्ये शिल्लक राहिलेलेअवशेष त्यांना मिळाले होते.
योगायोगाची बाब अशी की या जीवाश्मांमधे देखील अनेक प्रकार होते. या अत्यंत प्राचीन वनस्पती असाव्यात. त्यातल्या पेशींचे आकार, लांबी-रुंदीची परिमाणे, कवच किंवा भित्तिची जाडी या सारख्या गुणधर्मांकडे पाहता त्यांचे विविध प्रकार असावेत असा निष्कर्ष त्यांनी काढला होता. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने काढलेली अनेक छायाचित्रे वापरून त्यांनी आपला मुद्दा मांडला होता. सलग चाळीस मिनिटे बोलल्या नंतर श्रोत्यांना धन्यवाद देऊन त्यांनी आपले सादरीकरण संपवले. प्रश्नोत्तरांची वेळ आली पण कांही सेकंद सर्व शांत होते. प्रा. चंद्रशेखर यांच्या मनात जवळ जवळ अपेक्षाभंग आणि निराशा या भावना डोकावू लागल्या होत्या, कारण संपूर्ण शांतता हे नापसंतीचे कारण असू शकते. परंतु शांततेचा भंग करत प्रा. झिमरमन म्हणाले ” प्राध्यापक चंद्रशेखर, तुम्ही सादर केलेला अहवाल अत्यंत विस्मयजनक आहे. एवढ्या छोट्या प्रदेशात इतकी जास्त विविधता या बाबतीत तुमचा अहवाल अव्वल क्रमांकाचा म्हणावा लागेल, परंतु या बाबतीत अचूकपणा आहे आणि ही निरीक्षणे एखाद्या प्रसंग पुरती मर्यादित नाहीत या बाबतीत आपण काय सांगू शकाल? चर्चेला सुरवात होते आहे असे पाहून प्रा. चंद्रशेखर यांना जरा हायसे वाटले, असा प्रश्न त्यांना अपेक्षित होताच. त्यांनी नमुने गोळा करण्याच्या आणि नोंदी करण्याच्या पद्धती, ते करण्यात भाग घेतलेल्या वैज्ञानिकांची माहिती याबाबत अधिक खुलासा केला. अभ्यास सतत तीन वर्षे सुरु होता आणि सतत तशीच निरीक्षणे मिळाल्यामुळे ही माहिती विश्वसनीय असल्याचे सांगितले. अध्यक्ष प्रा. झिमरमन यांनी होकारयुक्त मान डोलावली. आता श्रोत्यांमधून प्रश्न विचारण्यासाठी हात वर होऊ लागले. प्रा. हुकर यांनी विचारले “दुर्मिळ वनस्पती असणारी ही ठिकाणे किती मोठ्या टापूत पसरली आहेत आणि अशा ठिकाणांचा पसस्परांशीं कांही संबंध आहे का?” त्यावर प्रा. चंद्रशेखर म्हणाले “ही ठिकाणे वेगवेगळ्या आकाराची आहेत, कांही ४-५ एकर क्षेत्राची आहेत तर कांही बरीच मोठी आहेत. कांही एकमेकांना स्पर्श करणारी आहेत तर कांही तुटक तुटक आहेत. विशेष म्हणजे ही सर्व ठिकाणे एखाद्या काल्पनिक केंद्रबिंदू भोवती वर्तुळाकार आकारात विखुरलेली आहेत. ही रिंगणाप्रमाणे असलेली रचना आमच्या दृष्टीने महत्वाची बाब आहे”.
