नेति नेति
आयुष्य म्हणजे दात आणि चण्याच्या म्हणी सारखं झालंय! असं वाटतंय की विधाता मला एखाद्या एखाद्या गोष्टीच्या बदल्यात दुसरी देतोय. काकांनी सांगितलेल्या गोष्टी अनुभवाला येत होत्या. काका भेटले त्यानंतर वाटत होतं की मला एक असा मार्गदर्शक मिळाला आहे ज्याची मला अनेक वर्षे उणीव भासत राहिली होती. शिक्षणात रस वाटेना म्हणून उच्च शिक्षण मधेच सोडलं. कोणा दुसऱ्यासाठी काम करावंसं वाटेना म्हणून नोकरी सोडली, लिखाण करू लागलो. वर्तमान पत्रं, साप्ताहिकं, मासिकं अशा अनेक ठिकाणी लिहीत होतो, परंतु भक्कम असं कांही आकाराला येत नव्हतं. एखादी कादंबरी लिहावी असं मनात होतं. दोन पिढ्यातील संघर्ष मला माझ्या पद्धतीनं मांडायचा होता पण कथानक आकार घेत नव्हतं.
असाच एके दिवशी ‘चोखंदळ प्रकाशन’च्या कार्यालयातून बाहेर पडलो होतो, अचानक पाऊस सुरु झाला. माझ्या पिशवीत छत्री होती, पण ती जरा नादुरुस्तच होती म्हणून रिक्षा केली. थोडा पुढं जातो तर रस्त्याच्या बाजूला एक वयस्कर गृहस्थ रिक्षाला थांबण्यासाठी हात करत होते. मी रिक्षावाल्याला त्यांच्या जवळ थांबायला सांगितलं. रिक्षा थांबताना पाहून ते गृहस्थ पुढं आले, पण मला आत बसलेला पाहून त्यांची निराशा झाली, ते दोन पावलं मागं सरकले. मी आत बसूनच त्यांना कुठं जायचंय विचारलं. ते कांहीच बोलले नाहीत. मी खाली उतरलो, त्यांना जिथं जायचंय तिथं सोडतो असं सांगितलं पण ते तयार झाले नाहीत. मी रिक्षावाल्याला सांगितलं, “मी झालेले पैसे देतो, पुढं यांना घेऊन जा”. रिक्षावाला तयार झाला पण ते गृहस्थ तयार नव्हते. पाऊस वाढला होता, मी त्यांना कळकळीनं रिक्षात बसण्याची विनंती करत होतो. शेवटी ते तयार झाले. रिक्षा थोडी पुढं गेल्यावर थांबायला सांगून, रिक्षावाल्याला कांही पैसे देऊन ते निघाले. पाऊस कमी झाला होता पण बुरबुर चालू होती. ते एका अरुंद रस्त्याच्या दिशेनं चालू लागले. रिक्षावाल्याला तिथंच थांबायला सांगून मीही खाली उतरलो, जवळची छत्री उघडून दोघंही न भिजतील अशी धरून मी चालू लागलो. कांही पावलं पुढं गेल्यावर समोर चाळीसारखी इमारत होती, तिच्या जवळ पोचल्यावर ते गृहस्थ थांबले, धन्यवाद म्हणाले आणि एका दाराच्या दिशेनं गेले. या सगळ्या प्रसंगात संभाषण कांही झालंच नाही. त्यांची ती उंच सडपातळ अंगकाठी आणि सैलसर कपडे एवढ्याच गोष्टी लक्षात राहिल्या. मी परत आलो, रिक्षानं घरी पोचलो. प्रसंग साधाच होता, पण माझ्या मनात घोळत असलेल्या कथानकासाठी व्यक्तिरेखा मला मिळाली असं मला वाटलं. कांही दिवस गेले, मी मधून मधून त्या कथानकाचा विचार करत होतो, पण प्रगती होत नव्हती. असं वाटायचं की त्या गृहस्थांना जाऊन भेटावं, परंतु त्यांच्या वागण्यातला अलिप्तपणा आठवून मी तो विचार मनातून काढून टाकत होतो. एके दिवशी पुन्हा ‘चोखंदळ’ च्या ऑफिसमध्ये गेलो. मी आत जात होतो तेंव्हा ते गृहस्थ बाहेर पडताना दिसले, ते खाली बघून चालत होते त्यामुळे त्यांनी मला पहिलं नाही. मी त्यांच्याशी बोलावं म्हणून थांबलो, पण ते त्यांच्याच तंद्रीत होते, संथ पावलं टाकत निघून गेले. मी ओफिसमध्ये गेलो. लिहिलेलं हस्तलिखित संपादक जोशी यांच्या हातात दिलं, त्यांनी त्यावर नजर टाकली आणि म्हणाले “ठीक आहे थोडे बदल करावे लागतील ते करून घेतो”. ते काम झाल्यावर मी जोशींना विचारलं “मी यायच्या आधी तुम्हाला एक वयस्कर गृहस्थ भेटायला आले होते का?” ” हो, का बरं?” जोशींनी विचारलं. मी मागे घडलेला प्रसंग जोशींना सांगितला. जोशी किंचित हसले आणि म्हणाले “आम्ही सर्व त्यांना काका म्हणतो. ते गेली कांही वर्षं नियमितपणे लिखाण आणून देतात, चांगलं असतं. मुख्य म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया चांगल्या असतात. दोन तीन टोपण नावाखाली ते लिहितात, त्यांचं खरं नाव मला माहित असलं तरी, त्यांच्या सूचनेनुसार आम्ही ते कोणाला आपण होऊन सांगत नाही. काकांविषयी माझं कुतुहूल आता वाढीला लागलं होतं. मी जोशींना विनंती केली की माझी काकांशी औपचारिक ओळख करून द्या, त्यावर जोशी हसले आणि म्हणाले “काकांकडे औपचारिकता चालत नाही, पण पाहू या काय करता येईल ते”. मी होतकरू लेखक असलो तरी जोशी मला खूपच मदत करत असत, त्यामुळं जोशींच्या तेव्हढ्या आश्वासनानंही मला आनंद झाला.
एके दिवशी जोशींचा फोन आला, जमल्यास लगेच ऑफिसमध्ये या म्हणाले. मी ताबडतोप निघालो. ऑफिसमध्ये जोशी आणि काका बसले होते, मी दोघांनाही नमस्कार करून उभा राहिलो. जोशींनी मला बसायला सांगून सरळ विषयाला हात घातला. माझं एक हस्तलिखित त्यांनी काकांना दाखवलं होतं, काकांनी त्यात सुधारणा सुचविल्या होत्या. त्या खरोखरच चांगल्या होत्या. संभाषण तिथंच संपलं. काका उठून निघून गेले. जोशी बरेच उत्साहित दिसले, काकांच्या प्रतिसादामुळं त्यांना खात्री झाली होती की काकांचा आणि माझा परिचय वाढत जाणार आहे, आणि झालं तसंच. हळू हळू माझं बरंचसं लेखन काका वाचून त्यावर सूचना देऊ लागले. इतर बातचीत होत नव्हती पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचं मला दर्शन होऊ लागलं होतं.
एकदा काकांच्या प्रकृतीत किरकोळ बिघाड झाल्याच्या कारणानं ते घराबाहेर पडत नव्हते, त्यांच्यासाठी कांही वस्तू पाठवायच्या आणि त्यांचं हस्तलिखित आणण्याच्या निमित्तानं जोशींनी मला काकांच्या घरी पाठवलं. काका निजून होते, बारीक ताप होता, थोडा खोकलाही होता. जोशींनी बहुधा कांही औषधं पाठवली असावीत. काकांच्या घराचं वर्णन म्हणजे ती निव्वळ कार्यभूमी होती. कामाच्या वस्तू जागोजाग होत्या त्यांच्या अधे मधे काका वावरत असावेत. असं असलं तरी स्वछता लक्ष्यात येण्यासारखी होती. त्यानंतर कांही ना कांही निमित्तानं मी काकांच्या घरी जाऊ लागलो. त्यांचं वागणं, बोलणं यातून मला बरंच कांही शिकायला मिळत होतं. त्यांच्या सुचनांमुळं माझ्या लिखाणात चांगला फरक पडला होता, त्याखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आधारावर माझ्या भावी कादंबरीतील जुन्या पिढीतील व्यक्तीची व्यक्तिरेखा बेतायची हे माझ्या मनात निश्चित झालं. काकांच्या घरात त्यांच्या पूर्वायुष्याच्या आणि त्यांच्या आवडीनिवडीच्या कांहीच खुणा नव्हत्या. कुठलाही फोटो नव्हता, कांही शोभेच्या वस्तू नव्हत्या, एक छोटं टेबलावर ठेवण्याचं, घडीचं कॅलेंडर होतं ते देखील बिन चित्राचं. थोडीशी पुस्तकं होती, त्यातली बहुतेक वाचनालयातील होती. लिहिण्याची सामग्री मात्र भरपूर दिसत होती.
काकांकडे माझं जाणं येणं नियमितपणे सुरु होतं परंतु मोठं संभाषण असं कधी झालं नाही. छोट्या छोट्या संभाषणातून मी त्यांच्या विषयीच्या माहितीचे धागे जुळवत होतो. बऱ्याच वेळेला माझं मलाच आश्चर्य वाटायचं की मला त्यांचा सहवास का इतका मोलाचा वाटावा? एक गोष्ट माझ्या लक्ष्यात आली होती, ती म्हणजे काका स्वतंत्र विचाराचे होते, त्यांना कुणीही सूचना केलेली आवडत नसे. चूक किंवा बरोबर स्वतःच्या विचारानंच ठरवायचं असा त्यांचा स्वभाव होता, त्यामुळं दुसऱ्या कोणाची स्तुती करण्याचा किंवा कोणावर टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नसे. त्यांची संपूर्ण विचारशक्ती त्यांना काय करायचं आहे त्यावर काम करीत असे. त्याचा परिणाम उघडच होता, त्यांना जे काय करायचं ते विशिष्ट वेळेत आणि विशिष्ट प्रतीचं होणार हे निश्चित असे. काकांचा शब्द संग्रह अफाट होता आणि त्यांची कल्पनाशक्ती अमर्याद होती. त्यांच्या लिखाणात मोजक्याच शब्दांचा अचूक वापर असे. त्यांच्या मतानुसार गद्य आणि पद्य हे दोन्ही प्रकार तितक्याच काटेकोरपणानं लिहिले पाहिजेत. काकांच्या या स्वतंत्रपणाचं आणि अचूकपणाचं मला आकर्षण वाटत असावं. माझ्या नोकरी न करण्यामागं आणि लिखाण सुधारण्याच्या तीव्र इच्छेमागं तीच कारणं असावीत. काकांच्या व्यक्तिमत्वाला समजावून घेता घेता मी स्वतःला समजून घेत होतो.
काकांच्या पूर्वायुष्याबद्दल ते कधीच बोलले नाहीत आणि मी जेंव्हा विचारायचा प्रयत्न केला तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी मोठ्या कौशल्यानं संभाषण वर्तमानातील कार्यक्रमांवर आणलं होते. अशी दोन वर्षं गेली असतील, कादंबरीच्या बाबतीत कांही भरीव प्रगती झाली नव्हती परंतु माझं बाकी लिखाण चांगलं चाललं होतं आणि काकांचं मार्गदर्शन आणि जोशींचा पाठिंबा यामुळं माझे सगळे चांगले ग्रह योग्य ठिकाणी जमा झाले असावेत असं वाटत होतं. मला या व्यक्ती महत्वाच्या होत्या, त्यांच्या सानिध्यात कामाची प्रगती आपोआपच होणार होती.
एके दिवशी काकांच्या घरी गेलो तर ते निजलेले दिसले. सर्दी-पडसं, बारीक ताप आहे म्हणाले. मी बाहेर जाऊन आलं, गवती चहा घेऊन आलो, त्याचा चहा करून काकांना दिला. त्या दिवशी आपण होऊन म्हणाले “आयुष्याच्या मार्गावर वळण घेण्याची वेळ आली आहे”. मला त्यांना त्याचं स्पष्टीकरण विचारावंसं वाटलं परंतु सर्दी-खोकला असल्यानं त्यांनी बोलणे योग्य नाही असा विचार करून मी गप्प राहिलो. त्यानंतर एकदोन दिवस मी इतर कामात गुंतलो होतो, फोन करून काकांची प्रकृती कशी आहे याची चौकशी केली, प्रकृती ठीक आहे म्हणाले. त्यानंतर आठवडा गेला असेल. मला जोशींचा फोन आला, ऑफिसमधे या म्हणाले. मी गेलो तेंव्हा ते इतर दोघांशी चर्चा करत होते. मी गेल्यावर जोशींनी चर्चा आवरती घेतली आणि मला बोलावून घेतलं. जोशींच्या चेहऱ्यावर आज नेहमीचं मनमोकळं हास्य नव्हतं, स्मित होतं पण ते असमर्थतेचं. कांही क्षण ते कांही बोलले नाहीत, मग टेबलाच्या कपाटाचा कप्पा उघडून त्यांनी एक पिशवी काढली आणि टेबलावर ठेऊन म्हणाले “हे काकांनी तुला देण्यासाठी दिलं आहे. “म्हणजे?” त्यांनी मला बोलावून न देता जोशींकडे द्यावं याचं आश्चर्य वाटून मी विचारलं. “म्हणजे असं की, काका त्यांच्या गावी निघून गेले आहेत. जाण्याची वेळ आली होती इतकंच म्हणाले. “गावी म्हणजे कुठं? आणि इतकं अचानक का गेले? ” मी विचारलं. “मी चौकशी करण्याचा प्रयत्न केला, पण काका कांही बोलले नाहींत. तुमचा सहवास आणि सहकार्य अतिशय आनंददायक होतं असं म्हणून शुभेच्छा देऊन निघून गेले”, जोशींचं मन अस्वस्थ होतं पण ते प्रयत्नपूर्वक शांतपणे बोलत होते. मी तर चक्रावूनच गेलो. काय झालं असेल? प्रकृती बिघडली असेल का? कांही अडचणी आल्या असतील का? की नाराज होऊन निघून गेले? माझ्या मनातला गोंधळ जोशींना चेहऱ्यावर दिसला असावा. ते म्हणाले “हे घेऊन जा, पहा त्यात कांही उत्तर मिळतं का, आणि हो, आपलं सहकार्य वृद्धिंगत व्हावं यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत”. मी ती पिशवी उचलली आणि जोशींचे आभार मानून उद्या येतो असं सांगून बाहेर पडलो. उत्सुकता आणि उत्तर शोधण्याची आस इतकी प्रबळ होती की घरी जाई पर्यंत धीर धरवेना. नेहमी चहाला जायचो ते हॉटेल जवळंच होत, चहाची ऑर्डर दिली आणि पिशवी उघडली, एक पत्रवजा लिहिलेला कागद होता आणि कांही वह्या होत्या. मी पत्र वाचू लागलो, औपचारिक सुरवात नव्हतीच, सरळ मायनाच लिहिलेला होता. “आपली गाठ पडणं याला विधिलिखित म्हणता येईल किंवा योगायोग म्हणता येईल, मी हा योगायोग समजतो. आपल्या दोघांच्या वयात इतकं अंतर असूनही आपली मैत्री जमली, हो! मैत्रीचं म्हणेन मी. आपुलकीची भावना हा आपल्या मैत्रीचा आधार झाला. इतर मित्र जसं दिलखुलास बोलतात तसं मात्र आपण बोललो नाही, कारण तशी माझी सवयच नव्हती. तरीही तुझ्या वागण्यातील सचोटी आणि कामावरची निष्ठा यामुळं मला तुझा स्वभाव पसंत पडला. माझ्या वागण्याबद्दल, पूर्वायुष्याबद्दल तू जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतास, माझ्या दृष्टीनं ते महत्वाचं नव्हतं, पण तरीही तुझं मन मोडायचं नाही म्हणून मी माझ्या पूर्वायुष्याबद्दल लिहिलेलं सोबतच्या वहीत आहे, ते ठेवून जात आहे.
माझ्या जीवनाच्या वाटेवर आता संपूर्ण वेगळं वळण आहे. ज्या जवळच्या नातेवाईकांच्या संमतीनं मी स्वतःला संपूर्ण अलिप्त केलं होतं, त्यांच्यात पुन्हा जाऊन मिसळण्याची वेळ आलेली आहे. मी आतापर्यंत माझ्या पद्धतीनं जगाकडं बघण्याचा प्रयत्न केला. सुखाला कधी यश आणि दुःखाला अपयश मानलं नाही, नात्याला बंधन न मानता आधार मानलं. एक गोष्ट जी मला जाणवली ती ही की, माझ्या व्यक्तिमत्वाची आणि सभोवतीच्या जनांची सुसंगती झालीच नाही. व्यक्ती आणि समाज हे सतारीच्या तारांसारखे सुसंगत असायला हवेत; एक तार वाजवली की दुसरी झंकारली पाहिजे. बऱ्याच वेळेला तसं होत नाही, आणि म्हणून आयुष्य ही एक कवायत होऊन बसते. या कवायतीत लोक सुखी दिसतात कारण त्यांचे संबंध घट्ट विणलेले असतात, त्याला आपण नाळ जुळलेली असणं म्हणतो. माझ्या बाबतीत मात्र असं झालं की जन्माच्या वेळी जी नाळ तुटली ती त्यानंतर कुठं जुळलीच नाही. मी याचा गुण-दोषांमधे अर्थ लावण्याचा प्रयत्न कधी केला नाही, तर परिस्थिती म्हणून त्याचा स्वीकार केला. मी ध्येय, आदर्श यामधे न गुंतता केवळ सचोटीनं कमावलेलं समाधान याचा पाठपुरावा केला. क्षितिजापर्यंत पोचावं अशा विचारानं वाटचाल करावी आणि प्रत्येक टप्प्यावर पोचल्यानंतर तो टप्पा म्हणजे क्षितिज नव्हे हे लक्ष्यात यावं, हाच आतापर्यंतचा अनुभव आहे. परंतु एखाद्या टप्प्यावर पोचल्यानंतर मनाची तहान भागेल अशी आशा आहे, आणि त्याचा शोध घेणं हे सुरु राहिलं पाहिजे. मी जे केलं त्याबद्धल मी समाधानी आहे आणि म्हणून, नेहमीची संज्ञा वापरायची झाली तर मी यशस्वी आहे. लोकांनाही मी समाधान देण्याचा प्रयत्न केला, अनेकांनी माझ्या या कामामधे हातभार लावला. ‘चोखंदळ’ चे जोशी आणि तू अशा व्यक्तींपैकी आहात. तुझ्या वागण्यात मला माझ्या स्वभावाची झलक दिसली आणि म्हणूनच नाळ जुळू लागल्याचा अनुभव मला येऊ लागला. परंतु आयुष्याची ही पायरी ओलांडण्याची वेळ झाल्यानं मी स्थलांतर करतो आहे. सुरवंटाचं फुलपाखरू झाल्यानंतर त्यानं फक्त फुलपाखरू म्हणूनच जगायचं असतं, पूर्वायुष्याचा विचार करायचा नसतो, तसंच मी आयुष्याच्या पुढच्या वाटेवर मार्गक्रमण करणार आहे. माझा शोध घेण्याची आवश्यकता नाही, आणि तसं करू नये. तुझ्या कारकिर्दीला शुभेच्छा म्हणून माझी एक वही तुझ्या हवाली करत आहे. त्यातलं लिखाण हे कोणत्याही स्वरूपात तुझ्या उपयोगी पडावं अशी माझी इच्छा आहे, स्वीकार करावा, जोशींचं सहकार्य घ्यावं. शुभेच्छा -काका.
पत्राची पुन्हा घडी केली आणि पिशवीत ठेवलं. चहाचे पैसे देऊन निघालो. रिक्षा करून घरी गेलो. मनात विचारांचा गोंधळ चालला होता. काकांनी पत्रात लिहिलेलं पटत होतं पण पचवणं अवघड होतं. घरी पोचल्यावर पिशवीतली जाडजूड वही काढली. बरीचशी पानं त्यांच्या बालपण पासूनच्या घटनांची टिपणं होती, कांही भाग नजरे खालून घालताना असं वाटलं की एखादी गूढ कथा उलगडते आहे. गद्य ओळींच्या दरम्यान कांही पानावर कविता स्वरूपात लिहिलेल्या ओळी होत्या
एक नाळ तुटली, दुसरी जुळलीच नाही
मनाच्या दर्याला भरती कधी आलीच नाही …
पुढच्या ओळींमध्ये समाजाशी सुसंगती न जुळल्यानं लौकिक अर्थानं ज्याला यश, प्रसिद्धी वगैरे म्हणतात त्यापासून ते कसे दुरावले याचं वर्णन होतं. कांही पानं उलटली, पुन्हा एक कविता दिसली
अंग अंग नवरंग बहरले परि तयांना नाही दृष्टी गंधज्ञान न नशिबी ज्यांच्या ते गंधांची करिती वृष्टी ….
सुंदर रंगांची आणि सुगंधी फुलं ही फुलझाडं स्वतःसाठी नव्हे तर इतरांच्यासाठी निर्माण करतात अशी सुरवात होती, काकांच्या आयुष्याच्या तत्वज्ञानाची ओळख करून देणारी कांही उदाहरणं निसर्गातून निवडून त्यांनी कविता लिहिली होती.
शेवटी काय लिहिलं आहे या बद्दल उत्सुकता न आवरता आल्यानं शेवटची पानं पहिली. शेवटी एक कविता होती,
तुला भेटण्याची मला घाई नसली तरी उत्सुकता नक्की आहे तुझ्याशी चर्चा करण्याच्या मुद्यांची यादी तयार आहे जन्मापासून आम्ही, तू मांडलेला खेळ खेळतो आहे खेळविणाऱ्याने तोंडच दाखवायचे नाही याला काय अर्थ आहे? खेळसुद्धा असा की नियमाला कांही नियम नाही बालपणातले समजू लागेपर्यंत तारुण्यातले वेगळेच कांही! ….
प्रत्यक्ष विधात्याशी भेट होईल तेंव्हा काय चर्चा करायची याचे मुद्देच जसे त्यांनी काढून ठेवले होते.
मी कादंबरीसाठी एक व्यक्तिरेखा शोधत होतो, काकांनी तर एक खजिनाच माझ्या हवाली केला होता. वही मिटली आणि डोळेही मिटले. पापण्यांच्या आत ओलसरपणा जाणवत होता. काकांच्या तत्वज्ञानानुसार परिस्थितीचा स्वीकार करून पुढं जायचं असतं. परंतु लेखक होऊन नाव कमावण्यापेक्षा काकांच्या सहवासानं मी जास्त समाधानी झालो असतो असं मला त्याक्षणी वाटलं.
-सुरेश गोपाळ भागवत (१०/१०/२०२५).
