साहेबांचा जपानी भाचा
बिटबाइट टेक कंपनी कर्मचाऱ्यांच्या संख्येनं लहान होती परंतु कार्यक्षमतेच्या बाबतीत खूपच नावाजलेली होती. कंपनीत काम करणारा प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात तरबेज तर होताच, परंतु स्वतःचं काम सर्वोत्कृष्ट असावं या विचारानं झपाटलेला होता. या बाबतीत सर्वात आघाडीवर होते कंपनीचे संस्थापक आणि सीइओ देवरे साहेब. त्यांची नैसर्गिक बुद्धिमत्ता, तांत्रिक कौशल्य आणि व्यवसायाचं कसब वाखाणण्या सारखं होतं, पण त्याखेरीज विचारानं ते नेहमी सर्वांच्या पुढे असत. कंपनीत रोज कांहीतरी नवीन असे आणि त्यामुळं कंपनीत काम करणं हे काम न वाटता रोमांचक अनुभव वाटत असे. काल संध्याकाळी त्यांनी एक छोटीशी मीटिंग घेऊन सर्वांना सांगितलं की त्यांचा जपानमध्ये राहणारा भाचा उद्या कंपनीत येणार आहे, त्याला कांही वर्षे भारतात काम करण्याची इच्छा असल्यानं उद्याची त्याची भेट त्या दृष्टीनं असणार आहे. सरांचे वरिष्ठ सहकारी मोरवे आणि इतरांना देखील थोडं आश्चर्य वाटलं कारण सरांनी त्यांचा भाचा जपान मध्ये असल्याचे आधी कधीच कोणाला सांगितलं नव्हतं.
दुसऱ्या दिवशी सकाळीच साहेब त्यांच्या गाडीतून भाच्याला घेऊन आले. साहेबांच्या आणि भाच्याच्या चेहऱ्यात बिलकुलच साम्य नव्हतं, परंतु सामान्य महाराष्ट्रीय व्यक्तीच्या चेहरेपट्टीचा असं वर्णन करता आलं असतं. त्याची चालण्याची ढब मात्र जरा वेगळी वाटत होती, जपून पावलं टाकावी तसा तो चालत होता. साहेबांनी सर्वांना बोलावून ओळख करून दिली “हा माझा भाचा किरण, आज दिवसभर तो तुमच्या बरोबर राहील, कंपनीचं ऑफिस, कामकाज पाहील आणि संध्याकाळी माझ्या बरोबर परत जाईल”, त्यानंतर त्यांनी सर्वांची नावं किरणला सांगितली. प्रत्येकाचं नाव ऐकल्यावर त्यानं मान डोलावून प्रत्येकाला हात जोडून नमस्कार केला. जपानमध्ये रहात असला तरी किरण भारतीय पद्धतीनं नमस्कार करताना पाहून सर्वांना थोडं आश्चर्य वाटलं.
“मोरवे, याला प्रथम तुम्ही घेऊन जा” साहेब म्हणाले, त्या नुसार इतर सर्व आपापल्या कामासाठी गेले आणि मोरवे किरणला घेऊन निघाले. “ही आपली कॉम्पुटर रूम, प्रोसेसर्स इथे ठेवले आहेत, त्यामुळं एसी वीस डिग्रीला ठेवलेला असतो. हा लॅब कोट अंगात घाला” स्वतः हँगरवर ठेवलेला एक कोट घालून दुसरा किरणच्या हातात देत मोरवे म्हणाले. “अंगात कोट म्हणजे, कोटात अंग” हलक्या आवाजात किरण स्वतःशी पुटपुटल्याचं मोरवेना ऐकू आलं. त्यांनी किरणला तांत्रिक माहिती दिली, किरणनं ती लक्षपूर्वक ऐकली. कॉम्पुटर रूम मधून बाहेर आल्यावर मोरवे म्हणाले “आपण इथेच थांबा, मी रिसेप्शन काऊंटरवर कोण आहे ते बघून एक मिनिटात येतो”
“म्हणजे मी एकटाच नं?” किरणनं विचारले. “हो!” मोरवे जरा आश्चर्य वाटून म्हणाले. त्यानंतर किरण स्वतःशी पुटपुटला “आपण म्हणजे मी एकटा”. मोरवेना परत यायला थोडा वेळ लागला, “सॉरी! काउंटरवर कुणीच नव्हतं म्हणून दोन मिनिटं थांबलो” थोरवे म्हणाले. “तीन मिनिटं आणि वीस सेकंद” किरण म्हणाला. त्यानं मिनिट -सेकंदात वेळ सांगावी ते सुद्धा घड्याळात न बघता हे मोरवेंना थोडं विचित्र वाटलं, पण त्यावर फारसा विचार न करता ते म्हणाले “रिसेपशनिस्ट परत येईपर्यंत आपण काउंटरवर बसू”. दोघंही काउंटर पर्यंत गेले, काउंटरच्या मागे दोन खुर्च्या होत्या, एक खुर्ची किरणला देऊन दुसऱ्या खुर्चीवर स्वतः बसले. “काउंटरवर म्हणजे काउंटर मागच्या खुर्चीवर” किरण स्वतःशी पुटपुटला. मोरवेंनी बसल्या बसल्या येण्याजाण्याची वेळ नोंदण्याची पद्धत, रिसेप्शनची पद्धत, व्हिजिटर्स रेकॉर्ड वगैरेची माहिती दिली. तेव्हढ्यात रिसेप्शनिस्ट आली. “कुठे गेली होतीस, आणि ते देखील अनवाणी?” मोरवेंनी विचारलं. “गणपतीच्या तसबिरीला हार घालत होते” रिसेप्शनिस्ट म्हणाली. “पायात चप्पल घाल आधी, टाईल्स गार आहेत” मोरवे म्हणाले. “हो, घालते” असे म्हणून रिसेप्शनिस्टनं काढून ठेवलेल्या चपला पायात घातल्या. ते बघून किरण पुटपुटला “पायात चप्पल म्हणजे चपलेत पाय”. ते ऐकून मोरवे आणि रिसेप्शनिस्ट यांनी एकमेकांकडं पहिलं पण ते कांही बोलले नाहीत. त्यानंतर मोरवे किरणला घेऊन इतर सहकाऱ्यांकडं गेलेआणि प्रत्येकाला त्याच्या बरोबर थोडा थोडा वेळ बोलून माहिती द्यायला सांगून ते आपल्या कामासाठी निघून गेले. लंचच्या वेळेस आणि दुपारच्या चहाच्या वेळेस किरणला साहेबांच्या केबिनमध्ये आणून सोडण्याची सूचना होती त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती. संध्याकाळी सहा वाजता एक कर्मचारी किरणला साहेबांच्या केबिन मध्ये घेऊन आला. त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी दरवाज्या पर्यंत येऊन सर आणि किरणला निरोप दिला. किरणनं सर्वांचे आभार मानले आणि नमस्कार करून सर्वांचा निरोप घेतला. साहेबांच्या कारमध्ये बसून साहेब आणि किरण निघून गेले.
दुसऱ्या दिवशी सकाळी देवरे साहेब एकटेच ऑफिसमध्ये आले. थोड्या वेळानं त्यांनी मोरवेंना केबिनमध्ये बोलावलं. “बसा!” मोरवेना उद्देशून साहेब म्हणाले. मोरवे स्थानापन्न झाल्यावर साहेबांनी विचारलं “कसा वाटला किरण तुम्हाला? आपल्या कंपनीच्या टीममध्ये बसेल असं तुम्हाला वाटतं का? “ठीक वाटला” मोरवेंचं उत्तर जरा गुळमुळीत होतं. “इतर सहकाऱ्यांचं काय मत आहे?” साहेबांनी विचारलं. “त्यांचंही मत साधारण असंच आहे” मोरवे म्हणाले. “किरणला घेण्यात तुम्हाला फारसा इंटरेस्ट नाही असं मला वाटतंय, समजा तो माझा भाचा नसता तर तुम्ही काय म्हणाला असता? साहेबांनी विचारलं. “तो तुमचा भाचा आहे या दृष्टीनं मी फारसं पाहिलं नाही, पण त्याच्या एकूण बोलण्या-चालण्यावरून तो आपल्या टीम मध्ये फिट बसेल असं वाटलं नाही” मोरवे उत्तरले. “नक्की काय खटकतंय हे सांगता येईल? कांही आडकाठी न ठेवता बोला” साहेब म्हणाले. आता मोरवेंना स्पष्ट बोलणं भागच होतं, “आम्हाला सर्वांना असं वाटलं की त्याचं तांत्रिक ज्ञान किंवा कामकाजा विषयीची माहिती खूप छान आहे, परंतु त्याचं बोलणं -चालणं फार वेगळं आहे, इतक्या हळुवार हालचाली, त्याचं स्वतःशी पुटपुटणं हे जरा विचित्र वाटलं. आपल्या टीममध्ये फिट होण्यासाठी बोलण्या- चालण्यात जोश असायला हवा, मोकळेपणा असायला हवा. अर्थात हे आमचं मत झालं, निर्णय तर तुम्हीच घ्यायचा आहे.” शेवटचं वाक्य बोलताना मोरवेंच्या मनावर थोडं दडपण आलं होतं त्यामुळं त्यांनी नजर खिडकीकडं वळवली होती.
मात्र साहेबांच्या जोरात हसण्यानं ते चमकले, आपण बोलताना कांही कमीजास्त बोललो नाही ना असा विचार करत असतानाच त्यांच्या लक्ष्यात आलं की साहेबांचं हसणं खरंखरं होतं. “मला तुमचं विश्लेषण एकदम पसंत पडलं, पण तरीही मी किरणला कंपनीत घ्यावं असं म्हणतोय” साहेब म्हणाले. आता मोरवे बुचकळ्यात पडले होते आणि ते त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं, ते पाहून साहेब म्हणाले “आता मी तुम्हाला त्याचं कारण सांगतो, किरण हा माझा भाचा नाहीच मुळी! एव्हढंच नव्हे तर तो कुणाचाच भाचा होऊ शकत नाही! तो एका जपानी कंपनीनं बनवलेला रोबो आहे. कांही दिवसांपूर्वी एका जपानी कंपनीनं मला संयुक्तपणे काम करण्याबद्दल विचारलं होतं. त्यांनी भारतात घरगुती आणि ऑफिसमध्ये सहाय्य करण्यासाठी रोबो विकसित केले आहेत. या रोबोचं हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर तयार आहे, आता प्रश्न आहे रोबोला दैनंदिन व्यवहारासाठी प्रशिक्षित करण्याचा. रोबोचं काम कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्यानं रोबो स्वतःला प्रशिक्षित करू शकतो, त्याला गरज आहे प्रशिक्षणासाठी योग्य जागेची. जपानी कंपनीनं त्याबाबत माझ्याकडं विचारणा केली आणि प्रायोगिक तत्वावर मी होकार दिला. त्यानुसार हा पहिला रोबो त्यांनी पाठवला आहे. आपलं वागणं बघून आणि बोलणं ऐकून तो स्वतःला वागण्याच्या आणि भाषेच्या बाबतीत प्रशिक्षित करतो आहे. कांही दिवसांत तो आपली संभाषणाची बोली शिकून घेईल आणि आपल्या सारख्या सवयी लावून घेईल, अर्थात त्याच्या हालचाली आणि आपल्या हालचाली यात फरक दिसणारंच कारण तो यांत्रिक आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर संयुक्तपणे मोठा प्रकल्प आपण हाती घेऊ शकतो.”
साहेबांचं हे स्पष्टीकरण मोरवे आ वासून ऐकत राहिले, त्यांना भानावर आणण्यासाठी साहेब हसत म्हणाले “मग, काय विचार आहे तुमचा, माझ्या भाच्याच्या बाबतीत? मला असं म्हणायचं आहे की हा भाचा तर आपल्याला चालेलंच, पण या खेरीज असा एखादा पुतण्या आणलात तरी सुद्धा आपल्याला चालेल” मोरवेंच्या या बोलण्यावर दोघंही दिलखुलास हसले.
– सुरेश गोपाळ भागवत (२३/९/२०२५).