“तुमच्या अभ्यासातील जीवाश्मांमधे जी विविधता दिसते आहे त्यात चुकीने किंवा कृत्रिमपणे वेगळेपण दिसू नये या साठी तुम्ही काय उपाय योजना केल्या?” प्रा. गोल्डबर्ग यांनी विचारले. त्यावर प्रा. चंद्रशेखर म्हणाले, “हे जीवाश्म वेगवेगळ्या वैज्ञानिकांनी स्वतंत्रपणे गोळा केले होते, त्यांची दोन तीन वेळा तपासणी करण्यात आली होती आणि जेंव्हा असे लक्षात आले की त्यांच्यात खूप विविधता आहे तेंव्हा आणखी नमुने गोळा करून त्यांचा अभ्यास करण्यात आला, त्यामुळे चित्र आहे तसे आपल्या समोर आले आहे आणि त्यात चुका किंवा कृत्रिमता असण्याची शक्यता नाही असा आम्हाला विश्वास वाटतो”. प्रश्नोत्तरे बराच वेळ सुरु होती, शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या अंगांनी प्रश्न विचारले आणि प्रा. चंद्रशेखर यांनी त्यांना उत्तरेही दिली, परंतु त्यांचे आणि श्रोत्यांचे एकमत झाले आहे असे वाटत नव्हते, कुठेतरी अंतर शिल्लक होते. प्रा. झिमरमन त्यांनी पुन्हा एकादा माईक हातात घेतला आणि म्हणाले “प्रा. चंद्रशेखर यांचे सादरीकरण आणि त्याच्यावर झालेली प्रश्नोत्तरे यावरून हे दिसून येते की हा विषय महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा आहे, परंतु केवळ निरीक्षणाने मुद्दा सिद्ध होत नाही; त्या मागचे कारण देता आले पाहिजे. योग्य कारण हे आश्चर्यकारक निरीक्षणांना किंवा शोधांना पुष्टी देऊ शकते. एखाद्या छोट्या प्रदेशात वनस्पतीमधील आज दिसणारे वैविध्य आणि जवळपास त्याच ठिकाणी आढळणारे दीड अब्ज वर्षांपूर्वीचे वैविध्य याचे कारण काय असू शकेल, आणि त्यांचा एकमेकांशी कांही संबंध आहे असे तुम्हाला वाटते का?”
प्रा. चंद्रशेखर जरा थबकले, मग विचार करून म्हणाले, “याचे कारण शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, आणि कारण काय असावे याचा आम्हाला सुगावा लागला आहे. तो विषय आम्ही आणखी सखोल विचारा नंतर जाहीर करणार होतो, परंतु आता तो विषय निघालाच आहे तर त्याची थोडी कल्पना इथे देणे योग्य ठरेल”
“आपल्यापैकी बहुतेक जणांनी नैसर्गिक अणुभट्टी ही संज्ञा ऐकली असेल. आमच्या अभ्यासासाठी निवडलेला प्रदेश हा नैसर्गिक अणुभट्ट्यांचा प्रदेश असावा. गॅबॉन देशातल्या या टापू जवळ अशा कांही भट्ट्या सापडल्याची नोंद आहे”. यावर उपस्थितांमध्ये थोडी कुजबुज झाली. “यावर थोडे विस्ताराने सांगाल तर मुद्दा स्पष्ट होईल “प्रा. ऑस्टिन म्हणाले. सर्व उपस्थितांवर नजर टाकल्यावर प्रा. चंद्रशेखर यांना असे भासले की नैसर्गिक अणुभट्टीबद्दल माहिती सर्वांनाच असेल असे नाही. त्यांनी थोडी प्राथमिक माहिती देण्याचे ठरवले. ते म्हणाले “पृथ्वीचा जन्म ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाला असे विज्ञान सांगते. त्याच वेळी पृथ्वीची रासायनिक घटना ठरली. पृथ्वीच्या वाट्याला जी मूलद्रव्ये आली त्यातील कांही किरणोत्सारी होती. त्यापैकी युरेनियम हे किरणोत्सारी मूलद्रव्य खनिजाच्या स्वरूपात, कमी मात्रेत विखुरलेले होते. त्याचे संथपणे किरणोत्सारी विघटन होत राहिले. परंतु पृथ्वीच्या इतिहासात एकेक कालखंड असे येऊन गेले की ज्या वेळी मोठी स्थित्यंतरे घडली. अंदाजे ३.६ अब्ज वर्षांपूर्वी सजीवांची उत्पत्ती झाली आणि सुरवातीच्या अत्यंत साध्या सजीवांपासून पुढे सूर्य प्रकाशाचा वापर करून प्रकाश संस्लेषण करणाऱ्या वनस्पतींची उत्क्रांती झाली.
प्रकाश संस्लेषणामुळे प्रथमच पृथ्वीच्या वातावरणात सुटा प्राणवायू उपलब्ध झाला. या प्राणवायूचा विविध मूलद्रव्यांशी आणि पदार्थांशी संयोग होऊ लागला. त्यात युरेनियमचाही समावेश होता. युरेनियमच्या मूळ खनिजात युरेनियमची मात्रा कमी असल्याने त्याचे अणू एकमेकांपासून दूर दूर होते, परंतु प्राणवायूही संयोग झाल्याने युरेनियमचे पाण्यात विद्राव्य असे संयुग तयार झाले. हे संयुग पाण्याबरोबर जिथे पाणी साचेल तिथे जाऊ लागले. पाण्याचे बाष्पीभवन झाल्यावर त्या संयुगाचे थर साचू लागले. कालांतराने या थरांमध्ये इतके युरेनियम साचले की त्याची मात्रा बरीच वाढली आणि या अवस्थेत युरेनियमच्या अणूंची दाटी झाली. एका युरेनियमच्या अणूचे किरणोत्सारी विघटन होते तेंव्हा त्यातून तीन न्यूट्रॉन्स आणि कांही ऊर्जा बाहेर पडते. जवळपास दुसरा युरेनियमचा अणू नसेल तर बाहेर पडलेले तीन न्यूट्रॉन्स वेगाने आसमंतात निघून जातात. कांही वेळाने आणखी एका युरेनियमच्या अणूचे विघटन होते, पुन्हा न्यूट्रॉन्स निघून जातात, अशा तऱ्हेने हे विघटन संथपणे होत राहते. मात्र युरेनियमच्या अणूंची जेंव्हा दाटी होते तेंव्हा हे चित्र बदलते. एका अणूच्या विघटनातून बाहेर पडलेले न्यूट्रॉन्स जवळचा असलेल्या दुसऱ्या अणूंवर धडकतात व त्यांना किरणोत्सारी विघटनासाठी उद्युक्त करतात. प्रत्येक न्यूट्रॉन एका अणूला असे करण्यास भाग पाडतो, म्हणजे तीन अणूंचे विघटन होते आणि त्यातून नऊ न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. यातील प्रत्येक जवळच्या आणखी अणूंचे विघटन घडवतात, त्यातून सत्तावीस न्यूट्रॉन्स बाहेर पडतात. अशा तऱ्हेने विघटनाची साखळी क्रिया सुरु होते आणि युरेनियमचे अणू किंवा न्यूट्रॉन्सची उपलब्धता असे पर्यंत सुरु राहते.”
“ही साखळी क्रिया वीज निर्मितीसाठी उभारलेल्या अणुभट्ट्यात होते व त्या नियंत्रित असतात हे आम्हाला ठाऊक आहे, पण नैसर्गिक अणुभट्टीत हे नियंत्रण कसे होते? “प्रा. निशिकावा यांनी विचारले. प्रा. चंद्रशेखर म्हणाले “युरेनियमच्या अणुतून निघणारे निघणारे न्यूट्रॉन्स अत्यंत वेगाने निघून जातात त्यामुळे त्यांची दुसऱ्या अणुशी धडक होण्याची शक्यता कमी असते परंतु न्यूट्रॉन्स चा वेग कमी केला तर त्यांची दुसऱ्या अणुशी धडक होण्याची शक्यता वाढते. साखळी क्रिया होण्यासाठी न्यूट्रॉन्सचा वेग कमी करणे आवश्यक असते. त्यांचा वेग कमी करण्याचा गुणधर्म कांही पदार्थांमधे असतो त्यापैकी पाणी एक आहे. आता कल्पना करा की युरेनियमचे विशिष्ट प्रमाण असलेला खडक आहे, त्यातून न्यूट्रॉन्स बाहेर पडत आहेत आणि वेगाने निघून जात आहेत,
परंतु पाऊस पडून पाणी साचल्यानंतर हे खडक पाण्याखाली जात असतील. पाण्यामुळे न्यूट्रॉन्स चा वेग कमी होऊन साखळी क्रिया सुरु होत असेल, साखळी क्रियेमुळे ऊर्जा बाहेर पडून तापमान वाढत असेल, त्यामुळे पाण्याची वाफ होऊन जात असेल आणि कोरडे पडल्यामुळे साखळी क्रिया बंद होत असेल. अशा तऱ्हेने या नैसर्गिक अणुभट्ट्या कांही वेळ सुरु आणि कांही वेळ बंद राहत असतील. वीज निर्माण करणाऱ्या अणुभट्ट्यांच्या तुलनेने या नैसर्गिक अणुभट्ट्या अत्यंत लहान असाव्यात परंतु योग्य जागी असणाऱ्या भट्ट्या पाच लाख वर्षे चालल्या असाव्यात असे अनुमान आहे.”
” या नैसर्गिक अणुभट्टीचा तुमच्या आताच्या सादरीकरणाशी संबंध कसा जोडता येईल?” प्रा. ब्रोनोवस्की यांनी विचारले. त्यावर प्रा. चंद्रशेखर म्हणाले “किरणोत्सारा मधून जे शक्तिशाली विकिरण बाहेर पडते त्यामधे पेशीतील डीएनए या घटकात उत्परिवर्तन घडविण्याची क्षमता असते हे आपण सर्व जाणतो. उत्परिवर्तन म्हणजे आनुवंशिक बदल, ज्यांच्यामुळे सजीवांच्या गुणधर्मात बदल होऊ शकतो. नैसर्गिक अणुभट्टी ही संपूर्णपणे उघडी असल्याने त्यातून बाहेर पडणारे विकिरण आजूबाजूला पसरत असावे आणि आजूबाजूच्या सजीवांमधे उत्परिवर्तनाने बदल घडवून आणत असावे.”
“आमच्या माहिती प्रमाणे किरणोत्साराने हानी होते, तुमच्या निरीक्षणातील विविधता किरणोत्साराने कशी निर्माण होईल?” प्रा. ब्रोनोवस्की यांनी पुन्हा प्रश्न केला. ” हे सर्व किरणोत्साराच्या मात्रेवर अवलंबून आहे. अणुबॉम्ब स्फोटाइतक्या मात्रेत जवळपासचे सर्वच नाश पावेल, परंतु नियंत्रित साखळी क्रियेत विकिरण हानी मर्यादेपेक्षा कमी प्रमाणात असेल तर ते संपूर्णपणे मारक ठरणार नाही. अशा मर्यादेच्या क्षेत्रात असलेले सजीव अनेक उत्परिवर्तनांच्या परिणामाने आज सादर केलेल्या वैविध्याचे कारण असू शकतील.” प्रा. चंद्रशेखर म्हणाले.
“तुमची निरीक्षणे आणि अनुमान उत्क्रांतीवादाच्या निकषावर खरी ठरतील काय? “प्रा. झिमरमन यांनी विचारले. यावर प्रा. चंद्रशेखर उत्तरले “आमचे स्पष्टीकरण उत्क्रांतीवादाला पूरक असेच आहे, किंबहुना सजीवांच्या उत्क्रांतीचा दर किंवा वेग या विषयी आमचे संशोधन स्पष्टीकरण देते. उत्क्रांतीच्या दराच्या बाबतीत दोन मत प्रवाह आहेत, पहिला म्हणजे उत्क्रांती संथपणे एकाच दराने होत राहते. दुसरा म्हणजे उत्क्रांती कधी संथ दराने तर कधी जलद होत असते. उत्क्रांतीचा दर वाढण्यासाठी कांही कारण निश्चितच लागणार, नैसर्गिक अणुभट्टीच्या भोवतीची वाढीव उत्परिवर्तने हे त्याचे एक कारण होऊ शकते आणि त्यातून नव्या प्रजातींची उत्पत्ती होऊ शकते.” “तुमच्या म्हणण्या प्रमाणे नैसर्गिक अणुभट्ट्या पाच लाख वर्षे चालल्या, मग त्यानंतर दीड -दोन अब्ज वर्षांनंतर म्हणजे आता आजच्या वनस्पतींमधे इतके वैविध्य असायचे कारण काय? श्रोत्यांच्या मागच्या रांगेतून एक प्रश्न आला. त्यावर प्रा. चंद्रशेखर म्हणाले “उत्क्रांतीला एकदा वाढीव वेग आला तो त्या पर्यावरणामधे बराच काळ टिकला आणि त्यापासून आज अस्तित्वात असलेली विविधता निर्माण झाली. अनेक दुर्मिळ प्रजाती एका छोट्या टापूत सामावण्याचे कारण एकेकाळी उंचावलेला उत्क्रांतीचा दर असावा.”
“पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती झाल्यापासून अनेक वेळा संकटे आली, त्यातून नाश झाला, परंतु नाश आणि पुन्हा उत्क्रांती हा क्रम सुरु राहिला. या दरम्यान वेळोवेळी निर्माण झालेली विविधता वसुंधरेने तिच्या परीने जतन करण्याचा प्रयत्न केला आहे. ही विविधता आपण कधी जीवाश्मांच्या स्वरूपात पाहतो तर कधी सजीवांच्या स्वरूपात. वसुंधरेने हे काम इतके चोख केले आहे की आपल्यापैकी कांहींना त्यावर विश्वास ठेवणे अवघड जाते आहे. परंतु आपण निसर्गाच्या आणि वसुंधरेच्या असामान्य क्षमतांचा आदर करायला हवा म्हणजे सत्याचा स्वीकार करणे सोपे होईल, निसर्गाने घडवलेल्या चमत्कारांचे शास्त्रीय कारण शोधणे सुकर होईल.” शेवटचे वाक्य उच्चारताना त्यांचा स्वर थोडा कठोर झाला होता कारण त्यांच्यावर आधी झालेला अतिशयोक्ती करण्याचा आरोप मनामधे सलत होता.
सत्राचे अध्यक्ष प्रा. झिमरमन यांनी घड्याळाकडे नजर टाकली व चर्चा बराच वेळ चालल्याचे लक्षात येऊन त्यांनी चर्चा थांबवण्याचा इशारा म्हणून हात उंच केला आणि म्हणाले “प्रा. चंद्रशेखर यांचे सादरीकरण अत्यंत महत्वाचे आणि स्पष्टीकरण अत्यंत समर्पक होते. जैविक विविधते संबंधीच्या आपल्या ज्ञानात त्यांच्या या संशोधनाने मोलाची भर पडली आहे असे मला वाटते. आजही उत्क्रांतीवाद न पटणारे अनेक लोक आहेत, त्यांची मुख्य शंका असते की इतकी विविधता केवळ नैसर्गिक घटकांमुळे कशी निर्माण होईल? प्रा. चंद्रशेखर यांचे विवेचन त्या शंकेचे चांगल्यापैकी निराकरण करते. त्यांच्या संशोधनाने जैविक वैविध्या संबंधीच्या विचारांना चालना मिळणार आहे. मला असेही नमूद करावेसे वाटते की अंदाजे पन्नास ते साथ कोटी वर्षांपूर्वीच्या कँब्रियन युगात इतके नवे सजीव प्रकार उदयास आले की त्याला “कँब्रियन विस्फोट” असे नाव देण्यात आले. प्रा. चंद्रशेखर यांच्या स्पष्टीकरणाने त्या घटनेचा खुलासा करण्यास मदत होऊ शकते. आपण सर्व माझ्याशी सहमत असाल असा मला विश्वास आहे, आपण टाळ्या वाजवून प्रा. चंद्रशेखर यांचे अभिनंदन करू या.”
प्रा. चंद्रशेखर मंचा वरून उतरून जागेवर येऊन बसले तरी किती तरी वेळ टाळ्यांचा कडकडाट सुरूच होता. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञांची ही त्यांच्या संशोधनाला मान्यताच होती. आधीच्या टीकेचे सावट दूर झाले होते. आत्मविश्वास, कृतज्ञता आणि संतुष्टतेंच्या भावनेने त्यांचा ऊर भरून आला होता.