दुर्गमगडचा दैत्य

कांही गावांची नावं  अगदी सार्थ असतात, दुर्गमगडच्या बाबतीत हे अगदी बरोब्बर लागू होत होतं. सावंतवाडीपासून तीस किलोमीटर अंतरावर दुर्गमगड हा किल्ला  होता, त्याच्या पायथ्याशी साधारण पाच हजार वस्तीचं  दुर्गमगड गाव वसलेलं होतं. ज्या डोंगरावर किल्ला बांधलेला होता तो साधारण हजार एक फूट उंचीचा होता, पण चढण इतकी उभी होती की राजरोस मार्गानं गड  चढणाऱ्यांच्याही नाकी नऊ  यावेत. डोंगरावरची माती धुवून गेल्यानं उघड्या पडलेल्या शिळा  आणि खडक यांच्यामुळं मार्ग आणखी बिकट वाटत होता. दुर्गमगड गावात पोचणं  ही  देखील सोपी गोष्ट नव्हती. सह्याद्रीनं छोट्या- मोठ्या टेकड्यांची आरास गावाच्या भोवती मांडलेली होती. डोंगरावरील माती वाहून गेलेले भाग उघडे बोडके होते पण जिथं वाहून आलेली माती साचली होती तिथं किर्र झाडी होती. टेकड्यांच्या मध्ये पठार होते आणि त्या पठारावर गावाची वस्ती होती, पठाराच्या पश्चिमेला डोंगर आणि त्यावर गड  होता. डोंगराच्या पायथ्याशी पठार संपून जिथं झाडीची सुरवात होत होती तिथं एक पुरातन मंदिर होतं, मंदिराच्या आसपास देवराई होती.  पूर्वीच्या काळी  जेंव्हा गड  वापरात होता तेंव्हा गाव वसलं असावं, एरवी इतक्या दूर, अडचणीच्या जागेत येऊन राहण्याचं कुणाच्याही मनात आलं  नसतं.

गेल्या कांही वर्षांत जवळपासच्या गावांमधील परिस्थिती बदलू लागली होती. या शहरी सुधारणांपासून दूर असलेल्या भागात ज्या प्रदेश विशिष्ठ आणि मौल्यवान जाती- प्रजाती होत्या, मूळ वनश्री आणि प्राणिजीवन शिल्लक होतं, त्याच्या आकर्षणामुळे अभ्यासू , पर्यटक  या भागात येत असत, परंतु  देवराईत बाहेरच्या कुणाही व्यक्तीला जाण्याची मनाई होती, जायचंअसेल तर गावाची परवानगी लागत असे आणि गावाच्या वतीनं सरपंच ती देत असत. गावकरी देखील कारणा शिवाय देवराईत जात नसत. देवराईत झाडं तोडण्यावर पूर्ण बंदी होती, याला अपवाद फक्त गुरवांचा होता. प्रथेप्रमाणे  गावाच्या गरजेनुसार देवराईतून औषधी वनस्पती आणण्याची परवानगी त्यांना होती. देवराईत मंदिराजवळ एक गोड्या पाण्याचं टाकं  होतं, त्यात दुष्काळाच्या काळात देखील पाणी असतं असं  गावकरी सांगत. डोंगराचा पलीकडचा भाग अतिशय दाट  झाडीनं व्यापलेला होता त्यामुळं त्याची कोणाला फारशी माहिती नव्हती.

मंदिराला लागूनच देवराईचा एक भाग होता, त्याला बैराग्याचा  कुंज असं नाव होतं. फार पूर्वी देवराईत एक बैरागी राहत असे, त्याचे नाव-गाव कुणालाही ठाऊक नव्हतं. त्यानं देवराईच्या एका टोकाला कुटी उभारली आणि आजूबाजूला बरीच झाडं झुडपं लावली आणि त्याचाच पुढं  कुंज झाला. कुंजात देव-देवतांना  वाहतात अशा अनेक वनस्पती होत्या. पूर्वी लोक बैराग्याच्या दर्शनासाठी येत असत, बैरागी  बहुधा मौन पाळत असे परंतु औषधे देत असे. येणाऱ्या जाणाऱ्यांना टेकायला जागा असावी म्हणून आणखी दोनचार कुट्या उभ्या राहिल्या, हळूहळू त्याला एका आश्रमाचं स्वरूप आलं. रोग्याला घेऊन एखादा नातलग तिथं राहत असे. बैरागी रोग्यानं कोणती फुलं  किंवा पानं देवाला वाहावीत हे सांगत असे. रोग्यानं  तसं न चुकता रोज करायचं एव्हढाच काय तो उपचार असे.

बाहेरची बाधा झालेल्यांना तिथं राहून हमखास गुण  येतो असा लोकांचा अनुभव होता.  लोक आपापला शिधा बरोबर घेऊन येत, कांही दिवस राहून  दिवसभर पूजा अर्चा करत, रुग्णाला बरं  वाटलं की निघून जात. पैश्याची कसलीही देवाण घेवाण नसे. उतार वयात बैराग्यानं मंदिरातील गुरवांना वनौषधींचं ज्ञान दिलं होते आणि आता गुरव ती जबाबदारी पार पडत होते. मात्र  बैराग्याच्या पश्चात आश्रम मोडकळीला आला, जंगल दाट झालं, कोणी वास्तव्याला जाणं बंद झालं. बैराग्याच्या समाधीपाशी वर्षातून एक दिवस यात्रा भरत असे तेंव्हा तिथं गर्दी होई. एरवी तिथं कुणी जायला धजावत नसे कारण रुग्णांना सोडून गेलेली भूतं तिथं राहायला आली आहेत असा  एक समज लोकांमध्ये पसरला होता. 

दुर्गमगडचे गांवकरी शरीरानं कणखर होते सह्याद्रीच्या कड्यासारखे, पण मनानं भाबडे होते. एखादी गोष्ट गावकऱ्यांच्या डोक्यात शिरली की बस्स, ते तिलाच धरून बसायचे. असं  झालं की मग गांवातल्या शिकल्या सवरलेल्या लोकांची गावकऱ्यांची समजूत घालण्याची जबाबदारी असे.

गेले कांही दिवस गांवात घडणाऱ्या घटनांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं  होतं. रात्रीच्या वेळी गावात कुणीतरी हैदोस घालत होतं. सुरवातीला जेंव्हा परसांची कुंपणं मोडलेली दिसली तेंव्हा गावकऱ्यांना वाटलं गावातलंच कुणीतरी खोडसाळपणा करतं आहे. पण जसजसा या घटनांचा गंभीरपणा वाढू लागला तशी लोकांना भीती वाटू लागली. गांवकरी घराजवळ गाई-गुरांच्या चाऱ्यासाठी लागणारे गवताचे भारे उंचावर ठेवत असत. भाऱ्यांना लाकडी खांबांचे किंवा किंवा बांबूचे आधार दिलेले असत.  रात्रीच्या वेळी कुणीतरी येऊन ते पाडू लागलं. आज कुणाचा कुत्रा जखमी झालेला दिसला, उद्या  कुणाचा बैल जायबंदी झालेला दिसला, असे प्रकार सुरु होते. रात्री कुत्री भुंकायला लागली की गांवकरी खिडक्या उघडून बघायचा प्रयत्न करत, पण नजरेला कांहीच पडत नसे. घराबाहेर ठेवलेल्या वस्तू विस्कटून, ढकलून दिलेल्या असत. गांवाला  एखाद्या वेळी वाघ, लांडगा, कोल्हा असे प्राणी गांवात शिरायची माहिती होती, पण या वेळेस या प्राण्यांपैकी कोणी गांवात शिरत असल्याच्या खुणा दिसत नव्हत्या.

एके  दिवशी जाधवांची  म्हैस चरून परत आली नाही म्हणून त्यांची मुलं म्हशीला शोधायला बाहेर पडली. दुपारच्या वेळी  इतर गाई-म्हशीं बरोबर ती म्हैस सुद्धा देवराईच्या कडेला चरताना लोकांना  दिसली होती. हुडकत हुडकत मुलं देवराई जवळ पोचली तेंव्हा तिथं म्हैस पडलेली दिसली. एका मोठ्या झाडाच्या बुंध्यावर ती इतकी  जोरात दाबली गेली  होती की तिच्या बरगड्या मोडल्या होत्या. गांवकरी आपापसात चर्चा करून जास्तच गोंधळात पडत होते, कुठल्याही श्वापदाच्या खुणा नाहीत, कुणी  चोरीच्या उद्देशानं गावात आल्याचं दिसत नाही, मग हे सर्व उद्योग आहेत कुणाचे? गावातल्या कुणीतरी भूत पिशाच्चाची कल्पना बोलून दाखवली आणि बघता बघता त्या कल्पनेनं गांवकऱ्यांच्या मनाचा ताबा घेतला. भिंती पडल्या, झाडे पडली, म्हैस चिरडली म्हणजे हे कुणी साधे सुधे भूत नसून अचाट शक्ती असलेला दैत्य आहे असा समज लोकांनी करून घेतला. बैराग्यानं घालवलेली भुतं केंव्हा केंव्हा देवराईत येतात असा समज आधी होताच, त्यात जाधवांची म्हैस देवराई जवळ पडली होती म्हणून हा दैत्य देवराईत मुक्काम ठोकून आहे असं गांवकरी एकमेकाला पटवून देऊ लागले. एरवी सुद्धा देवराईत जाण्यावर बंधनं होतीच, आता देवराईत कोणीही जायचं नाही असं  गावकऱ्यांनी  ठरवून टाकलं. गांवाला भीतीचं दडपण हळूहळू जखडून टाकत होतं, सर्वांचीच परिस्थिती गुदमरल्यासारखी झाली होती. गावकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम दिसू लागला होता. गांवकरी  प्रत्येक गोष्टीकडं साशंक नजरेनं पाहू लागले होते, कामात अडथळे येऊ लागले होते आणि कामातला उत्साह कमी होऊ लागला. हे असं  बरं नाही हे सर्वांनाच माहिती होतं, पण करायचं काय हे मात्र कुणालाच माहिती नव्हतं.

गावकरी ज्यांना दैत्याच्या कारवाया समजत होते त्या नक्की कुणाच्या होत्या याचा छडा  लावण्याचं अमितनं  मनात पक्कं केलं  होतं. त्याला स्वतःला दैत्याची भीती वाटत नसली तरी जे कुणी या कारवाया करत होतं  त्याची भीती होतीच. कुंजापर्यंत जायचं आणि कांही धागे दोरे मिळतात का ते बघायचं असं त्यानं ठरवलं.

एके दिवशी सकाळीच देवराईच्या दिशेनं तो निघाला. एक काठी आणि छोटी पाण्याची बाटली त्यानं बरोबर घेतली होती आणि खिशात छोटा मॅग्नेटिक कंपास  ठेवायला तो विसरला नव्हता. गांवकऱ्यांची नजर चुकवून तिथपर्यंत जाणं हे कांही सोपं  नव्हतं. समोरून येणाऱ्याच्या “कुठं निघाला सकाळी सकाळी?” या सहजच केलेल्या चौकशीला कांहीतरी गुळमुळीत उत्तरं देत त्यानं वेळ मारून नेली. सूर्य बराच वर आला होता, देवराईवर लख्ख ऊन पडलेलं दिसत होतं. आत जायच्या वाटांवर वाळलेलं गावात आणि झुडपं होती. पन्नास एक पावलं आत गेल्यावर दाट  सावली सुरु झाली, खाली वाळलेल्या काट्याकुट्यांची दाटी होती. एका झाडाच्या आडोश्याला अमित उभा राहिला. एखाद्या पक्ष्याचा आवाज आणि खारींची धावपळ या खेरीज दुसरं कांहीच लक्ष्य वेधून घेण्यासारखं नव्हतं. जवळ जवळ अर्धा तास तिथं उभे राहून निरीक्षण केल्यानंतर ज्या झाडाखाली तो थांबला होता त्यावर खूण  करून अमित परत निघाला. दोन तीन दिवस हा प्रयोग करून, प्रत्येक दिवशी थोडं पुढे जात त्यानं बरीच प्रगती केली होती. आतापर्यंत त्याला असं कांहीच दिसलं नव्हतं की ज्यामुळं एखाद्या दैत्याच्या अस्तित्वाची ओळख पटावी.  कांही दिवसात त्यानं देवराईत बरीच आतपर्यंत मजल मारली, पण अपरिचित असं कांहीच दिसलं नाही, फक्त  कांही ठिकाणी झुडपांमधून कोणीतरी गेलं असावं असं  दिसत होतं, झाडांना  ढुसण्या दिल्याच्या खुणा होत्या. परत येताना त्याच्या डोक्यात हाच विचार घोळत होता; एखादं रानडुक्कर फिरत असेल का? की गावातल्याच जनावरांपैकी एखाद चुकून तिथे गेलं असेल? पुढच्या खेपेस बारकाईनं निरीक्षण करायचं त्यानं ठरवलं.

आता त्या जागेची त्याला बऱ्यापैकी माहिती झाली होती, त्यानं आजूबाजूला बारकाईनं बघायला सुरवात केली. ढुसण्या दिलेली कांही झाडं जाडजूड बुंध्याची होती. अशा ढुसण्या देणं रानडुकराला शक्य नव्हतं, गावातल्या गाई-गुरांनी तिथे जाऊन ढुसण्या देण्याचं कांही कारण नव्हतं. अमितनं झाडांच्या खोडावर नजर टाकली, कांही ठिकाणी साल ओरबाडल्यासारखी दिसत होती, खोडावर चावल्याच्या खुणा दिसत होत्या. मुख्य म्हणजे त्या खुणा त्याच्या स्वतःच्या उंचीच्या वर होत्या. गाई-गुरांना इतक्या उंचावर चावून साल काढणं शक्य नव्हतं. कोणी माणसांनी  तर झाडांच्या साली ओरबाडल्या नसतील? पण मग झाडांना ढुसण्या देऊन वाकवण्याचं काय? ते काम एखाद्या भक्कम यंत्रा शिवाय करता आलं नसतं आणि यंत्राच्या कांही खुणा दिसत नव्हत्या.  हत्ती आला असेल का? पण पूर्वी जवळपासच्या भागात हत्ती फिरकून गेले तरी दुर्गमगडपर्यंत ते कधीही येऊ शकले नव्हते.

अमित परत निघाला परंतु डोक्यात हाच प्रश्न घोंघावत होता की झाडांची अशी स्थिती करायची तर त्याला राक्षसी ताकत हवी आणि तशी ताकत असणारा प्राणी या जंगलामध्ये असल्याचं ऐकिवात नव्हतं. मग राक्षसी ताकदीचा कोणी दैत्य खरंच आलाय की काय? छे!छे! असं कसं  होईल! अमित स्वतःशीच पुटपुटला.  आपल्या देवराईतल्या चकरांची कोणी दाखल घेतली नाही असं अमितला वाटत होतं, पण त्याचा जवळचा मित्र नितीन यानं  सरळ प्रश्न विचारून त्याचा भ्रमनिरास केला. त्याला मोहिमेत सामील करून घेण्याच्या बोलीवर नितीननं बोभाटा न करण्याचं कबुल केलं. पुढच्या वेळेस दोघांनी देवराईत जायचं ठरलं. गावकऱ्यांना शंका यायला नको म्हणून देवराईपर्यंत स्वतंत्रपणे पोचायचं आणि नंतर एकत्र आत जायचं असं ठरलं. त्यानुसार दोघं पोचले आणि एकत्र देवराईत चालू लागले. जिथं आधी ओरबाडलेली झाडं दिसत होती तिथं दोघं थांबले. देवराईत असताना बोलायचं नाही असं  ठरलं  होतं त्यानुसार अमितनं नितीनला कललेली झाडं, ओरबाडलेली खोडं आणि मोडलेल्या फांद्या बोटानं दाखवल्या. वरती दाट झाडीचं छत्र,आजूबाजूला डोक्याइतक्या उंचीची झुडुपं आणि जमिनीवर गवत अशा ठिकाणी दोघं उभे होते, एकमेकांकडं तोंडं करून खाणाखुणा करून ते संवाद साधत होते.

अमितनं नितीनच्या मागच्या बाजूला नजर टाकली आणि त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला, डोळे विस्फारले गेले, आणि ओठ विलग झाले पण तोंडातून शब्द फुटेना.  त्याचा तसा चेहरा पाहून, न बोलण्याचा संकेत विसरून नितीननं  विचारलं  “काय झालं?” आणि तो झटकन अमित बघत होता त्या दिशेला वळला. थोडा खसपस  आवाज आणि थोडीशी झुडपांची हालचाल एव्हढंच काय ते त्याला समजलं. अमितनं नितीनला झट्कन मागं  ओढलं आणि दोघंही जवळच्या झाडामागून काय दिसतं ते पाहू लागले. थोडा वेळ वाट पाहूनही कांही न दिसल्यानं दोघंही दबकत दबकत देवराईच्या बाहेर पडले. थोडं दूर आल्यानंतर चांगलासा दगड बघून त्यावर बसले, पाण्याच्या बाटल्या काढून पाण्याचे घोट घेऊन घसे ओले केले.

नितीननं खुणेनंच काय झालं असं विचारलं. अमितनं एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाला “आपण उभे होतो तिथून थोड्या अंतरावर तुझ्या पाठीमागं अचानक कांही तरी दिसलं, एकदम एखादी काळी शिळा उभी राहावी तसं वाटलं, आणि आपली चाहूल लागल्यावर झट्कन ते जे काय होतं ते झुडपांत गायब झालं.

“शिळा गायब कशी होईल?” नितीननं विचारलं.

“ते तर मलाही समजतं आहे, पण जे काय दिसलं ते एखाद्या शिळेसारखंच दिसत होतं” अमित म्हणाला.

“उंची किती होती?” नितीननं विचारलं. “असेल सात-आठ फूट” अमित म्हणाला. “आणि रंग कसा होता?” नितीननं विचारलं.”काळा होता” अमितनं उत्तर दिलं.

“काळ्या रंगाचं जनावर असेल” नितीननं निष्कर्ष काढला. “कोणतं असेल?” अमितनं त्यालाच प्रश्न विचारला.

“अं,असेल एखादा काळ्या रंगाचा बैल किंवा म्हैसही असू शकेल” नितीननं आपला अंदाज सांगितला.

“ते मला समजलं नसतं का?, अरे, जे कांही दिसलं त्याची उंची आठ फूट असेल, बैल किंवा म्हैस चार-पाच फुटापेक्षा उंच असलेले मी तरी पाहिलेले नाहीत” अमित म्हणाला.

“हो, ते खरं आहे, पण मग ते काय असेल? हत्ती?” नितीननं पुन्हा एक पर्याय पुढं केला.

“अरे, आपल्या भागात हत्ती येण्यासारखी जंगलातून वाट कुठे आहे? आणि हत्ती काय रस्त्यानं चालत येईल?, आणि आलाच तर दिसल्या शिवाय राहील? मुख्य म्हणजे हत्ती असता तर मला ओळखता नसता का आला?” अमितनं प्रश्नांची फैर झाडली.

“कशा सारखा वाटला आकार? नितीननं पुन्हा विचारलं.

“जे काय होतं ते एकूण गोलसरच दिसत होतं पण त्यावर जागोजाग गोळे थापले असावे असं दिसत होतं किंवा पृष्ठभाग समान पातळीत नव्हता असं म्हण”अमितनं वर्णन करण्याचा प्रयत्न केला. दोघांनाही कांही अंदाज बांधता येईना. थोड्या वेळानं ते उठले आणि घराकडं निघाले. चालता चालता नितीन म्हणाला “आपण दामले सरांना विचारू या का?” अमितनं क्षणभर विचार केला आणि म्हणाला “आपण हे कोणाला सांगितलं तर आधी खूप बोलणी खावी लागतील आणि मग यापुढे देवराईत जाता येणार नाही, तेंव्हा गप्प राहिलेलं चांगलं”.

