देशमुख साहेब स्वतः आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ऑफिस मध्ये येण्या जाण्याच्या वेळे बाबतीत खूप काटेकोर असत. सखाराम काल ऑफिस मध्ये थोडा उशिरा आला होता हे त्यांना माहित होते. आजही तो वेळेवर आलेला नव्हता. ऑफिसची वेळ होऊन अर्धा तास होऊन गेला होता. ते कांही कारणाने त्यांच्या चेम्बरच्या बाहेर आले आणि तेव्हढयात सखाराम आला. तो आल्याआल्या साहेबांनी त्याला फायर करायला सुरवात केली. सखाराम खाली मान घालून फायरिंग झेलत होता. काय आजकाल रोज संध्याकाळी पार्टी असते की काय? साहेब कडाडले.
सखारामने खाली बघूनच नकारार्थी मान हलवली.
“अरे, तुम्ही तुमच्या वैयक्तिक वेळेत तुम्ही काय करावं या बाबत माझं कांही म्हणणं नाही पण ऑफिस मध्ये वेळेवर यायला नको का ?” साहेब म्हणाले. सखारामने मान न उचलताच होकारार्थी मान हलवली.
“मग? कुणाला बरं नाहीये का घरी? साहेबांनी विचारलं. सखारामने पुन्हा नकारार्थी मान हलवली.
“अरे, असं विनाकारण उशिरा येण्याचा अर्थ काय समजायचा? ऑफिसची कांही शिस्त आहे की नाही?” साहेब म्हणाले. साधारणपणे सखाराम वेळेवरच कामावर येत असे, चार-पाच मिनिटं उशीर झालाच तर धापा टाकत ऑफिस मध्ये पोचत असे. ऑफिसमधील सर्वांना लागेल ती मदत करण्याचे काम त्याच्याकडे होते त्यामुळे तो थोडावेळ जरी नसला तरी बोभाटा होत असे. सर्वांना मदत करताना तो कुठलीही कुचराई करत नसे, उत्साही स्वभाव आणि हसत काम करण्याची पद्धत त्यामुळे तो सर्वांचा आवडता होता. आज मात्र खांदे पडलेले आणि मान खाली असा उभा राहिलेला पाहून कांहीतरी गडबड आहे हे ऑफिस मधल्या सर्वांच्या लक्ष्यात आले होते, परंतु साहेबांचा पारा उतरेपर्यंत इतर कुणाचीही काही बोलण्याची ताकद नव्हती.
“अरे, कांही बोलशील की नाही? काय भांडण मारामारी झाली का कुठे?” साहेबांच्या आवाजातील धार कमी होऊन त्या जागी आता काळजीचा स्वर डोकावत होता.
“नाही साहेब, भांडण झालं, पण घरातच झालं” सखारामने मन थोडी वर करून सांगितलं. त्याचा चेहरा ओढल्यासारखा दिसत होता, डोळे रात्री नीट झोप न झाल्या सारखे दिसत होते.
“कुणाशी भांडलास, बायकोशी ?” साहेबांनी विचारले.
“नाही साहेब, माझी मुलगी गेले दोन दिवस माझ्याशी भांडते आहे” सखारामला हे बोलताना अवघडल्या सारखं होत होतं, पण कारण सांगितलं नसतं तर साहेबांनी पिच्छा सोडला नसता.
“अस्सं! अशी केव्हढी आहे तुझी मुलगी भांडण करायला आणि कशासाठी भांडते आहे तुझ्याशी?” साहेबांनी विचारले. “नऊ वर्षांची आहे, घराच्या जवळ फन फेअर लागली आहे, तिथं जायचं म्हणून हट्ट धरून बसली आहे, साहेब! सखाराम म्हणाला.
“मग जायचं नं घेऊन, फार तर काय, कांहीतरी खायचा हट्ट धरून पोट बिघडवून घेईल एव्हढंच” साहेब म्हणाले.
“नाही साहेब, हट्ट खाण्याचा नाही, तिला जायंट व्हील मध्ये बसायचं आहे” सखाराम म्हणाला.
“मग जा नं एक दिवस आणि बसंव तिला जायंट व्हील मध्ये” साहेब म्हणाले. साहेबांचा आवाज आता एकदम खालच्या पट्टीत आला होता, चेहऱ्या वरचा राग गेला होता आणि एक वेगळाच भाव आता चेहऱ्यावर दिसत होता.
” शक्य असतं तर नेलं असतं साहेब” एवढं बोलून सखारामने पुन्हा मान खाली घातली. का कोण जाणे, साहेबांनी हे संभाषण थांबवलं आणि चेम्बर मध्ये निघून गेले, इतर सगळे आपापल्या कामाकडे वळले. सखाराम कामाला लागला खरा, पण साहेबांनी बोलणं मधेच थांबवावं आणि चेम्बरमध्ये निघून जावं हे त्याला जरा विचित्र वाटलं. तासाभराने त्याला असं वाटलं की साहेबांच्या चेम्बर मध्ये जाऊन सॉरी म्हणावं. दारावर टकटक करून त्यानं दार किलकिलं केलं, साहेबांनी त्याला आत बोलावलं आणि बसायला सांगितलं.
“बरं झालं आलास, मी तुला बोलावणारच होतो” साहेब म्हणाले.
“साहेब, उशीर झाल्याबद्दल सॉरी म्हणायला मी आलो आहे” सखाराम म्हणाला.
“ते ठीक आहे, उशीर करणं हे चूक, पण तू सांगितलेल्या कारणावरून मला एकदम माझ्या बालपणाची आठवण झाली. मी असाच लहान असताना जत्रेत जायंट व्हील वर बसायचा हट्ट केला होता, पण कुणी जत्रेत घेऊन गेलंच नाही. जत्रा निघून गेली, मीही विसरून गेलो. पण मगाशी तुझ्या बरोबर बोलताना मला एकदम लक्षात आलं की माझं जायंट व्हील मध्ये बसायचं राहूनच गेलंय. आता बसायचं म्हटलं तरी बसता येणार नाही” साहेब हसत म्हणाले.
साहेबांना हसताना पाहून सखारामच्या मनावरचं दडपण एकदम निघून गेलं. साहेबांच्या समोर एक पाकीट होतं ते त्यांनी उचलून सखारामला दिलं. सखारामनं पाकीट उघडलं, त्यात पाचशे रुपये होते.
“साहेब हे काय आहे?” सखारामनं विचारलं.
“हे फन फेअर साठी” साहेब म्हणाले.
“साहेब मी आधीच खूप उसने घेऊन बसलोय, तेच परत करणं अवघड होऊन बसलंय, आणखी हे कशाला? सखाराम म्हणाला.
“हे मी तुला थोडेच देतोय! हे आजोबांनी त्यांच्या नातीसाठी दिलेली भेट आहे” साहेब म्हणाले.
“आपण म्हणतो गेलेली वेळ परत येत नाही, खरंय ते. पण गेलेल्या वेळेचा आनंद, अनुभव आपण घेऊ शकतो, ते आपण कसा विचार करतो त्यावर अवलंबून असतं. माझ्या बालपणातील निसटलेले अनुभव आता मला स्वतःला घेता येणार नाहीत, पण इतर मुलांना त्या अनुभवाची मजा घेताना पाहून मला आनंद मिळतो. आज असं कर, संध्याकाळी मुलीला आणि बायकोला बरोबर घेऊन फन फेअर मध्ये जा, मुलीला जायंट व्हील मध्ये बसव नंतर चांगला स्वच्छ स्टॉल बघून सामोसा, पाणीपुरी असं कांहीतरी खा. त्यासाठी आजचा दिवस ऑफिसमधून अर्धा तास आधी गेलास तरी चालेल. “पण एक गोष्ट लक्ष्यात ठेवायची ,” साहेबांच्या आवाजात पुन्हा करडेपणा आला होता, त्यामुळे सखाराम थोडा बिचकला, चेहऱ्यावर मोठं प्रश्नचिन्ह घेऊन त्याने साहेबांकडे पाहिले.
“उद्या सकाळी ऑफिसला वेळेवर हजर राहायचं!” साहेब चेहरा शक्य तितका गंभीर ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणाले.
वाटलं होतं त्यापेक्षा घातलेली अट सोपी निघाल्यामुळे सखारामच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं, ते लपवण्यासाठी त्याने मान खाली घातली. कांहीतरी चांगलं घडतं आहे याचा आनंद देशमुखांच्याही चेहऱ्यावर दिसणं साहजिकंच होतं पण सखाराम खाली पाहत असल्याने त्यांना तो त्यांना तो लपवावा लागला नाही.
सुरेश गोपाळ भागवत, ३०/०१/२०२४.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *