संध्याकाळचे पाच वाजले होते. मी घरीच होतो, कोणत्याही क्षणी आमचा मुलगा प्रतीक आणि त्याची मैत्रीण रेवा येणार होते. आज आमची दुसरी चर्चा होणार होती. महिन्यापूर्वी जेंव्हा प्रतीक रेवाला मला भेटण्यासाठी घेऊन आला त्यावेळी मला जरा आश्चर्य वाटलं होतं, कारण स्वतःच्या भावी आयुष्याबद्दल तो गंभीरपणे विचार करत असेल याची मला कल्पना नव्हती. त्या दोघांनी जेंव्हा ताबडतोप लग्न करण्याचा विचार बोलून दाखवला तेंव्हा मी जरा बुचकळ्यात पडलो. आजकाल मुले- मली जरा उशिराच लग्न करतात त्यामुळे मी मुलाच्या लग्नाच्या बाबतीत फार विचार केलेला नव्हता म्हणून हा मला धक्काच होता. तशी तो दोघं एकमेकाला अनुरूपच होती. आमचा मुलगा हरहुन्नरी आहे पण अजून आयुष्यात नक्की काय करायचं याची त्यानं योजना आखलेली नव्हती, निदान मला तसं बोलून दाखवलं नव्हतं. त्याची मैत्रीण बोलण्यावरून हुशार वाटत होती. आमच्या संभाषणात नेहमीची प्रश्नोत्तरं झाली होती. मी जेंव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला लग्न का करायचंय तेव्हा उत्तर अपेक्षितच मिळालं होतं, ते म्हणजे आमचं एकमेकांवर प्रेम आहे. मी म्हणालो ते छान आहे पण तुमचं एकमेकांवर प्रेम का आहे हे सांगता येईल का? माझा हा प्रश्न त्यांना फारसा रुचला नाही. दोघांचंही म्हणणं असं होतं की प्रेम कांही कुणी कारणं बघून करत नसतं. मी म्हणालो ठीक आहे, तुम्ही प्रेमात पडलेले आहेत त्यामुळं तुम्हाला सगळं साहजिक आणि नैसर्गिकच वाटेल, पण मी विचार करू शकतो, आणि मला असं वाटतं की तुम्हाला एकमेकांचे चेहरे आकर्षक वाटतात, हे खरं आहे? दोघं ही म्हणाले “हो खरं आहे”. मी पुढं विचारलं “तुम्हा दोघांना कांही कॉमन इन्टेरेस्टस आहेत, बरोबर?”
“हो, आहेत आम्हाला कॉमन इन्टेरेस्टस,” दोघेही म्हणाले.
“आम्हाला दोघांनाही प्रवास करायला आवडतो, दोघांनाही संगीताची आवड आहे”, प्रतीक म्हणाला. “इतकंच नव्हे तर टीव्ही वरचे प्रोग्रॅम्स, कपड्यांचे रंग आवडते इन्फ्लुएन्सर हे देखील अगदी मॅच होतात” मैत्रीण म्हणाली. “अगदी छान, पण आपण चर्चा करतोच आहोत तर बाकी कांही मुद्द्यांचाही विचार करू या. क्षणभर असं गृहीत धरू की तुम्ही दोघं एकत्र राहात आहात. एकत्र राहिल्यावर स्पेस, एरिया, वेळ, रिसोर्सेस सगळंच सामायिक असतं आणि प्रत्येक बाबतीत कांही मत किंवा आवड मॅच होतेच असं नाही. कांही ठिकाणी आवड वेगवेगळी असू शकते, बरोबर?” मी विचारलं.
“हो, ते शक्य आहे” दोघंही म्हणाले.
“छान, आता मी तुम्हाला स्पष्टच सांगतो की तुम्ही लग्न करण्याला माझा विरोध तर नाही, पण माझा पाठिंबा मिळवायचा असेल तर तुम्हाला कांही गोष्टींचा विचार करावा लागेल, तुम्ही घेतलेला निर्णय विचारपूर्वक घेतलेला आहे हे मला पटवून द्यावं लागेल आणि त्यासाठी मी तुम्हाला एक महिन्याचा अवधी देतो. एक महिन्यानंतर आपण पुन्हा चर्चा करू, आहे कबुल?
“हो, आहे कबूल दोघंही म्हणाले. आता तुम्हां दोघांना एक एक प्रश्न पत्रिका देतो आहे, त्या प्रश्नांना तुम्ही वाक्यात उत्तरं लिहून आणायची आहेत. अट एकच, प्रश्न एकमेकाला दाखवायचे नाहीत, उत्तरं स्वतःच्या मनानी लिहायची आहेत आणि एकमेकाला दाखवायची नाहीत. मी दोघांनाही एक एक घडी केलेला कागद दिला, त्यानंतर ते दोघं निघून गेले. नंतर महिन्याभरात माझं आणि मुलाचं फोनवर संभाषण झालं, पण आम्ही या विषयावर बोलण्याचं टाळलं. आज एक महिना झाल्यानंतर ते येणार होते. दारावरची बेल वाजली, मी दार उघडलं, दोघं आत येऊन बसले. दोघांच्याही हालचालीत जास्त मोकळेपणा जाणवत होता. सुरवातीचं बोलणं झाल्यावर, प्रतीक म्हणाला “बाबा, मी एक गोष्ट आधीच कबुल करतो की महिनाभर आम्ही तुम्ही घातलेल्या अटी पाळल्या पण आज सकाळी आम्ही भेटलो तेंव्हा न राहवून आम्ही एकमेकांचे कागद पहिले.
“ठीक आहे, नाहीतरी आता मी तुम्हाला एकमेकांचे कागद वाचायाला सांगणारच होतो” मी म्हणालो. “आम्हाला वाटलं होतं की तुम्ही कांही अवघड प्रश्न विचारले असतील, पण तुम्ही तर अगदी साधे प्रश्न विचारले होते, असं का ?” रेवा म्हणाली.
“प्रश्न साधे आहेत पण महत्वाचे आहेत, याचं कारण अस की आपण सगळे नैसर्गिकरित्या पॉझिटिव्हिटीकडं झुकलेले असतो आणि त्या भरात नेगेटिव्हिटीचा विचार आपण करत नाही, आणि आयुष्याच्या दीर्घ कालखंडात पॉझिटिव्हिटी आणि नेगेटिव्हिटी या आपल्या जागा बदलत राहतात. कांही वेळा पॉझिटिव्हिटी आपल्याला प्रोत्साहित करते तर कांही वेळेस नेगेटिव्हिटी आपल्याला संभाव्य धोक्या पासून वाचवते” मी म्हणालो. “पण तुम्ही तर फक्त असं विचारलं आहे की, कोणत्या तीन गोष्टींचा तुम्ही तिटकारा करता?, कोणत्या तीन गोष्टी तुम्हाला त्रासदायक वाटतात?, कोणत्या तीन गोष्टी नावडत्या असल्या तरी तुम्ही सहज सहन करू शकता?” रेवा म्हणाली.
“बरोबर, आपण सगळे व्यक्ती असल्यानं कुणालाही काहीही आवडू शकतं किंवा नावडू शकतं, खरी परीक्षा तुमची उत्तरं सारखी आहेत की वेगळी आहेत यात आहे, मी म्हणालो.
“ते का बरं?” दोघंही म्हणाले.
“व्यक्ती जवळ येतात त्या साधर्म्यामुळं आणि दुरावतात फरकामुळं”, दोन व्यक्तींना आपल्या दोघांमध्ये किती फरक आहे हे माहिती असणं महत्वाचं आहे. कारण फरकामुळं मतभेद होतात, मतभेदातून तणाव, संघर्ष उद्भवतात आणि ते मर्यादेपलीकडं गेले की सहजीवनाला मारक ठरतात” मी म्हणालो.
“पण लोक तडजोड तर करतातच नं ?” प्रतीक म्हणाला.
“अगदी बरोबर, तडजोड मनातून आली तर ती चांगली पण तिच्या मागं लादल्याची भावना असेल तर ती वाईट. गम्मत म्हणजे आपल्या आवडी निवडी देखील वयानुसार बदलतात, पण आपला सहप्रवास सुरु होताना आपण कशापासून सुरवात केली याचं भान आपल्याला असलं, म्हणजे नंतर राईचा पर्वत तर होत नाही ना हे तपासता येतं. महत्वाचं म्हणजे लिखित शब्द जास्त अर्थपूर्ण असतात, उच्चारलेले शब्द त्या वेळेचा आणि संभाषणाचा संदर्भ, उच्चारण्याची ढब यानुसार अर्थ बदलतात” मी म्हणालो.
“आता ही आमची उत्तरं तुम्ही वाचणार आहात का ? प्रतीकनं विचारलं.
“नाही, ती तुमची वैयक्तिक माहिती आहे, ती मी वाचणार नाही तर ती तुम्हीच एकमेकांची वाचायची आहे आणि त्यावर विचार करायचा आहे ” मी म्हणालो.
यावर रेवा आणि प्रतीक दोघंही हसले “काका आम्ही एकमेकांची उत्तरं आधीच वाचली आणि आमच्या लक्ष्यात आलं की या विषयांवर आम्ही कधी बोललोच नव्हतो” रेवा म्हणाली.
“अगदी तोच तर माझा उद्देश होता” मी म्हणालो.
“आमची उत्तरं फारच वेगवेगळी आली आहेत आणि म्हणून आम्ही असा विचार केला की, आमचा एकमेकांशी लग्नाचा विचार जरी पक्का असला तरी, घाई न करता, या सर्व विषयांवर चर्चा करून वर्षानंतर लग्न कराव” प्रतीक म्हणाला.
“उत्तम निर्णय, तुमच्यातील सामंजस्य या एक वर्षात आणखी वाढेल आणि तुम्ही एकमेकास आणखी अनुरूप व्हाल असा मला विश्वास आहे” मी म्हणालो.
“पण बाबा, कागदावर प्रश्न -उत्तरं लिहिण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? प्रतिकनं विचारलं.
“माझ्या बाबांनी मला आणि तुझ्या आईला असाच एक एक कागद दिला होता आणि आम्ही दोघांनी ते कागद अजून जपून ठेवले आहेत” मी म्हणालो.
-सुरेश गोपाळ भागवत (१४/१२/२०२५).
