शाळेत असताना कोणत्या तरी इयत्तेच्या  पाठ्य पुस्तकात एक धडा होता. ती एक काल्पनिक गोष्ट असावी. एक मुंगी पाण्याबरोबर वाहत जात होती. वरती फांदीवर पक्षी बसला होता, त्याने फांदीचे पान  तोडून पाण्यात टाकले. मुंगी त्यावर चढली आणि किनाऱ्याला लागली, तिने पक्ष्याचे आभार मानले आणि दोघेही आपापल्या कामासाठी निघून गेले. एके दिवशी तो पक्षी झाडावर बसलेला असताना एक शिकारी त्यावर बाण  सोडण्याच्या तयारीत होता. गवतात फिरत असलेल्या मुंगीने ते पहिले. ती शिकाऱ्याच्या पायावर चढली आणि तो  बाण  सोडण्याच्या क्षणी  त्याला कडकडून चावली. शिकाऱ्याच्या नेम चुकला, पक्षी सावध  झाला आणि उडून गेला.  एका सजीवाने  दुसऱ्या सजीवावर केलेल्या उपकाराची फेड दुसऱ्याने  केली आणि दोघेही संकटातून वाचले, अशी उपकाराची महती सांगणारी ही  गोष्ट, आतल्या थरावर या गोष्टीत आशावादाचे महत्व सांगितलेले आहे. आज या गोष्टीची आठवण होण्याचे कारण म्हणजे आज बागेत घडलेली घटना. 

दुपारी बारा वाजण्याचा सुमार होता. आमचे सकाळचे काम संपवून मी व सदानंद (बागेत काम करणारा) परतीच्या वाटेवर होतो. मी अडुळशाच्या झाडा  जवळच्या पायऱ्या उतरत होतो, सदानंद माझ्या पुढे होता. पायऱ्या उतरताना एक नवीनच  आवाज कानावर पडला. “हा  कोणत्या पक्ष्याचा आवाज आहे ?” मी  सदानंदला विचारले.  “पोपटाचा आहे” सदानंद म्हणाला.   मी ज्या वरवर पणे प्रश्न विचारला होता तितक्याच वरवर पणे  सदानंदने उत्तर दिले होते. पुन्हा जेव्हा तो आवाज आला तो जरा मांजराच्या आवाज सारखा वाटला, तसे आम्ही एकमेकाला म्हणालो देखील, परंतु पुन्हा  आवाज आल्यावर सदानंदने जे सांगितले त्याचे मला आश्चर्य वाटले.

सदानंद म्हणाला की  साप जेंव्हा बेडूक पकडतो तेव्हा बेडूक असा आवाज काढून ओरडतो. मला त्या आवाजाचे आश्चर्य तर वाटलेच परंतु सदानंदने अशी घटना किती वेळा पाहिली असेल, आवाज किती वेळा ऐकला  असेल आणि कितपत अचूकतेने स्मरणात राहिला असेल या बाबत मनात शंका ही निर्माण झाल्या. मी विचारात असतानाच सदानंदने त्या दिशेने चालायला सुरवात केली होती, त्याच्या मागोमाग मी ही  निघालो. झुडुपांमधून मार्ग काढत २५-३० पावले पुढे गेलो पुढे कुंपण होते, त्यापुढे २०-२२ फूट रुंदीचा ओढा. आवाज ओढ्याच्या पलीकडून येत होता. आम्ही दोघेही कानोसा घेत होतो आणि डोळे  ताणून पाहत होतो की आवाज  नक्की कुठून येतो आहे. एक दोन वेळा आणखी ऐकल्यावर आमचे एकमत झाले की जो कोणी आवाज करतोय तो झाडावर फार उंच नाही आणि फार दूर नाही. दोन तीन मिनिटे आम्ही गप्प  राहून न्याहाळत होतो. एकदम सदानंदला  जमिनीवर साप  दिसला, त्याने मला कुठे आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला पण मला कांही दिसे ना. हालचाल व्हावी म्हणून त्या दिशेने मी एक खडा देखील फेकला पण कांही झाले नाही.   शेवटी एकदाचा दिसला. ओल असल्यामुळे काळी  दिसणारी माती, काळसर रंगाचे दगड, पाला पाचोळा यात तो साप  अगदी बेमालूम मिसळला होता. थोडी हालचाल झाली आणि सदानंदला बेडूक देखील दिसला. थोडी आणखी हालचाल झाल्यावर मलाही दिसला. चांगला बंद मुठी एव्हढ्या आकाराचा बेडूक होता आणि सापाने त्याच्या मागच्या पायाची मांडी तोंडात पकडली होती. पुढचे दोन पाय हलवून बेडूक निसटायचा प्रयत्न करत होता आणि मधून मधून ओरडत होता. दोन टरबुजाच्या  आकाराच्या दगडांच्या मध्ये असलेल्या फटीच्या अलीकडे बेडूक आणि सापाचे तोंड होते  आणि दगडांच्या पलीकडे बाकीचा साप  होता, तीन फूट लांबीचा पाण्याच्या जवळ राहणारा  दिवड नावाचा बिनविषारी साप  असतो तो असावा. आमची कुजबुज ऐकून असेल किंवा आणखी कांही असेल, बेडकाची धडपड वाढली. आमच्या पासून अंतर ३५-४० फूट असेल. सावली असल्याने डोळ्यांना दिसत होते पण मोबाईलवर फोटो काढणे शक्य नव्हते. मध्ये कांही क्षण स्थिरतेचे गेले. आम्ही आपापसात काय झाले असेल याची चर्चा करत होतो तेव्हढ्यात बेडकाने जोर लावला आणि पाय झाडायला सुरवात केली, दगडाला रेटा देऊन बेडूक पुढे सरकण्याचा प्रयत्न करू लागला, साप  बेचक्याच्या अरुंद पणामुळे बेडकाला सहजा सहजी पलीकडे ओढू शकत नव्हता. शेवटी बेडकाची धडपड यशस्वी झाली आणि सापाने त्याला सोडून दिले. एक उडी मारून बेडूक तीनचार फूट पुढे आला, त्याच्या मागच्या पायाच्या मांडीला रक्ताचा लाल रंग दिसत होता. थकल्यामुळे असेल, तो एका जागेवर बसून राहिला.  सापाने दगडांच्या बेचक्यातून तोंड मागे घेतले आणि एका हालचालीत दिसेनासा झाला.

बेडकाचे जीव वाचल्याने मला आनंद झाला आणि या घटनेचे आश्चर्य वाटत राहिले. बेडकाचा तो विशिष्ट आवाज आमच्या कानी पडणे, तो सदानंदला ओळखता येणे. आमचा आवाज ऐकून किंवा नजरेस पडल्याने बेडकाला धडपड करावीशी वाटणे आणि सापाला  असुरक्षित वाटल्याने त्याने माघार घेणे हे सर्वच आश्चर्यकारक होते. बेडूक साध्या आवाजात ओरडला असता तर आम्ही त्याकडे लक्ष दिले नसते, सदानंदला अनुभव नसता  तर त्याने आवाज ओळखला नसता आणि आमची चाहूल लागली नसती तर सापाला असुरक्षित वाटले नसते. शक्यतेचे गणित मांडले तर असे कांही घडण्याची शक्यता फारच कमी असेल, पण बेडकाच्या जिवाच्या आकांताने ओरडण्याने ती सूक्ष्म  शक्यता शंभर टक्क्यात बदलली.

पण कांही प्रश्नांची उत्तरे अजून सापडत नाहीत; बेडकाला असा वेगळा आवाज काढण्याचे कोण शिकवते? माणसा खेरीज या आवाजाचे महत्व इतर कोणाला कळत असेल? आणि इतर कोणा  प्राण्याला कळत असेल तर ते बेडकाला मदत करत असतील?

या प्रश्नांना उत्तरे असतील किंवा नसतील परंतु एक गोष्ट अगदी नक्की, अक्षरश: मृत्यूच्या तोंडात असलेल्या बेडकाने आशा सोडली असती आणि गप्प राहिला असता  तर त्याचा शेवट निश्चित होता. त्याने आशा सोडली नाही म्हणून त्याला जीवदान  मिळाले, म्हणून परिस्थिती कशीही असो, आशा सोडू नका.

 -सुरेश गोपाळ भागवत, ०७/१०/२०२४. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *