आयुष्यात अक्षांश-रेखांशाचं महत्व
आता जास्त जाणवू लागलंय
योग्य जागेवर असणारे म्हणजे
भाग्यवान असं वाटू लागलंय II१II
तिकडे रॉकेट्सचा पाऊस पडतोय
जमीन भिजतेय रक्तानं
रडणाऱ्यांचे आक्रोश थांबतायत
उगी राहिल्यानं नाही, तर जीव गेल्यानं II२II
इकडे पाऊस पडतोय धावांचा
खेळाडू भिजताहेत घामानं
लाखभर प्रेक्षक करताहेत गर्जना
स्टेडियम भारलंय चैतन्यानं II३II
तिकडं खेडी ओस पडली आहेत
गोळीबाराच्या भीतीनं
तरुण मुलं होताहेत अपंग
राज्यकर्त्यांच्या हट्टानं II४II
इकडं तरुण चालून गेले
आंतर राष्ट्रीय खेळांसाठी
गोळ्या झाडल्या, भाले फेकले
पण ते पदकं मिळवण्यासाठी II५II
तिकडे लोक रस्त्यावर उतरतायत
निषेध व्यक्त करण्यासाठी
इथं लोक मिरवणुकी काढतायत
लाडक्या दैवतांच्या सन्मानासाठी II६II
तिकडं घरदार उध्वस्त झाल्यानं
मुलं देशोधडीला लागतायत
इकडं हातात टिपऱ्या घेऊन
मुलं दांडिया खेळतायत II७II
माणसं तशीच, रक्त तसंच
डीएनए देखील त्यांचा तसाच आहे
काय कारण असावं की इकडं शांती
आणि तिकडं वणवा पेटला आहे? II८II
पाणी तेच माती तशीच
पण फरक का ? हे कोडं आहे
अक्षांश -रेखांश वेगळे आहेत
एवढाच फरक समजला आहे II९II
पेराल तसं उगवेल म्हणतात
तिकडं संघर्षाचं पीक आलं आहे
इथं शांतीची बीजं रुजवली गेली
हे आपलं भाग्य आहे II १०II
२०/१०/२०२३ एकीकडे रशिया -युक्रेन युद्ध सुरु असतानाच, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास -इस्राएल युद्ध सुरु झाले. दोन्ही ठिकाणी सैनिकी आणि नागरी जीव हानीच्या क्लेशदायक बातम्या येत आहेत. आपल्याकडे नुकताच गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला आणि नवरात्राचा उत्सव जोरात सुरु आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर २०२३ मध्ये भारत आणि इतर अनेक देशांमधील तरुण-तरुणींनी एशियाड खेळांमध्ये भाग घेतला तर युक्रेन, रशिया, गाझा पट्टी आणि इस्राएल या ठिकाणच्या तरुण-तरुणींच्या वाट्याला रक्तपात आला.