दुसऱ्या दिवशी दोघेही पुन्हा भेटले तेंव्हा चर्चे अंती असं ठरलं की दामले सरांना विश्वासात घ्यावं. दामले सर शाळेचे मुख्याध्यापक होते. या दोन मुलांचं शालेय शिक्षण त्यांच्याच हाताखाली झालं होतं. गावातल्या इतर कोणाही पेक्षा दामले सरांना आपलं म्हणणं समजेल असा दोघांना विश्वास होता. दुपारी दोघंही त्यांच्या घरी गेले, मुलांना असं अचानक आलेलं पाहून सरांना आश्चर्य वाटलं. सरांनी बसायला सांगितल्यावर इकडं-तिकडं बघून, इतर कोणी ऐकत नाही याची खात्री करून घेऊन, अमितनं सरांना सर्व हकीकत सांगितली. अपेक्षेप्रमाणं सरांनी दोघांची आधी कान उघाडणी केली. आवेग ओसरल्यावर सर देखील विचार करू लागले, शेवटी न राहवून म्हणाले “आता मलाच तुमच्या बरोबर येऊन बघणं भाग आहे”. इकडे दैत्याच्या कारवाया सुरूच होत्या. रात्री परबांच्या कुंपणाच्या भिंतीला धडक देऊन ती पाडल्याचं समजलं, पण इतर कांही नुकसान झालं नव्हतं.

दुसऱ्या दिवशी दामले सर, अमित आणि नितीन ही त्रयी देवराईत जाऊन आली. सरांनी प्रत्यक्ष सगळं पाहिलं पण त्यांना देखील कांही उलगडा न झाल्यानं त्यांनी प्राध्यापक पुजारी यांना भेटण्याचं ठरवलं. प्राध्यापक पुजारी सावंतवाडीच्या विज्ञान महाविद्यालयात प्राणीशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांना विषयाचं ज्ञान तर होतंच परंतु परिसराची चांगली माहिती होती. सुटीच्या दिवसांमध्ये ते विद्यार्थ्यांना घेऊन जंगलात भटकंती करत, विद्यार्थ्यांना माहिती सांगत.

एके दिवशी दामले सर, अमित आणि नितीन प्राध्यापकांच्या घरी गेले. सरांनी सर्व हकीकत प्राध्यापकांना वर्णन करून सांगितली. प्राध्यापकांनी ते सर्व लक्षपूर्वक ऐकून घेतलं आणि म्हणाले “बरं झालं तुम्ही आलात, या बाबतीत स्थानिक वृत्तपत्रात बातमी वाचल्याचं मला आठवतं आहे. बहुतेक वेळी या अंधश्रद्धेच्या किंवा एखाद्या विघ्नसंतोषी व्यक्तीच्या कारवाया असतात. कांही दिवस चर्चा होते आणि नंतर सगळे विसरून जातात. परंतु गेला महिनाभर तुमच्या गावात जे भीतीचं वातावरण आहे आणि जे नुकसान होतं आहे त्यावरून हे कांहीतरी वेगळं आहे असं  मानायला जागा आहे. गावकरी त्याला भूत-पिशाच्च प्रकारचा दैत्य मानत असतील, आपण तसं मानायचं कारण नाही. ज्या अर्थी तो जंगलात राहतो आहे, पानं, झाडांच्या साली खातो आहे, त्या अर्थी तो वनस्पती भक्षक आहे. चाहूल लागल्यावर अदृश्य न होता तो पळून गेला, या अर्थी तो एखादा प्राणी असावा आणि इतक्या गुप्तपणे वावरतो आहे म्हणजे एकटाच असावा असा तर्क आपण करू शकतो. आता तुम्ही सांगितलेल्या उंचीचे भूचर प्राणी कोणते आहेत? सर्व प्रथम नाव आठवतं ते हत्तीचं. तुम्ही वर्णन केल्या प्रमाणे असेल तर तो बालवयीन हत्ती असू शकतो, परंतु बालवयीन हत्ती कळप सोडून एकटे फिरत नाहीत आणि त्याच्या डोक्याचा आकार पाठीचा आकार या वरून तो तुम्हाला ओळखता आला असता. दुसरी शक्यता म्हणजे तो गवा असू शकतो.  उंची, ताकद हे गव्याच्या वर्णनाशी जुळतं आहे.

घ्या!, चहा घ्या!, नाही तर गार होऊन जाईल.” तिघंही प्राध्यापकांच्या बोलण्याकडं इतकं लक्ष देऊन ऐकत होते की समोर चहा ठेवला आहे हेही विसरून गेले होते.

चहा घेऊन झाल्यावर प्राध्यापक म्हणाले “आपल्याला आणखी माहितीची आवश्यकता आहे आणि आणखी विचार करायला हवा. तुम्ही असं करा तीन चार दिवसांनी पुन्हा या, दरम्यान आणखी कांही समजल्यास मला फोन करा”. प्राध्यापकांनी घरचा फोन नंबर लिहून दिल्यावर तिघंही उठले आणि प्राध्यापकांचे आभार मानून निघाले.  गावात घडणाऱ्या घटनांमधील चमत्काराचा भाग कमी होत चालला होता तरी गूढ आणि भीती कायम होती. मुख्य म्हणजे जे काय स्पष्टीकरण होतं ते गावकऱ्यांना पटणं आवश्यक होतं.         

तीन दिवसांनंतर दामले सर, अमित आणि नितीन पुन्हा प्राध्यापकांच्या घरी गेले, ते आणखी काय सांगतात या बद्दल त्या तिघांच्याही मनात औत्सुक्य होतं. चहा पाणी झाल्यावर प्राध्यापक मुख्य विषयावर बोलू लागले.  “गेले तीन दिवस मी या विषयाचा बराच अभ्यास केला, दैत्याच्या जागी गवा आहे असा विचार केला तर ते शक्यतेत बसतं कारण महाराष्ट्रात गवे  कांही ठिकाणी आढळतात. आपल्या जवळच्या राधानगरी अभयारण्यात गवे  आहेत. नर गव्याची उंची सात फुटापर्यंत असू शकते. गवे आठ-दहाच्या कळपात राहतात. कळपात एक मोठा नर असतो परंतु प्रजनन काळात आणखी नर कळपात सामील होतात.  प्रजनन काळ संपल्यानंतर म्हणजे मे-जून महिन्यात हे नर पुन्हा वेगळे होऊन एकेकटं भटकू लागतात. भटकत भटकत पाच सहा किलोमीटरचं स्थलांतर दिवसात सहज करू शकतात. माझ्या कल्पने प्रमाणं असा एखादा नर तुमच्या गावात आला असावा. गवा हा प्राणी अतिशय ताकदवान पण बुजरा असतो, तो अचानक हल्ला करू शकतो”. बोलता बोलता प्राध्यापकांनी गव्याचा एक फोटो त्यांच्या समोर ठेवला. काळ्या रंगाचा आणि धिप्पाड देहाचा तो गवा फोटो काढणाऱ्या व्यक्तीकडे नजर रोखून बघत असावा. त्याची प्रचंड छाती आणि खांदे, खाली झुकलेली रुंद मान आणि रोखलेली शिंगं पाहून कोणाच्याही छातीत धडकी भरली असती. आपल्या हाताच्या पंज्यानं फोटोचा कांही भाग झाकून प्राध्यापक म्हणाले “तुम्हाला झुडपांच्या वर जो भाग दिसला तो हा खांद्याचा वरचा भाग. हा शरीराचा सर्वात उंच भाग असल्यानं तो थोडासा कमानी सारखा दिसतो”.

“पण आम्ही पाहिलेला प्राणी याच्या पेक्षा प्रचंड असावा आणि जो भाग मला दिसला तो असा दिसत नव्हता” अमित म्हणाला. प्राध्यापकांनी त्याच्या समोर एक कागद आणि पेन्सिल ठेवली आणि काय दिसलं त्याची आकृती काढायला सांगितलं. त्यानं आकृती काढल्यावर ते म्हणाले “साधारणपणे गव्याची उंची खांद्यापाशी जास्त असते, मागं पाठ आणि पुढं मान उतरती होत जाते. पाठीच्या कण्याचा उंचवटा हा खांदा आणि पाठ यांवर अगदी उठून दिसतो, पण तू काढलेल्या आकृतीमध्ये  पाठीवर फुगवटे असल्या प्रमाणं दिसत आहेत. त्या फुगवट्यांमध्ये कण्याचा उंचवटा बुडून गेला आहे असं दिसतं आहे. पाठीवर जास्त मेद साठला असेल तर असं दिसू शकेल, पण  असं मी कधी पाहिलं नाही किंवा त्याबद्दल ऐकलं नाही.”

थोडा वेळ विचार करत ते खिडकीच्या बाहेर बघत राहिले, मग एकदम  कांहीतरी आठवल्यानं ते एकदम उठले आणि पुस्तकांच्या कपाटाकडं गेले. परदेशी छपाईचं, गुळगुळीत कागदावर सुंदर रंगीत फोटो आणि आकृत्या असलेलं एक पुस्तक त्यांनी हातात घेतलं. पुस्तक चाळत ते परत खुर्चीत बसले एका विविक्षित पानावर पुस्तक उघडून त्यावरच्या फोटोकडं बोट करून ते म्हणाले “हे पहा!”

तो फोटो पाहून दामले सरांच्या भुवया उंचावल्या, तर दोन्ही मुलांच्या तोंडून “बाप रे!” असे उद्गार आपोआपच बाहेर पडले. फोटो मध्ये जर्सी गायीसारखं दिसणारं पण प्रचंड आकाराचं धूड उभं होतं, त्याच्या शेजारी उभा असणारा उंचापुरा माणूस त्या मानानं किरकोळ दिसत होता.    

“काय आहे हे?”अमितनं विचारलं. हा गाई-बैलांचा एक  वाण आहे, या जनावरांना ‘बेल्जीयन ब्लु कॅटल’ असं म्हणतात.  गाई-बैलांचं विशिष्ट पद्धतीनं प्रजनन करून हा वाण निर्माण केला गेला आहे.  हा एक बैल आहे आणि तो असा राक्षसी दिसतो आहे कारण त्याचा आकार नेहमीपेक्षा बराच मोठा आहे आणि त्याचं कारण म्हणजे, त्याच्या मान, खांदा, पाठ आणि पुठ्ठयाचे स्नायू खूपच मोठे झाले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगावर मेद किंवा चरबीचं प्रमाण अगदी कमी आहे त्यामुळं प्रत्येक स्नायू त्याच्या त्वचे खालून उठून दिसतो आहे. शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेणाऱ्यांचे स्नायू दिसतात तसे या बैलाचे स्नायू दिसत आहेत” प्राध्यापक म्हणाले.

“बैलाकडून वेट लिफ्टिंग करून घेतात की काय?” अमित विनोदानं म्हणाला.

“त्याला वेट लिफ्टिंग करण्याची गरजच नाही, कारण असे स्नायू असणं आणि अंगावर चरबी कमी असणं हा या प्रकारच्या जनावरांचा आनुवंशिक गुणधर्मच आहे, त्यांची वाढ आपोआपच अशी बॉडी बिल्डर सारखी होते.” प्राध्यापक अमितच्या विनोदाचा सूर पकडत म्हणाले.

“याला विकृती म्हणायचं की काय म्हणायचं?” नितीननं विचारलं.

“तसं पाहिलं  तर याला विकृती म्हणता येणार नाही पण वेगळी प्रकृती म्हणता येईल, कारण ही  स्थिती रोगासारखी अपायकारक नाही. थोडे दुष्परिणाम आहेत आणि त्यामुळंच सगळी जनावरं अशी होत नाहीत” प्राध्यापक म्हणाले.                                       

“हे स्नायू एव्हढे मोठे होण्याचं कारण काय? अमितनं विचारलं. त्यावर प्राध्यापक म्हणाले “प्राण्यांच्या शरीराची वाढ ही  अगदी एखाद्या सूत्राप्रमाणे होत असते, प्रत्येक भागाची वाढ इतर भागांच्या तुलनेनं होत असते, जसं डोळ्याचा आकार हा त्यासाठी  असलेल्या खोबणी एव्हढाच होतो, आपले दोन हात एकमेकांपासून दूर असले तरी त्यांची वाढ एकसारखीच होते. याचं कारण वाढीची क्रिया ही  नियंत्रित असते. तसंच स्नायूंच्या आकारावरही नियंत्रण  असतं, मोठे स्नायू असणं  या मुळं  जास्त शक्ती मिळेल हे खरं  पण मोठे स्नायू ही  शरीराच्या दृष्टीनं  खर्चिक बाब आहे त्यामुळं स्नायूंचा आकार विशिष्ट इतकाच राखला जातो. प्राण्यांच्या शरीरात मायोस्टॅटिन नावाचं प्रथिन असतं  त्याच्या साहाय्यानं स्नायूंच्या आकारावर नियंत्रण राहतं. मायोस्टॅटिनमध्ये बिघाड झाल्यास स्नायूंच्या  वाढीवरचं  नियंत्रण सैल होतं आणि  स्नायू मोठे होतात.

इतका वेळ दामले सर लक्षपूर्वक ऐकत होते, त्यांचं कुतुहूल आता वाढीस लागलं होतं त्यांनी विचारलं  “मायोस्टॅटिनमध्ये  बिघाड का होतो आणि शरीरातील इतर बिघाड दुरुस्त होतात त्या प्रमाणे हा का दुरुस्त होत  नाही?” मायोस्टॅटिनमधील हा बिघाड डीएनएच्या पातळीवर झालेल्या बदलामुळं असतो, त्या पातळीवर देखील दुरुस्ती करण्याची व्यवस्था असते, परंतु कांही बदल नजर चुकीनं  तसेच राहून जातात. अशा बदलास उत्परिवर्तन असं नाव आहे. समोरच्या पुस्तकातील फोटोकडं  बोट दाखवून प्राध्यापक म्हणाले “हा बेल्जीयन ब्लु प्रकारचा बैल मायोस्टॅटिन प्रथिनाच्या निर्मितीसाठी असलेल्या जनुकाची  बिघडलेली प्रत घेऊन जन्माला आलाय आणि पैदासकारांनी या वाणाचं  संगोपन केल्यानं हा वाण टिकून आहे.”

नवी माहिती मिळाल्याचा आनंद तिघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता पण कांही क्षणातच अमितच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्ह उमटलं, त्यानं विचारलं “सर, याचा आपल्या घटनेशी संबंध काय आहे?”

“हं! तुमच्या गावात दहशत बसवणारा दैत्य म्हणजे असा मायोस्टॅटिनचा उत्परिवर्तित जनुक असलेला नर  गवा असावा असं माझं गृहीतक आहे, आता  प्रयॊग करून किंवा निरीक्षणांनी त्याला आधारभूत माहिती मिळवावी लागेल. आधार मिळाला तर गृहीतक स्वीकारलं जाईल अथवा हे गृहीतक टाकून देऊन आपल्याला नव्यानं  विचार करावा लागेल.” प्राध्यापक म्हणाले.

आता पर्यंत केवळ वैचारिक पातळीवर चाललेल्या प्रकल्पाची कृतीची वेळ आली आहे या विचारानं दोन्ही मुलं उत्तेजित झाली होती. प्राध्यापकांनी निरीक्षणं  कशी करायची याची माहिती दिली. प्राध्यपक स्वतः बाकीच्या तिघांबरोबर देवराईत जाणार होते. गावकऱ्यांच्या नजरा चुकवून चौघं कसं वावरणार याची चिंता दामले सरांना लागून राहिली होती.

आधी ठरल्या प्रमाणं प्राध्यापक पुजारी, दामले सर, अमित आणि नितीन वेगवेगळ्या वेळेला आणि वेगवेगळ्या वाटांनी देवराई जवळ पोचले. प्राध्यापकांनी सुरवाती पासूनच बारकाईनं निरीक्षण करायला सुरवात केली होती. देवराईत जमिनीवर वाळलेलं गवत पडलेलं  असल्यामुळं पावलांच्या खुणा वगैरे दिसत नव्हत्या. अमित आणि नितीन यांना आधी जिथं अनुभव आला होता तिथं ते पोचले, ज्या झाडांची पानं किंवा साली खाल्लेली दिसत होती ती झाडं प्राध्यापकांनी नावासकट ओळखली. ओढून तोडलेल्या फांद्यांची उंची आणि ढुसण्या  देऊन कलवलेल्या झाडांची खोडं पाहून त्यांनी हे काम बैल किंवा रेडा या पेक्षा जास्त उंचीच्या आणि ताकदीच्या जनावराचं आहे  हे निश्चित केलं. चावण्याच्या खुणांवरून तो हत्ती नाही हेही त्यांच्या लक्षात आलं होतं. आता चौघांचा चमू असल्यानं त्यांना फारशी धास्ती वाटत नव्हती. त्यांनी थोडं पुढं जाण्याचं ठरवलं, झुडुपांमधून आणि वेलींच्या जाळीतून मार्ग काढणं सोपं  नव्हतं. थोडं पुढं  गेल्यावर त्यांना विष्ठेचे अवशेष दिसले, प्राध्यापकांनी त्याचंही   निरीक्षण केलं. आणखी कांही पुरावा मिळेल या आशेनं  ते आणखी पुढं गेले, परंतु विशेष असं  कांही दिसलं  नाही. प्राध्यापक म्हणाले “इथून पुढं जाण्यात कांही विशेष फायदा नाही, आणि पुढं जाण्याचा धोका पत्करण्याची गरजही नाही. आता  जे काय दिसलंय त्यावर मी विचार करतो, त्या नंतर पुढं  काय करायचं  ते ठरवू . देवराईतून बाहेर पडल्यावर प्राध्यापक एस.टी. स्टँडच्या दिशेनं गेले, दामले सर, अमित आणि नितीन वेगवेगळ्या वाटांनी गावाकडं निघाले.

प्राध्यापक पुजारींनी दुर्गमगडहून परत येताना एस.टी.  स्टॅन्ड वर आणि बसमध्ये लोकांशी बोलून त्यांना काय माहिती आहे याचा अंदाज घेतला, परंतु अज्ञान आणि भीती यांचाच प्रभाव लोकांवर दिसत होता. घरी पोचताच त्यांनी आपले संदर्भ ग्रंथ चाळायला सुरवात केली. तो दैत्य म्हणजे एक गवा आहे हे गृहीतक समोर ठेवून त्यांनी माहिती शोधायला सुरवात केली. देवराईत दिसलेले विष्ठेचे अवशेष आणि पुस्तकातील त्यांचं वर्णन जुळत होतं. आणखी कांही पानं चाळल्यावर त्यांना जी माहिती दिसली तिने त्यांचे डोळे विस्फारले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेंव्हा गवताचा अभाव असतो तेंव्हा गवे झाडांची पानं  खातात, त्यामध्ये कारवी, कातरी, धामण, जांभूळ, कवठ इत्यादींच्या पानांचा समावेश असतो अशी ती माहिती होती. प्राध्यापकांनी आपली टिपणं  पाहिली पानं खाल्लेल्या झाडांची नावं  जुळत होती. पुढं पुस्तकात असंही नमूद केलं होतं  की उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गवे काजू आणि सागाच्या झाडांच्या साली ओरबाडून खातात, त्यामुळे त्यांची क्षारांची गरज भागत असावी. प्राध्यापकांच्या नोंदीत हेच दिसंत होतं की सागाच्या झाडाच्या साली ओरबाडून चघळल्याच्या खुणा होत्या.

प्राध्यापकांचा आत्मविश्वास आता वाढला होता.  आपलं गृहीतक बरोबर असण्याची शक्यता आता जास्त आहे असं  त्यांना वाटू लागलं. आता उपलब्ध आहे त्यापेक्षा  जास्त  पुरावा मिळण्याची अपेक्षा करणं  योग्य नाही असं  त्यांना  वाटलं, कारण जो कुणी “दैत्य” आहे त्यानं आतापर्यंत सर्वांना हुलकावण्याच दिल्या होत्या.

प्राध्यापक पुजारी आता पुढची पावलं टाकण्यासाठी उत्सुक होते. एके दिवशी ते दुर्गमगडला पोचले. दामले सरांच्या घरी जाऊन त्यांना म्हणाले “सर, आता मला खात्री वाटते की या प्रकरणाचा आपण छडा  लावू शकू. गावकऱ्यांना आता आपण तसं सांगू या. “दामले सर  मात्र  या बाबतीत जरा साशंक होते  ते म्हणाले “गावकरी नुसत्या तोंडी स्पष्टीकरणानं मानणार नाहीत, त्यांना कांहीतरी प्रत्यक्ष पुरावा द्यावा लागेल. गावकऱ्यांमध्ये पसरलेली अंधश्रद्धा हा या बाबतीतला मोठा अडसर आहे.”

त्यावर प्राध्यापक म्हणाले “आपण गावकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न करू, सगळ्यांना एकत्र बोलावून घेऊ आणि त्यांच्याशी चर्चा करू, त्यांच्या शंकांचं निरसन होईल, मग पुढची उपाय योजना करता येईल”.

दामले सरांनी गावच्या सरपंचांना बोलावणं धाडलं. ते आल्यावर सरांनी त्यांची आणि प्राध्यापकांची ओळख करून दिली. सरपंचांना उद्देशून सर म्हणाले “गेले कांही आठवडे  आपल्या गावात जे भीतीचं  वातावरण आहे त्यावर आम्ही विचार करतो आहोत. प्राध्यापकांचं मत असं  आहे की या समस्येच्या मुळाशी भूत  वगैरे कांही नसून  वाट चुकलेला एखादा प्राणी असावा. आपण त्याला पकडलं तर समस्येचं  निराकरण होईल.”

सरपंचांनी दोघांकडं एक नजर टाकली मग उजव्या  पायाचं  पाऊल  डाव्या मांडीवर ठेवत बैठक बदलली आणि सावकाश बोलायला सुरवात केली “त्याचं  काय आहे नं सर, हे प्रकरण जरा नाजूक आहे. आपल्या गावात बरीच अडाणी मंडळी आहेत, त्यांच्या कांही कल्पना आहेत. तुम्ही त्यांना अंध श्रद्धा म्हणा हवं  तर, पण त्या तुम्ही अशा एका दिवसात बदलू शकत नाही. नुकसान होत असल्यानं  आधीच लोक हैराण झाले आहेत. तुम्ही कांही प्रयोग केलात आणि तो फसला तर फारच असंतोष पसरेल. खरं  तर गावातल्या लोकांनी कांहीतरी दैवी उपाय करण्याचा विचार मांडला आहे, आता माझ्या पुढं प्रश्न आहे,  तुमचं  ऐकायचं की  त्यांचं  ऐकायचं ?” यावर प्राध्यापक म्हणाले “मला फक्त एकदा गावकऱ्यांना समजावण्याची संधी द्या, त्यांना पटलं  तर ठीक आहे, आपण त्यांच्या मनाविरुद्ध थोडंच कांही करणार आहोत ?”.

” ते तुम्हाला वाटतं  तेव्हढं सोपं  नाही राहिलं  आता, गेल्या वर्षी पाऊस कमी पडला, शेती, पर्यटन, सगळंच कमी झालंय. यंदाही अजून पावसाचा पत्ता नाही, लोक हवालदिल झाले आहेत, फट  म्हणता कांहीतरी बिघडून बसायचं” सरपंच म्हणाले.

प्राध्यापकांनी आपला मुद्दा सोडला नाही, ते म्हणाले “सरपंच, तुम्ही गावातल्या कांही जबाबदार माणसांना बोलवा, मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो. त्यांना मान्य असेल तर पुढं गावकऱ्यांशी चर्चा करू”. हो ना करता करता सरपंच कांही लोकांशी बोलणं करण्याच्या कल्पनेला तयार झाले. पण ते कांही लोकांशी बोलायला गेले तेव्हा कांही वेगळंच घडलं, लोक म्हणाले गावात दुही नको, जे काय बोलायचं  ते सर्व गावकऱ्यांशी बोला. सरपंचांनी सभा बोलावली, मारुती मंदिराच्या समोरच्या पटांगणात गावकरी जमा झाले. सरपंचांनी बोलायला सुरवात केली “आपल्याकडं सावंतवाडीचे प्राध्यापक पुजारी आले आहेत. आपल्या समोर जी अडचण आहे त्या संबंधी त्यांना कांही बोलायचं आहे. ते आपल्या पैकीच असल्यानं  त्यांना काय म्हणायचं आहे ते आधी सर्वांनी नीट ऐकून घ्यावं आणि नंतर काय विचारायचं  ते विचारावं. निर्णय  घेण्याचा हक्क गावकऱ्यांचाच आहे, पण कुणाला कांही सुचवायचं असेल तर आपण ऐकून तरी घेतलं पाहिजे” एव्हढं  बोलून सरपंच खाली बसले. गर्दीत गुरव पुढंच होते, ते म्हणाले “पाहुण्यांना आपल्या गावाची काय माहिती? त्यांचा यात कांही मतलब आहे का?”

यावर प्राध्यापक स्वतःच उभं राहून म्हणाले “मी वर्तमान पत्रात  तुमच्या गावा बद्दलच्या बातम्या वाचल्या आहेत, गावातले अनेक विद्यार्थी माझ्या हाताखाली शिकले आहेत, या खेरीज दामले सरांची आणि माझी जुनी ओळख आहे, त्यामुळं मला या अडचणींवर विचार करावासा वाटला. तुमची संमती असेल तर मी पुढं बोलतो, आक्षेप  असेल तर न बोलता परत जातो, निर्णय तुम्ही करायचा आहे”.

कुलकर्ण्यांचा  प्रकाश उठून उभा राहिला आणि म्हणाला “सर, माझे कांही मित्र तुमचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याकडून मी तुमच्या बद्दल खूप चांगलं  ऐकलेलं  आहे. मग गावकऱ्यांकडे पाहून तो म्हणाला “हे आपल्याला कांही मागत नाहीत, आपण त्यांचा विचार ऐकून तरी घेऊ या”.

“बाहेरून येणारे सगळे आधी साळसूदच दिसतात, नंतर त्यांच्या मनातलं  काळंबेरं बाहेर पडतं” गर्दीतून कुणी तरी म्हणालं.

त्यावर प्राध्यापक म्हणाले “मी तुमच्या गावाला अनोळखी नाही, तुमच्यापैकी कांही लोक मला ओळखतात, मला तुमच्या कडून पैसे, जमीन किंवा आणखी कशाचीही  अपेक्षा नाही. मला फक्त या घटनेचा अभ्यास करण्यासाठी परवानगी हवी आहे.”

“तुमच्या तिथं जाण्यानं  कांही कोप झाला तर आम्हाला त्रास भोगावा लागणार आहे, आम्ही दैवी उपाय करणार आहोत” एक वयस्कर बाई म्हणाल्या.

त्यावर प्राध्यापक म्हणाले, “ठीक आहे, मी तिथं  जात नाही, तुमच्या पैकी कुणाला तरी जाऊ द्या. तुमचे दैवी उपाय तर तुम्ही करू शकता पण त्या आधी फक्त माझं म्हणणं  ऐकून घ्या.”

शेवटी सरपंच म्हणाले “प्राध्यापकांना बोलू द्यावं, त्यात कांही नुकसान नाही. त्याला गावकरी तयार झाले.  

प्राध्यापकांनी मोठ्या कौशल्यानं, ते देवराईत जाऊन आले आहेत ही  माहिती बाजूला ठेऊन, ऐकलेल्या माहितीच्या किंवा अभ्यासाच्या आधारावर  ते बोलत आहेत असं सांगून सुरवात केली. ते म्हणाले “अभ्यासानिमित्त मी सह्याद्रीवर खूप फिरलो आहे, मला इथल्या प्राणी आणि वनस्पती जीवनाची चांगली ओळख आहे. तुम्ही ज्याला देवराई म्हणता त्याचा संबंध श्रद्धेशी आहे त्यापेक्षा जास्त पर्यावरण  आणि जैवविविधता रक्षणाशी आहे. संस्कृतीचं आणि धर्माचं अधिष्ठान असल्यानं देवराया टिकून  राहिल्या हे खरं आहे. परंतु तुम्ही ज्याला दैत्य समजता तो आपल्या प्रमाणेच पंचमहाभूतांचा बनलेला, राग, लोभ, भूक, भीती  या जाणीवा असलेला कुणीतरी असावा असं मी  मानतो.”

“म्हणजे तो माणूस आहे असं  तुम्हाला म्हणायचंय का?” चौगुल्यांनी प्रश्न  केला.

यावर देसाई म्हणाले “कंपन्यांचे लोक जमीन बळकावण्यासाठी येतात तेंव्हा अशाच कांहीतरी कारवाया करतात.”

हे प्राध्यापकांच्या पथ्यावर पडलं, ते म्हणाले “पहा, तुमच्यातच कुणाला तो भूत-पिशाच्च  वाटतोय तर कुणाला माणूस वाटतोय तेंव्हा लौकिक उपाय करायचे की  पारलौकिक उपाय करायचे हे विचार करूनच ठरवावं  लागेल.”

“पण तुमचं  काय म्हणणं आहे ते तरी सांगा!” परब म्हणाले.

“छान ! तुम्ही ज्याला दैत्य म्हणता तो एक विस्थापित झालेला गवा आहे असा माझा अंदाज आहे” प्राध्यापक म्हणाले. यावर गावकऱ्यांमध्ये कुजबुज सुरु झाली, दोन मिनिटं झाल्यावर त्याचा गोंगाट व्हायला लागला तेंव्हा सरपंच म्हणाले “पाहुण्यांनी त्यांना काय सांगायचं होतं  ते सांगितलंय, आता  तुमचं  उत्तर काय आहे ते त्यांना कळू द्या.”

“त्यांच्या म्हणण्याला कांही पुरावा आहे की  ते नुसतंच त्यांचं  मत आहे ?” परबांनी विचारलं. 

“गवा असला तरी तो एखाद्या कंपनीच्या लोकांनी आणून सोडलेला नसेल कशावरून?” देसाई म्हणाले.

गुरव म्हणाले “तो गवा असला  तरी दैत्य नाही हे कशावरून? पुराणात नाही का वेगवेगळ्या प्रकारचे असुर होते!” 

“एव्हढ्या ताकदीचा गवा? आणि त्याला आमच्या घरांच्या  भिंती पाडायचं कारण काय ?” परब म्हणाले.

“तुम्ही मला पाच मिनीटं दिलीत तर मी तुमच्या प्रश्नांना उत्तरं  देऊ शकेन, मग पहा तुमचं समाधान होतंय का !” प्राध्यापक म्हणाले.

“आता इतका वेळ ऐकतोच आहोत, आणखी पाच मिनिटांचं काय !” वयस्कर आज्जी म्हणाल्या.

प्राध्यापक म्हणाले “सह्याद्रीच्या जंगलात अनेक वन्य प्राणी राहतात, आपल्या पासून जवळच असलेल्या राधानगरीच्या अभयारण्यात गवे आहेत. एक धिप्पाड  आणि शक्तिमान प्राणी अशी त्याची ख्याती आहे. त्यांचे छोटे कळप असतात, क्वचित एखादा नर कळप सोडून भटकतो. तसा  एखादा नर इकडं आला असावा..”

कुलकर्ण्यांच्या प्रकाशनं वर्गात  प्रश्न  विचारण्यासाठी विद्यार्थी हात वर करतात तसा केल्यानं  प्राध्यापक थांबले. प्रकाश म्हणाला “सर, असा भटकणारा गवा  आमच्याच गावात कशाला येईल  आणि आला तरी मोडतोड कशाला करेल?”

प्राध्यापक म्हणाले “तुझे प्रश्न रास्त आहेत. देवराई फक्त तुमच्याच गावाला आहे, मी असं ऐकलंय की  देवराईत एक आश्रम होता, म्हणजे पाण्याची सोय असेल.  गेल्या वर्षी एल निन्योमुळं पाऊस कमी पडला, जंगलात गवत,  पाणी यांचा तुटवडा निर्माण झाला असेल. अशा परिस्थितीत तुमच्या गावची देवराई ही  एखाद्या प्राण्याला आश्रय घेण्यास योग्य जागा वाटली नाही तरच नवल! आता प्रश्न राहिला तो गावात नासधूस का करतो? समजा, देवराईतल्या झाडपाल्यानं  त्याच्या सगळ्या गरजा  पूर्ण होत नसतील तर तो त्या पुऱ्या करण्यासाठी गावात येत असेल, आणि नासधूस त्याच्या कांहीतरी शोधण्याच्या धडपडीतून होत असेल.”

“सर, वन्यपशूंची अशी काय गरज असेल? इतका वेळ लक्षपूर्वक ऐकत असलेल्या नितीननं  विचारलं.

प्राध्यापक म्हणाले “भुकेची गरज अन्नानं  भागते परंतु अन्न  सकस नसेल तर पोट भरूनही शरीराची गरज भागत नाही. प्राण्यांच्या शरीराला खनिजांची गरज असते, वाळलेलं गावात किंवा झाडाची पानं खाऊन खनिजांची गरज पुरी होत नसेल तर प्राणी खनिजयुक्त अन्नाच्या शोधात फिरतात, क्षारयुक्त जमीन चाटतात.”

“हे म्हणजे पूर्वी लहान मुलं माती खात असत तसं झालं” दामले सर म्हणाले.”

“अगदी बरोबर! आपल्या देवराईत राहणारा  प्राणी बहुधा क्षारांच्या शोधात गावात येत असेल, भिंतीवरचे क्षार चाटताना त्या पाडत असेल, किंवा … असं म्हणून प्राध्यापक क्षणभर थांबले. “किंवा काय सर? अमितनं  न राहवून विचारलं.

“त्याचं काय आहे, मनात आलेला विचार केवळ कल्पना असेल म्हणून बोललो नाही, पण तो विचार असा की, घरातल्या अन्न पदार्थांच्या किंवा क्षारांच्या वासानं  तो आकर्षित होत असेल”, प्राध्यापक म्हणाले.

“सर, रात्री झोपण्या आधी सर्व झाकपाक झालेली असते, अशा  वेळी आपल्याला तर कधी वास येत नाही?” अमितनं पुन्हा प्रश्न केला.

” तेच म्हणत होतो मी, की हा माझ्या कल्पनेचा भाग असेल, परंतु विचार करा की  दोन अडीच इंच लांबीच्या नाकानं आपल्याला इतकं गंधज्ञान आहे तर फुटापेक्षा लांब नाक असलेल्या प्राण्याचं गंधज्ञान किती जास्त असू शकेल !, आपल्याला ज्याचा वास येत नसेल त्याचा त्याला वास येत असेल ! आपल्याला मिठाचा वास येत नसेल पण त्यालाही येत नसेल हे कशावरून ?” प्राध्यापक म्हणाले.

अमितनं मान हलवून सहमत असल्याचं दर्शवलं. गावातली शिकलेली मुलं  प्रश्न विचारताहेत आणि प्राध्यापक त्यांना प्रामाणिकपणानं उत्तरं देण्याचा प्रयत्न करताहेत याचा गावकऱ्यांच्या मनावर चांगला परिणाम होत होता.

“तुम्ही काय बोलताय ते आम्हाला समजतंय पण ही  सगळी तुमची  कल्पनाच आहे, आणि तो प्राणी असला तरी दैत्य नसेल कशावरून ? गुरवांनी आपला पहिला प्रश्न पुन्हा उपस्थित केला.

यावर प्राध्यापक म्हणाले “तुम्हा सर्वांना मान्य असेल तर आपण एक प्रयोग करू. प्रयोगाचा परिणाम आपल्या म्हणण्या प्रमाणे झाला, तर आपली कल्पना खरी आहे असं मानू आणि परिणाम आपल्या म्हणण्या प्रमाणे आला नाही तर आपली कल्पना चुकीची आहे असं समजून सोडून देऊ.

“आपण कल्पना सोडून दिली तरी त्या दैत्यानं  सोडायला हवी नं ! नाही तर तो खवळून उठेल आणि आणखी काहीतरी करेल” वयस्कर बाई म्हणाल्या.

“तसं झालं तर जे नुकसान होईल ते मी भरून देईन, किंवा प्रायश्चित्त घेईन, या पलीकडे मी काय हमी देऊ शकतो ?” प्राध्यापक म्हणाले.

सगळे एकदम शांत  झाले, कांही क्षण तसेच गेले, मग शांततेचा भंग करत दामले सर म्हणाले “आपण प्राध्यापकांनी सांगितलेलं सगळं  ऐकून घेतलं आहे, त्यांचा प्रयोग काय आहे तेही ऐकून घेऊ.”

“मलाही तसंच वाटतंय” सरपंच म्हणाले.  

गावकऱ्यांच्या शांतपणाचा अर्थ म्हणजे आता होकार होता.  प्राध्यापक म्हणाले “प्रयोग अगदी सोपा आहे, आपल्या पैकी कांही जणांनी क्षाराचे खडे, शेंगदाण्याची किंवा करडईची पेंड अशा वस्तू घेऊन देवराईत जायचं आणि त्यांच्या वासानं तो त्या खायला येतो का ते पहायचं. तो जर साधा प्राणी असेल तर खाद्याच्या अमिषानं  तो येईल आणि आपल्याला दिसेल. तो जर दैत्य, राक्षस, भूत यापैकी कांही असेल तर तो आपल्या हिशेबा प्रमाणे वागणार नाही, त्याच्या स्वतःच्या मनात काय असेल  तेच तो करेल”

प्राध्यापक बोलायचं थांबल्यावर गावकरी पुन्हा आपापसात कुजबुजू लागले.

“मला वाटतं, आपण हे करून बघायला हरकत नाही. नाहीतरी, वाघ म्हटलं  तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातो अशा परिस्थितीत आपण आहोत. तेंव्हा आपण प्राध्यापकांची साथ करू, तुम्हाला काय वाटतं सरपंचअण्णा ?” दामले सरांनी विचारलं.

“प्रयोग करायला हरकत नाही, पण तो निर्णय सर्वांनी घ्यायचा आहे,” सरपंच म्हणाले.

“पण देवराईत आपण बाहेरच्यांना जाऊ देत नाही, आतापर्यंत ही प्रथा आपण पाळलेली आहे, ती कशाला मोडायची ” वयस्कर बाई म्हणाल्या.

त्यावर दामले सर म्हणाले “देवराईत कुणी बाहेरची व्यक्ती गावाच्या किंवा देवस्थानाच्या व्यवस्थापकांच्या परवानगीशिवाय जाऊ शकत नाही असा दंडक आहे. पण तसं  पाहिलं  तर प्राध्यापक कुणी परके नाहीत आणि तरीसुद्धा गावानं त्यांना परवानगी दिली तर नियम मोडण्याचा प्रश्न येणार  नाही. “

एक मिनिटाचा वेळ गेला कुणीच कांही बोललं नाही, दबक्या आवाजात आपापसातली कुजबुज मात्र सुरु होती.

सरपंचांनी एकदा सर्वांवर नजर टाकली आणि म्हणाले “आपल्या सर्वांच्या वतीनं जो निर्णय होईल तो मी प्राध्यापकांना सांगायचा आहे, तुम्ही  हो म्हणत असाल तर तसं  मी त्यांना सांगतो. “

हो ! अमित चट्कन  बोलून गेला, त्याला दुजोरा देत नितीन आणि प्रकाशही  म्हणाले हो !, आता गर्दीतूनही कांही होकार अस्पष्टपणे ऐकू येऊ लागले होते, कांही  क्षणातच त्याचा एक स्पष्ट होकार झाला.                 

“कुणाचा नकार आहे का? सरपंचांनी विचारलं, त्यावर पुन्हा शांतता पसरली.

“नकार नाही, परंतु गावाची जबाबदारी त्यांच्यावर आहे याची जाणीव ठेऊन प्राध्यापकांनी जे करायचं आहे ते करावं” देसाई म्हणाले.

“ठीक आहे, गावाच्या वतीनं  मी तुम्हाला देवराईत प्रवेश करण्याची परवानगी देतो आणि त्यांच्या बरोबर मी स्वतः तिथं हजर राहीन याची ग्वाही गावकऱ्यांना देतो” सरपंच म्हणाले.

आपले म्हणणे ऐकून घेतल्या बद्दल आणि परवानगी दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून प्राध्यापक उठले. पाच मिनिटात गर्दी  पांगली.  दामले सर, अमित, नितीन, देसाई, सरपंच आणि प्राध्यापक त्यानंतर दामले सरांच्या घरी गेले. चहा घेता घेता सर्वांना प्राध्यापकांनी योजना समजावून सांगितली. पौर्णिमा जवळ आल्यानं आणि रात्री निरभ्र असल्यानं आवश्यक असेल तर रात्री देवराईत जाणं  शक्य होतं. योजने प्रमाणे या सहा जणांनी बरोबर खडे मीठ, गाई -गुरांना टॉनिक  म्हणून देतात ते क्षाराचे खडे, शेंगदाण्याच्या पेंडीच्या खापऱ्या अशा वस्तू घेऊन देवराईत जायचं होतं. सुरक्षित जागा बघून तिघा-तिघांचे गट करून लपून बसायचं  होतं. बरोबर नेलेल्या वस्तू जमिनीवर पसरून तिथपासून निदान पन्नास पावलांचं  अंतर ठेऊन लपता येईल अशी जागा शोधायची होती. अपेक्षा अशी होती की दुपारचे ऊन सरल्यावर गवा चरायला बाहेर पडेल. पसरून ठेवलेल्या वस्तूंच्या वासानं तो हे सहाजण लपलेले असतील त्या जागी येईल आणि नजरेला पडेल. गवा दिसो अगर न दिसो पण आपसात बोलायचं नाही, कसलाही आवाज करायचा नाही असं  ठरलं होतं. जरूर पडली तर रात्री उशिरा पर्यंत थांबायचं असंही  ठरलं.

दुसऱ्या दिवशी सकाळीच सर्व आवश्यक वस्तू जमा झाल्या, दुपारी तीनच्या सुमारास सामान  घेऊन मंडळी निघाली. पाण्याच्या बाटल्या, विजेऱ्या, काडेपेट्या`, पांघरण्यासाठी चादरी, आणि दंडुके असा सरंजाम बरोबर घेतला होता. देवराईत फारसं आत न जाता  योग्य जागा बघून सगळे थांबले. ही जागा आपण आधी आलो होतो त्याच्या जवळपास आहे हे अमितनं  हेरलं  होतं. सर्वांनी मिळून बरोबर आणलेले वर्तमान पत्राचे कागद जमिनीवर पसरले त्यावर आणलेले सामान पसरून ठेवले, वाऱ्यानं  उडून जाऊ नये म्हणून त्यावर दगड ठेवले.  तिथून साधारण पन्नास पावलांवर झाडांच्या मागे लपण्यासारखी जागा शोधली आणि साफसूफ करून जमिनीवर बसले.  एव्हाना पाच वाजले होते. सूर्य डोंगराच्या पलीकडे गेल्यानं आताच उजेड कमी झाला होता. लपायची जागा आणि पसरुन ठेवलेल्या  वस्तू यांच्या मध्ये मोठे झाड नव्हते पण छोटी झुडुपं  होती. ते  लपण्याच्या आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक होतं. हळूहळू अंधार पडू लागला, पक्षी आपापल्या घरट्यांकडे परतु लागले होते, त्यांचा किलबिलाट सर्वत्र ऐकू येत होता. थोड्या वेळानं अंधार पडला, पक्ष्यांचा आवाज बंद झाला. सर्वत्र शांतता पसरली . वाऱ्याच्या झुळुकी बरोबर होणारी पानांची सळसळ, गावाच्या बाजून येणार कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज किंवा जंगलाच्या बाजून येणार एखादा विचित्र आवाज हे मधून मधून शांततेचा भंग करत होती.

चंद्र उगवला, चांदण्याचा एखादा कवडसा झाडांच्या पानांमधून खाली येत होता. आठ वाजले तरीही कांही घडलं  नाही. सर्वांना बसून बसून कंटाळा आला होता, पाण्याच्या बाटल्या संपत आल्या होत्या. केंव्हा पर्यंत थांबायचंय ? सरपंच प्राध्यापकांच्या कानात कुजबुजले. अजून थोडा वेळ वाट बघू प्राध्यापक दबलेल्या आवाजात उत्तरले. कांहीच होत नाही असं  पाहून नऊ वाजता प्राध्यापक उठले आणि इतरांना हातानं   निघण्याचा इशारा केला. सर्वांनी विजेरीच्या उजेडात पसरून ठेवलेल्या वस्तू गोळा केल्या आणि हळू हळू गावाकडं  निघाले. भुकेनं  पोटात कावळे ओरडू लागले होते, एका जागेवर बसून पाय आणि पाठ अवघडले होते, जाताना कुणी फारसं बोलत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा भेटायचं ठरवून, दामले सर  प्राध्यापकांना आपल्या घरी मुक्कामासाठी घेऊन गेले, बाकीचे आपापल्या   घरी परतले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सहा जण दामले सरांच्या घरी जमल्यावर चर्चेला सुरवात झाली. कांही शेजारी चौकशीसाठी आले होते, त्यांनाही दामले सरांनी बसवून घेतलं. काल कांहीच घडलं  नाही म्हणून बाकीचे जरा नाउमेद झाले आहेत हे प्राध्यापकांच्या लक्ष्यात आलं. प्राध्यापकांचा दृष्टिकोन मात्र वेगळा होता, समजावणीच्या स्वरात ते म्हणाले “पहिला प्रयोग नेहमी यशस्वी होतोच असं नाही, पण कालच्या प्रयोगात एक उत्तर आपल्या हाती लागलं  आहे”. सर्वजण प्राध्यापकांकडं आश्चर्यानं पाहू लागले तेंव्हा ते म्हणाले “असं पहा, देवराईतला  दैत्य हा राक्षस किंवा पिशाच्च असता तर त्यानं त्याच्या  अमानवी शक्तीनं आपली योजना जाणली असती आणि आपल्याला भीती घातली असती किंवा इकडं  गावात येऊन गोंधळ घातला असता, पण तसं  कांही घडलं नाही. याचा अर्थ तो सामान्य प्राणी  असण्याची  शक्यता वाढली आहे”. प्राध्यापकांनी मांडलेल्या मुद्द्यात अर्थ आहे हे सर्वांनी मान्य केलं.

“आज काय करायचं?” दामले सरांनी प्रश्न केला. 

“आजही कालच्या प्रमाणेच करू या, जर कुणाला कंटाळा आला असेल तर त्यांनी नाही आलं तरी चालेल” प्राध्यापक म्हणाले.

“छे! छे!, आपण सगळे आज परत जाऊ” देसाई म्हणाले. बाकीच्यांनी होकार दिला. पाच साडेपाचच्या सुमारास ते कालच्याच ठिकाणी पोचले. हातातलं सामान खाली ठेऊन  मंडळी इकडं  तिकडं  बघू लागली.

“ते बघ! अमितच्या शर्टाची बाही खेचत नितीन हलक्या आवाजात म्हणाला. दोघंही काल खाद्य वस्तू ठेवल्या होत्या त्या जागेकडं  जाऊन न्याहाळू लागले. तिथलं  गवत विस्कटलेलं  दिसत होतं, आजूबाजूच्या झुडुपांची मोडतोड झालेली दिसत होती. त्यांनी खूणेनंच  बाकीच्यांना बोलावलं, सर्वांनी जागेचं निरीक्षण केलं. “आपण गेल्यानंतर तो येऊन गेला तर!” प्राध्यापक हळूच उद्गारले. दबलेल्या आवाजात ते म्हणाले, आज पुन्हा तो येऊ शकेल, आपण आपापल्या जागेवर जाऊन बसू . आधीच्या प्रमाणे सामान ठेऊन ते घाईघाईनं  आपापल्या जागेवर जाऊन बसले. तासभर गेला पण कांही घडलं  नाही. सूर्य प्रकाश आता बराच कमी झाला होता.  कांही अंतरावर झुडुपांमध्ये खसपस  झाली, सगळ्यांच्या नजरा तिकडं गेल्या, रानडुकराची एक मादी तीन-चार पिल्लांसह झुडुपातून वाट काढत खाद्य वस्तूंकडं येत होती. प्राध्यापकांनी दंडुका आपटून आवाज केला तशी ती थबकली आणि रोखून त्यांच्या दिशेनं  बघू लागली, प्राध्यापकांनी  विजेरी सुरु करून प्रकाशाचा झोत तिच्या तोंडावर टाकला. अचानक प्रखर प्रकाश दिसल्यानं ती घाबरली आणि झटकन वळून पिलांसह झाडीत दिसेनाशी झाली. आणखी थोडा वेळ गेला, संधी प्रकाश क्षीण झाला होता, पक्ष्यांचा आवाजही थांबला होता. सगळे डोक्यावर चादरी पांघरून समोर नजर लावून बसले होते.

अचानक थोडं  दूर, समोरच्या झुडुपांची हालचाल होऊ लागली, पक्ष्यांनी गोंगाट केला आणि झुडुपांमधून एक काळी  आकृती पुढे सरकताना दिसू लागली. सगळे डोळे फाडून बघू लागले. आता  ती आकृती झुडुपांच्या बाहेर पडून मोकळ्या जागेत खाण्याच्या वस्तू ठेवल्या होत्या तिथे पोचली. अंतर पन्नास पावलांचं  होतं  मध्ये कांही खुरटी झुडुपं  होती. सर्वांचे श्वास रोखले गेले. आठ  दहा फूट उंचीची ती आकृती जेंव्हा खाद्य वस्तूंपर्यंत पोचली तेंव्हा तिची प्रचंड मान  आणि त्यापुढं वळलेली शिंगं  असलेलं  मस्तक  दिसू लागलं.

मान, खांदा एव्हढे मोठे होते की  आधी असा आकार कधीच पहिला नव्हता. खांद्या  जवळ तर उंची जवळजवळ  दहा फूट असावी. मान खाली करून ती आकृती खाद्य वस्तू हुंगु लागली. मग थोडं वळून जागा बदलून त्या वस्तू  खाऊ लागली. वळताना बाकीचं शरीर दिसलं. खांद्याकडून शेपटीच्या बाजूला झालेला उतार प्राध्यापकांच्या नजरेनं  टिपला. खाण्यात मग्न असलेल्या त्या आकृतीकडं सगळे अचंब्यानं  पहात राहिले होते. एव्हढ्या कमी उजेडातही मानेचे, खांदयाचे, पाठीचे आणि पुठ्ठयाचे स्नायू त्यांच्या फ़ुगीरपणामुळं उठून दिसत होते. शरीराचा सगळा आकारचं त्यामुळं  बदलला होता.   आकृती दिसायला लागल्या नंतर तीनचार मिनिटंच झाली असतील, पण सर्वांना तेव्हढा वेळ खूप जास्त असल्या सारखा वाटला. कुणाच्या तरी शरीराची हालचाल झाली, तेव्हढ्या आवाजचं  निमित्त झालं, त्या आकृतीनं  मान वर करून पाहिलं, एक फुस्कारा  टाकला आणि ज्या दिशेनं आली होती त्या दिशेनं वेगानं  झाडीत निघून गेली. सर्वांना भानावर येण्यासाठी कांही क्षण लागले.

“बाप रे ! आतापर्यंत दाबून ठेवलेले उद्गार मुलांच्या तोंडून बाहेर पडले.

“काय तो प्राणी होता की राक्षस ! सरपंच उद्गारले.

 “केव्हढा प्रचंड प्राणी तो ! त्याला पाहून माझ्या तोंडचं पाणीच पळालं ! देसाई म्हणाले.

“मला वाटतं  आपल्याला समस्येचं उत्तर मिळालं  आहे, आता इथं थांबण्याची गरज नाही” प्राध्यापक म्हणाले.

देवराईच्या बाहेर पडल्यावर ते थांबले, प्राध्यापक म्हणाले “माझा अंदाज होता की  तो गवा असावा आणि आता मला खात्री आहे की तो गवाच आहे.

“पण तो प्राणी खूप मोठा आणि वेगळाच दिसत होता” सरपंच म्हणाले.  त्याचं कारण मी तुम्हाला सांगू शकतो पण त्या आधी  तुम्हाला बरीच इतर माहिती सांगावी लागेल, परंतु त्याची उतरती पाठ, उंच खांदा, छोटी वळणदार शिंगं  आणि खुरांच्या वरती पायाला असलेला पांढरा रंग  या सर्व खुणा तो गवा  असल्याच्याच आहेत”  प्राध्यापक म्हणाले.

कांही तरी असामान्य पाहिल्यानंआणि प्राध्यापकांचा अंदाज खरा ठरल्यानं सगळे उत्तेजित झाले होते. झपाझप पावलं टाकत ते गावाजवळ पोचले. दुसऱ्या  दिवशी सकाळीच गावकऱ्यांची सभा घेण्याचं  ठरवून सर्व जण पांगले.

दुसऱ्या दिवशी  सकाळीच सरपंचांनी निरोप धाडले, सर्वांनाच कुतुहूल असल्यानं  लोक हातातली कामं  बाजूला ठेवून पटांगणात जमा झाले.  सर्वांना शांत राहायला सांगून सरपंचांनी बोलायला सुरवात केली “गावानं परवानगी दिल्याप्रमाणं प्राध्यापकांनी प्रयोग केला आहे, आता तेच तुम्हाला त्या बद्दल सांगतील”.

प्राध्यापक उभे राहिले, त्यांनी कोण कोण देवराईत गेले, तिथं काय केलं याचं  व्यवस्थित वर्णन केलं आणि पुढे म्हणाले” त्या प्राण्याची आपण परीक्षा घेतली आहे, आपण त्याच्यापेक्षा जास्त बुद्धिमान असल्यानं आपण त्याच्या विषयी अंदाज बांधू शकतो, तो आपल्यापेक्षा हुशार असता किंवा पिशाच्च वगैरे असता तर त्यानं आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असता. उन्हाळ्यानं हैराण झालेला, सकस चाऱ्याच्या अभावामुळं शरीराची खनिजांची गरज न भागणारा असा तो एक गवा आहे हे आता मी निश्चितपणे सांगू शकतो. त्याच्या विशिष्ट आनुवंशिक परिस्थितीमुळं  त्याचे स्नायू आणि सर्वच शरीर सामान्य गव्यापेक्षा मोठं आहे, साहजिकच त्याची भूक मोठी आहे आणि ती भागवण्यासाठी तो प्रयत्न करतो आहे. या समस्येवर उपाय सोपा आहे थोडा चारा आणि गुरांना देतात ते टॉनिकचे क्षार आपण देवराईत ठेवत जाऊ म्हणजे त्याला इकडे येण्याची गरज उरणार नाही. एकदा पावसाला सुरवात झाली आणि गवत वाढलं की  तो जसा चरत चरत आला तसाच निघूनही जाईल. पण मला असं  वाटतं  की  तो इतका दुर्मिळ आहे की  त्याला घालवून देण्या पेक्षा ठेवून घेण्यात गावाचा फायदा आहे. तो जर त्रास न देता इथं राहिला तर तो मोठं आकर्षण ठरेल.  गावानं या बाबतीत जरूर विचार करावा. प्राध्यापकांना उद्देशून अमित म्हणाला “सर, जसा  तुम्ही दैत्याचा रहस्यभेद केलात तसा देवराईतल्या इतर पिशाच्चांचाही केला असता तर किती छान  झालं  असतं, आम्हाला निर्धास्तपणे देवराईत जाता आलं  असतं”.  त्यावर प्राध्यापक स्मित करत म्हणाले, “तो तुमच्या भावनेचा प्रश्न असल्यानं  मी कांही बोललो नाही” .

“बोला सर  तुम्ही, तुमचं बोलणं  कुणाला कटू वाटलं तरी ते आमच्या भल्यासाठीच असेल” नितीन म्हणाला.

प्राध्यापक म्हणाले “तुम्ही ज्याला आश्रम म्हणता तो सुरु करणारा बैरागी  म्हणजे चांगले शिकले सवरलेले गृहस्थ होते, त्यांना वैराग्य आल्यानं  ते इथे येऊन राहिले होते. ते अडचणीत सापडलेल्याना सल्ला देत, त्यांना वनौषधींची माहिती होती त्यातून ते औषधं देत. स्वतःच्या मनाला प्रसन्न वाटावं म्हणून त्यांनी  अनेक फुलझाडं  लावली, त्यात शोभेची होती तशी सुगंधी फुलांचीही होती.”

“आम्ही असं ऐकलं आहे की  ते झपाटलेल्या लोकांना बरं  करत असंत, खरं  आहे का ते ?” अमितनं  विचारलं.

त्यावर प्राध्यापक म्हणाले “त्याचं  असं  झालं  की मानसिक तणाव किंवा त्रास असणारे त्यांच्याकडं येत, तिथल्या वातावरणात लोकांचं मन हलकं होई. हळू हळू जास्त त्रास असणारे लोक येऊ लागले, तिथं राहण्याची सोय करावी लागली. ते रुग्णांना फुलं, वनौषधी गोळा करण्यास सांगत. नैसर्गिक वातावरण, कसल्याही तणावाचा अभाव  आणि वनौषधी आणि सुगंधी फुलांचं सानिध्य यांमुळे रुग्णाची मानसिक स्थिती आपोआपच सुधारत असे. ज्यांना लोक झपाटलेले म्हणून घेऊन येत असत ते खरे मानसिक संतुलन बिघडलेले रुग्ण असत, त्यांना भूतबाधा म्हणणे हा मनाचा खेळ होता आणि आता देवराईत पिशाच्च  आहेत असं  म्हणणं  हाही समजुतीचा भाग आहे.”

“मग  देवराईत जाण्यास मज्जाव का करण्यात आला, त्यासाठी कांहीतरी कारण असेलच नं? परब म्हणाले.  “आहे  नं, देवराईची मूळ कल्पनाच अशी आहे की ते देव-देवतांच्या नावानं  राखून ठेवलेलं वन असतं, तिथं कुणी जाऊन झाडं -झुडूपं तोडू नयेत म्हणून कुणी तरी भूत-खेताची भीती घातली असेल” प्राध्यापक म्हणाले.

“म्हणजे देवराई झपाटलेली नाहीच की काय ?” अमित आणि नितीन एकत्रच उद्गारले.

“मी  माझं मत सांगितलं, आता तुम्ही आपापसात चर्चा करून आणि कांही प्रचिती येते का ते पाहून ठरवा” प्राध्यापक म्हणाले.  आपण ज्याला इतकं घाबरत होतो त्या समस्येला असं उत्तर सापडल्यानं गावकरी आनंदित झाले होते. 

सरपंच म्हणाले “गावकऱ्यांनो ज्याला आपण दैत्य समजत होतो त्याचं रहस्य प्राध्यापकांनी आपल्याला उलगडून दाखवलं आहे इतकंच नव्हे तर तो दुर्गमगडचा दागिना ठरू शकतो असं त्यांनी आपल्याला सांगितलं  आहे, त्यांनी एव्हढी मदत केली त्याबद्दल आपल्या सर्वांतर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि जेंव्हा केंव्हा शक्य होईल तेंव्हा त्यांनी येऊन आपल्या गावाचे रहिवासी व्हावं असं निमंत्रण त्यांना देतो”, एव्हढं बोलून सरपंचांनी टाळ्या वाजवायला सुरवात केली, सारे गावकरी त्यात सामील झाले, दुर्गमगडचा परिसर टाळ्यांच्या कडकडाटानं दुमदुमून गेला.

सुरेश गोपाळ भागवत (१९/६/२०२५)
मूळ लिखाण साधारण पंधरा वर्षांपूर्वी केले होते त्याची ही  संक्षिप्त आवृत्ती.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *