तर्कानं सुटलं कोडं

बाबा कुलकर्ण्यांचे दोन चिरंजीव आणि एक कन्या आज सर्वात थोरला दिनू याच्या घरी जमणार होते. ही  तीन भावंडं दोन-अडीच वर्षांच्या अंतराने जन्मली होती. तिघंही अतिशय सुस्वभावी होते. तिघंही सेकंड क्लास मध्ये पास होऊन नोकरीला लागले होते. सगळ्यांचे ठीक चालले होते आणि ते समाधानी होते. बाकी सर्व ठीक असलं तरी एक अडचण होती, विचार करण्याची वेळ आली की  तिघंही माघार घेत. बाबांच्या शब्दांत सांगायचं झालं तर त्यांच्या कुलदीपक आणि समईच्या वेळी देवानं तेल, वात  घालून सगळी तयारी केली होती पण ऐनवेळी काडेपेटीतल्या काड्या संपल्या असाव्या. त्यामुळे त्यांच्या कुलदीपकांचा आणि समईचा उजेड पडला नव्हता. बाबा स्वभावानं चिकित्सक आणि अभ्यासू तर त्यांची मुलं खेळकर आणि साधीभोळी. बाबा आणि त्यांची मुलं एका कुटुंबात एकत्र करणं हा विधात्याच्या विनोदी स्वभावाचा एक पुरावाच होता.

दिनूच्या घरी दुसऱ्या क्रमांकाची अनु  पोचली होती आणि ते धाकट्या मनुची वाट पहात होते. थोड्या वेळानं  धापा टाकत मनू आला. “या…!” असं  म्हणून दोघांनीही त्याचं  स्वागत केलं. खुर्चीवर बसून, पाणी  पिऊन, घाम पुसत पुसत मनू सांगू लागला, “काय झालं, बस या स्टॉपला थांबलीच नाही!”

“थांबेल कशी? तू  नेहमी प्रमाणं चुकीची बस पकडली असशील, आणि कारणं कशाला देतोस? आम्ही विचारलं  का तुला, उशीर का झाला म्हणून?” दिनू म्हणाला.

“तसं नाही रे! मी आपला काय झालं ते सांगत होतो” मनू म्हणाला.

“चला! सगळे जमा झाले आता, आणि वहिनी नाहीत ना रे घरी?  मग मीच चहा टाकते सगळ्यांसाठी” खुर्चीतून उठत अनु म्हणाली.

“एक कप जास्त टाक” मनू म्हणाला.

“आणि चहात साखर घाल, नाहीतर पुन्हा मीठ घालशील!” दिनू म्हणाला.

“काय रे दिनूदादा, एकदा चुकून चहात साखरे ऐवजी मीठ पडलं होतं ते तू आयुष्यभर लक्ष्यात ठेवणार आहेस     का? कामाच्या गोष्टी का नाही लक्ष्यात ठेवत त्यापेक्षा?” अनु म्हणाली.

“अगं लक्ष्यात ठेवण्याचा प्रश्नच नाही, त्या मीठवाल्या गरम चहानं मला जो झटका दिला तो अजून ताजा आहे माझ्या जिभेवर!” दिनू म्हणाला.

अनु चहा करण्यासाठी आत गेली, एकदम आठवल्या सारखं करून दिनू म्हणाला “काय रे मनू , कामाचं  काय झालं ?”

“तेच तर सांगणार होतो, तूच मला थांबवलंस. आपल्या शाळेत तो पप्पू होता नं, तो परवा भेटला होता. आठवतोय का तुला पप्पू ?” मनूनं विचारलं.

“तो दर वर्षी नापास होत होता तो?” दिनूनं  विचारलं.

“तो वेगळा, हा पप्पू म्हणजे प्रफुल्ल, हा चांगला हुशार होता, त्यालाही सगळे पप्पूचं म्हणत” मनू  म्हणाला.

“बरं काय म्हणत होता तो? आणि तुला कुठे भेटला तो?” दिनूनं  विचारलं.

“मी ऑफिस मधून घरी जात होतो, मागून एक कार आली आणि शेजारी येऊन उभी राहिली. पप्पूनं मला एकदम नावानंच  हाक मारली, मी त्याला विचारलं “इतक्या दिवसांनी आणि पाठीमागून कसं ओळखलंस मला?” तर तो म्हणाला “या दुनियेत तुझ्या इतकी ढिली  चाल असलेला दुसरा कुणी असेल असं  वाटत नाही! शाळेत असताना जसा चालायचास तसाच अजूनही चालतोस!” मनू  म्हणाला. यावर सगळे हसले.

दिनूनं  विचारलं “काय करतो पप्पू आता?”

“अरे तो एकदम मोठ्या पोस्टवर आहे आणि बऱ्याच कंपन्यांचा कन्सल्टंट आहे. तुम्हा सर्वांची चौकशी करत होता, त्याला पण इथं  बोलावलंय भेटायला. येईलच तो एवढ्यात” मनू म्हणाला.

चहाचे कप  घेऊन अनु बाहेर आली, प्रत्येकाच्या हातात कप  देऊन खुर्चीत बसली तोच चहाचा घोट घेऊन दिनूनं चेहरा विचित्र केला आणि म्हणाला “बघ मी आठवण करून दिली होती तरीसुद्धा तू गोंधळ केल्यासच, आता साखर घालायचीच विसरलीस!”

“अरेच्चा ! तो बिनसाखरेचा कप चुकून तुला दिला वाटतं, हा मनू  आजकाल बिनसाखरेचा चहा घेतो म्हणून त्याच्यासाठी तो केला होता, थांब तुझ्या चहात साखर घालते” अनु  म्हणाली.

“त्याच्या चहात घालशील गं, पण माझ्या चहातली कशी काढशील?” मनूनं  विचारलं.

“असू दे, घे आजचा दिवस साखरेचा चहा, नाही तरी उगीचच बिनसाखरेचा घेतो आहेस, तुला कांही मधुमेह झालेला नाही” अनु म्हणाली.

“आणि बरं का रे दिनू दादा, हा मनू टी व्ही वरचा कुठला तरी डाएटिंगचा कार्यक्रम बघून डाएट करत होता. त्यांनी सांगितलं की  साखर बिलकुल वर्ज्य करा, तर यानं  साखर खायची तर बंद केलीच, पण रोज रात्री दोन-तीन वाजता उठून बसायला लागला” अनु  म्हणाली.

“ते कशासाठी?” दिनूनं  विचारलं.

“कशासाठी?, पहाटेची झोप  ही साखर झोप असते नं, म्हणून!” अनु  म्हणाली. यावर सगळे पुन्हा हसले.

“तुला कसं समजलं हे?” दिनूनं विचारलं.

यावर अनु म्हणाली “अरे याच्या बायकोनंच सांगितलं मला की  यांची कांहीतरी समजूत घाला म्हणून”. 

हे संभाषण सुरु असतानाच दारावरची बेल वाजली, दारात पप्पू उभा होता.  “अरे ये ….” जागेवरून उठत दिनू म्हणाला. त्याला बोलताना अडखळल्याचं पाहून पप्पू म्हणाला “अरे ये पप्पू, असंच  म्हणायचं  होतं नं तुला, मग थांबल्यास का मधेच?”

“अरे, लहानपणी तू पप्पू होतास, आता तुला तशी हाक मारायची म्हणजे अवघड वाटतंय” दिनू म्हणाला.

पप्पू आत येऊन बसला, अनुनं त्याला चहा आणून दिला.

“त्या दिवशी रस्त्यात आपलं बोलणं पूर्ण झालं नाही, एव्हढा पुढं  कसा गेलास नोकरीमध्ये?” मनूनं पप्पूला विचारलं.

“काय झालं, मी एम एस्सी झालो आणि नोकरीला लागलो. नोकरी करताना सतत कोणत्या ना कोणत्या परीक्षेला बसत राहिलो. वेगवेगळे कोर्सेस केले, त्यांच्या बळावर अधिक चांगल्या नोकऱ्या मिळत गेल्या. अशीच एक परीक्षा असते बुध्यांकाची, सहज म्हणून परीक्षेला बसलो  आणि पास झालो. त्यापरीक्षेत पास झालेल्यापैकी  जास्त गुण  मिळालेले दोन टक्के उमेदवारंच निवडले जातात. मी पास तर झालोच आणि माझा बुध्यांक खूप उच्चआला! त्यामुळं  माझा आत्मविश्वास तर वाढलाच पण आजूबाजूच्या लोकांमध्ये माझा भाव वधारला. या  निवडलेल्या दोन टक्के लोकांची एक सोसायटी आहे, तिला मेन्सा सोसायटी म्हणतात, तिचा मी सदस्य झालो. त्यानंतर ‘ट्रिपल नाईन‘ नावाच्या आणखी एका सोसायटीची परीक्षा पास झालो आणि तिचा सदस्य झालो. हे ज्यांना माहिती होतं  ते लोक मला त्यांच्या कंपनीत काम करण्यासाठी निमंत्रण देतात, कांही कंपन्या कन्सल्टंट म्हणून ठेवतात” पप्पू म्हणाला.

“ए, मी त्या परीक्षेला बसलो तर काय होईल रे?” मनूनं पप्पूकडं पाहून प्रश्न विचारला.

“अरे, ती बुध्यांकाची चाचणी आहे, तुझ्यासाठी वेगळी चाचणी करावी लागेल आणि त्याला मठ्ठान्क किंवा असं कांही तरी परिमाण शोधून काढावं लागेल” दिनूच्या या विधानावर सगळे हसले.

“कसं काय जमतं  हे सगळं तुला? शाळेत असतात तू हुशार असल्याचं आम्हाला समजत होतं, पण इतका हुशार असशील असं  वाटलं नव्हतं” अनु म्हणाली.

“अगं, मेंदूला रोज खुराक आणि व्यायाम दिला की तो आपोआप मेहनत करायला लागतो, आता एखादा प्रश्न किंवा समस्या पहिली की माझा मेंदू चौखूर उधळतो” पप्पू म्हणाला.

“अरे, मग आमची समस्या तुला सोडवता येते का ते बघ न जरा” दिनू म्हणाला.

“खरं तर पप्पू त्या दिवशी भेटला तेंव्हा मलाही असंच वाटलं होतं की आपली समस्या त्याला सांगावी” मनू म्हणाला.

“बाप रे! एव्हढं डोकं चालवलंस तू? आता आठ दिवस चांगली विश्रांती घे, नाही तर अति श्रमानं  तब्बेत बिघडायची!” अनु म्हणाली.

“तुमची गफलत होतेय! देवानं डोकं चालवायला नाही दिलं, चालवायला दिलं असतं  तर पावलाच्या जवळ नसतं  का दिलं? डोकं जमिनी पासून पाच सहा फूट उंच ठेवण्या मागचा उद्देशच हा आहे की ते चालवण्याचा प्रयत्न करू नये. आणि असं पहा, हात-पाय कसे वेगवेगळ्या प्रकारे हलवता येतात पण डोकं  मात्र फक्त हो आणि नाही असंच हलवता येतं, जरा फिरवून बघा चक्कर येते की नाही!” मनूनं आपलं मत सांगितलं.

यावर दिनू म्हणाला, “हा आमचा मनू  डोकं न चालवण्याच्या हट्टापायी देवाला सुद्धा अडचणीत टाकेल. शाळेत असताना खेळाच्या तासाचे मास्तर याला पोहायला शिकवताना  काय म्हणाले होते माहिती आहे? ते याला म्हणाले तू बिनधास्तपणे पाण्यात उडी मार, बिलकुल बुडणार नाहीस, डोक्यात नुसती हवा भरली असल्यानं ते पाण्याच्या वरच तरंगेल आपोआप”, सगळे पुन्हा हसले.

हशा ओसरल्यावर मनू म्हणाला, “अरे दादा, त्या सरांचं  काय घेऊन बसला आहेस तू! त्यांची एक गम्मत आठवतेय? एक पालक त्यांच्या दोन मुलांना खेळाच्या कोचिंग क्लास  मध्ये दाखल करायला आले होते. धाकट्याच्या जन्म  तारखेचा दाखला होता, त्याची जन्म तारीख टाकली त्यांनी रजिस्टरमध्ये ०२-१२-१९६३. पालक म्हणाले थोरल्याचा जन्म तारखेचा दाखला आणला नाहीये, पण हा दोन वर्षांनी मोठा आहे, तर सरांनी त्याच्या जन्माचं साल लिहिलं १९६५!” यावर पप्पू , दिनू आणि मनू  हसले, त्यांचं हसणं  थांबल्यावर अनु म्हणाली “त्यात काय चुकलं सरांचं ?” पुन्हा एकदा बाकीचे सगळे हसले.

दिनू म्हणाला “ते जाऊ दे, त्या सरांची  शिष्या शोभतेस तू , गुरुची गादी चालवायला कुणीतरी असायला हवं!”  

पप्पू सर्वांना उद्देशून म्हणाला “समस्या काय आहे सांगाल की नाही?”

“ए दादा तूच सांग रे !” अनु आणि मनू एकदमच म्हणाले.

दिनूनं सांगायला सुरवात केली “आमच्या बाबांना तू ओळखतॊस. पहिल्या पासूनच जरा संशयी स्वभाव आहे त्यांचा, कुठलीही वस्तू उघडपणे न ठेवता दडवून ठेवतात आणि सांकेतिक पद्धतीनं  लिहून ठेवतात. एके दिवशी ते महत्वाची कागदपत्रं नीट लावून ठेवत होते, त्यात आमचीही पासबुकं, सर्टिफिकेट्स वगैरे होती. ते म्हणाले सगळी सुरक्षित राहावी म्हणून व्यवस्था करतो. दुपारी टेबलावर कांही तरी लिहीत होते, खुर्चीतून उठताना खुर्ची कलंडली आणि ते पडले. धप्पकन आवाज झाला म्हणून मी बघायला गेलो तर बाबा फरशीवर बेशुद्ध पडले होते. मी त्यांच्या तोंडावर पाणी मारल्यावर ते शुद्धीवर आले. मी डॉक्टरांना बोलावलं  तर डॉक्टर म्हणाले त्यांना कांही इजा झालेली नाही परंतु त्यांना त्या प्रसंगाची बिलकुल आठवण नाही, टेबलावर बसून काय करत होते किंवा त्या आधी कांही मिनिटं काय केलं  याची त्यांना बिलकुल स्मृती नाही. त्या बाबतीत प्रश्न  विचारले तर त्यांना राग येतो. आता ती कागदपत्रं कुठं  शोधायची हा प्रश्न आहे”. अनु आणि मनूनं मान डोलावून माहिती व्यवस्थित सांगितल्याची पावती दिली.

पप्पूनं  सगळं लक्षपूर्वक ऐकून घेतलं होतं. तो म्हणाला “बाबांचं डोकं फरशीवरआपटल्यामुळं मेंदूला जो धक्का बसला त्यामुळं त्या वेळेची घटना स्मृतीत सामील होण्याआधीच पुसून गेली असणार. या प्रकाराला अम्नेशिया असं नाव आहे. आता  त्यांना ती घटना आठवण्याची शक्यता जवळ जवळ नाहीच. पण तुम्ही कांही शोधाशोध केली की नाही?

यावर दिनू म्हणाला “आम्ही थोडीफार शोधाशोध केली पण बाबांच्या खोलीत इतके कागद, लिफाफे, फायली आहेत की कुठं शोधायचं  हाच मोठा प्रश्न आहे आणि शोधायला गेलं  की  बाबांना राग येतो, ‘इथं कांही हलवा हलव करू नका’ अशी सक्त ताकीद आहे.

“बाबा कुठं आहेत आता?” पप्पुनं विचारलं.

“ते गेले आहेत त्यांच्या आजोबा मंडळाच्या कार्यक्रमाला, संध्याकाळी परत येणार आहेत” दिनू म्हणाला.

“आपण बाबांची खोली पाहू शकतो का?” पप्पूनं विचारलं.

“हो, त्यात कांहीच अडचण नाही” दिनू म्हणाला.

चौघंही बाबांच्या खोलीत गेले. खोलीत पुस्तकांची तीन कपाटं होती, त्यात वह्या, डायऱ्या,  पुस्तकं, फायली आणि सुटे कागद गच्च भरलेली होती. टेबलावरही कागदांचे गठ्ठे होते. हे सर्व पाहिल्यावर पप्पूला समस्येची कल्पना आली. टेबलाच्या उजव्या भागावर कागदांची चळत होती, ते अजून व्यवस्थित फाईल न झालेले, गेल्या कांही दिवसातले कागद असावेत असं वाटत होतं.

“या गठ्ठयात पाहू का जरा?” पप्पूनं  विचारलं.

“हो, पहा की” दिनू म्हणाला.

पप्पूनं  एक एक करून कागद काढायला सुरवात केली. कागदाचे छोटे तुकडे, पावत्या, बिलं, हँडबिलं, जाहिराती इत्यादींची ती चळत होती. त्यातच एक पाकीट दिसलं ते बरंच सुस्थितीत आणि स्वच्छ  दिसत होतं. ते न वापरलेलं असेल म्हणून बाजूला ठेवणार एव्हढ्यात पप्पूला कल्पना सुचली, त्यानं  पाकिटाचा घडी होणारा भाग उघडला, आतल्या बाजूला  एक तारीख लिहिलेली होती. “बाबा पडले त्याला किती दिवस झाले?” पप्पूनं  विचारलं.

“आठ -दहा दिवस झाले असतील” असं म्हणून दिनू कॅलेण्डरकडं  बघू लागला, आणि म्हणाला “गेल्याच्या गेल्या शनिवारी पडले म्हणजे सात तारखेला”.

 “हं! हे पहा, हे त्या दिवसाची तारीख टाकलेलं पाकीट आहे” पाकीट उघडत पप्पू म्हणाला. पाकिटात एक कागद होता त्यावर कांही ओळी  लिहिलेल्या होत्या, पप्पूनं  त्या वाचायला सुरवात केली. एक ओळ वाचल्यावर त्यानं विचारलं “बाबांना कविता करण्याचा छंद आहे का?”

 यावर मनू म्हणाला “बाबांना कसला छंद नाही ते विचार! त्यांना काव्य, संगीत, साहित्य, क्रीडा, संस्कृती, अध्यात्म, इतिहास, भूगोल या आणि आणखी कितीतरी विषयांमध्ये रुची आहे. देवानं आमच्या बाबांना घडवताना दुनियेतल्या सगळ्या विषयांचा एक एक चमचा टाकला असावा, पण दोन चमचे कोणत्याच विषयाचे टाकले नसावेत”.

“बरं! कविता करण्याचे त्यांचे आवडते विषय कोणते? पप्पूनं  विचारलं.

“आम्ही पाहिलेलं  त्यांचं लिखाण जास्त करून  रामायण, महाभारत किंवा पौराणिक विषयांवर आहे” दिनू म्हणाला.

पप्पूनं  हातातला कागद तिघांना दाखवला आणि विचारलं” हे अक्षर बाबांचंच  आहे नं?”

“अक्षर बाबांचंच आहे, काय लिहिलंय पाहू दे” अनु म्हणाली. तिनं  तो कागद पप्पूकडून घेतला आणि ओळी  सर्वांनाच वाचून दाखवल्या. कुणालाच कांही अर्थबोध झाला नाही, पप्पू मात्र त्या ओळींकडं लक्षपूर्वक बघत राहिला.

“या ओळी  म्हणजे निश्चित कांहीतरी संदेश आहे, कारण यात विषय निश्चित कांही दिसत नाही, असं म्हणून पप्पू त्या ओळी सावकाश वाचू लागला.

कुठे कुठे तू त्यास शोधशील

नक्षत्रातील शेवटचे स्थल

अरुण उषेच्या मिलनी  मंगल

स्वरावलीच्या हृदयी कोकिळ

पप्पू विचार करता करता स्वतःशी पुटपुटु लागला, “कुठे कुठे तू त्यास शोधशील …. म्हणजे कुणास?, नक्षत्रातील शेवटचे स्थल … म्हणजे कुणाचा तरी किंवा कशाचा तरी शोध घेण्या  बाबत लिहिलं  आहे. नक्षत्रातील शेवटचे स्थल … शेवटचं नक्षत्र म्हणजे रेवती … तुमच्याकडं रेवती नावाचं कुणी आहे का ?” पप्पूनं  विचारलं. तिघांनीही  मिनिटभर डोकी खाजवली, पण रेवती नावाचं त्यांच्या माहितीत कुणीही नव्हतं.

“मग शेवटचे स्थल  म्हणजे सत्तावीस क्रमांकाचं  कांही तरी असेल, सत्तावीस काय असतील  घर नंबर, खोल्या, खिडक्या, कोनाडे? पप्पू पुट्पुला.

पपूनं  सर्वत्र नजर टाकली, कपाटाच्या कप्प्यांना आणि खणाना अनुक्रम लिहिलेली छोटी छोटी लेबल्स  चिकटवलेली होती. सत्तावीस क्रमांकाचा एक खण  त्याला सापडला. त्या खणात डाव्या बाजूला एक आणि उजव्या बाजूला दुसरा असे फायलींचे गठ्ठे होते.

आधीच्या ओळीचा अर्थ हा खण असेल तर पुढच्या ओळीत पुढची सूचना असेल, पप्पूनं पुढच्या ओळीवर नजर टाकली. अरुण उषेच्या मिलनी मंगल … अरुण आणि उषा कुठे मिळतात? …. पूर्वेला .. मग पूर्व दिशेचा कांही संबंध असेल… . त्यानं दिशांची चौकशी केली, खण उघडत होता उत्तर दिशेला म्हणजे पूर्व दिशेला एक आणि पश्चिमेला दुसरा असे फायलींचे गठ्ठे ठेवलेले होते. पूर्व दिशेचा गठ्ठा त्यानं न्याहाळण्यास सुरवात केली. प्रत्येक फायलींवर नाव किंवा क्रमांक लिहिलेला होता. फायलींमध्ये कात्रणं,   माहिती पत्रकं हातानं  लिहिलेला मजकूर असे वेगवेगळे कागद होते. पप्पूनं  पुढची ओळ वाचली … स्वरावलीच्या हृदयी कोकिळ …..

“खरं तर कोकिळेच्या हृदयी स्वरावली … असं असायला हवं नाही का?” अनु म्हणाली.

तसं लिहिलं  असतं तर  ती कविता झाली असती, हा संदेश आहे असं म्हणून पप्पू पुन्हा पुटपुटू लागला, स्वरावली म्हणजे सात स्वर असतील, कोकीळ म्हणजे पक्षी किंवा  काळा  रंग, किंवा कोकिळेचा पंचम स्वर असू शकेल! त्यानं गठ्ठ्यातल्या मधल्या फाईल्स बघायला सुरवात केली. एका फाईल मध्ये एक चॉकलेटी रंगाचं पाकीट सापडलं. “अरे सापडला कोकीळ, तो उद्गारला. त्यानं  पाकीट उघडलं, त्यात एका कागदावर कांही ओळी व्यवस्थित लिहिलेल्या होत्या   

दशरथपुत्रे  ज्येष्ठ मासी

कृष्ण पक्ष चतुर्थीचे दिवशी

संधीकाली पूजिले सांबासी

अर्पूनि पलाश पत्रासी

मंत्रोच्चारण इथेच सरले

एक पर्ण परी त्यातून तुटले

या मंत्राचे मर्म न कळले

तयास त्याचे दर्शन कुठले?

या ओळी दोन तीन वेळा वाचल्यानंतर पप्पूच्या लक्ष्यात आलं की हे देखील कोणा  प्रसंगावरचं काव्य नसून तो एक संदेश आहे.  त्यानं त्या ओळी पुन्हा वाचल्या …. दशरथपुत्रे  ज्येष्ठ मासी … दशरथाच्या विशिष्ट  पुत्राचा संबंध असता तर त्याचं नाव लिहिलं असतं, मग दशरथाच्या चार मुलांनी असं असेल का? म्हणजे चार असं म्हणायचं असेल. ज्येष्ठ महिन्यात तर विशेष असं कांही नसतं मग ज्येष्ठ कशासाठी? बहुधा चैत्र, वैशाख, ज्येष्ठ म्हणजे तिसऱ्या क्रमांकासाठी असेल, कृष्ण पक्ष म्हणजे दुसरा पक्ष  आणि चतुर्थी म्हणजे पुन्हा चार, म्हणजे ४३२४, काय असेल  ही  संख्या? पप्पू विचार करत होता पण कांही अर्थ लागत नव्हता. त्यानं पुढची ओळ वाचली, संधीकाली पूजिले सांबासी .. संधीकाली म्हणजे सूर्यास्तानंतर … म्हणजे दिवसाचा चवथा प्रहार असेल? पूजिले सांबासी …सांब म्हणजे शंकर म्हणजे त्रिनेत्र  म्हणजे तीन .. आता पप्पूच्चे विचार आकड्यांच्या दृष्टीनं प्रत्येक शब्दाकडं पाहू लागले होते.  आता सर्व मिळून त्या आकड्यांचा क्रम ४३२४४३असा झाला होता. “हा काय बँक खात्याचा नंबर आहे की कुणाचा फोन नंबर?” दिनूनं  विचारलं.

“थांबा  थांबा अजून पुढचं वाचायचं आहे, पुढं लिहिलं  आहे … अर्पून पलाश पत्रासी .. पलाश  म्हणजे पळस म्हणजे तीन  कारण पळसाला पाने तीन … मंत्रोच्चारण इथेच सरले, एक पर्ण परी त्यातून तुटले म्हणजे तिनातून एक गेला खाली राहिले दोन … म्हणजे संख्या झाली ४३२४४३२. पप्पू त्या संख्येकडं पाहत राहिला आणि म्हणाला “संख्या तर ओळखीची वाटते आहे पण कांहीं तरी गडबड आहे”.

“ओ! तुझी संख्यांशी  पण ओळख आहे का?” अनुनं भाबडेपणानं विचारलं. तिला हातानंच थांबण्याची खूण  करून पप्पू ती संख्या पुटपुटत राहिला, मग त्याचा चेहरा एकदम उजळला, तो म्हणाला “बाबा शास्त्रीय संगीताचे जाणकार आहेत का? “का रे? तुला या आकड्यातून गाणं  ऐकू येतंय की काय? आणि मगाशीच तुला सांगितलं  नं की बाबांना घडवताना देवानं एक एक चमचा सगळ्या गोष्टींचा वापरला असावा, संगीताच्या बाबतीत चमचा थोडा मोठा असेल. बाबांना संगीताची आवड आहे हे आम्ही सांगू शकतो पण ते जाणकार आहेत की नाही हे आम्ही कसं  सांगणार ?” मनू  म्हणाला.

 “ठीक आहे, माझ्या अंदाजा प्रमाण  बाबांनी ४३२४४३२ ही  संख्या डोळ्यासमोर ठेऊन हा संदेश लिहिला आहे. भारतीय संगीतातल्या स्वरांच्या श्रुतींचे आकडे एकासमोर एक लिहिले तर ही  संख्या बनते. जो पर्यंत हे लक्ष्यात राहील तो पर्यंत ही  संख्या विसरणार नाही, मानलं  बुवा बाबांना!” पप्पू म्हणाला.

“पण ही  संख्या आहे कशासाठी?” दिनूनं  विचारलं.

“ही  संख्या म्हणजे बँकेच्या खात्याचा नंबर किंवा किल्लीचा  नंबर किंवा अशाच कोणत्या तरी महत्वाच्या गोष्टीचा कोड नंबर असला पाहिजे, बाबांच्या बोलण्यात या बाबत कधी कांही आलं होतं का?” पप्पूनं  विचारलं.

“नंबर वगैरे कांही बोलले नव्हते, पण महत्वाच्या वस्तू , कागदपत्रं  वगैरे पेटीत  सुरक्षित राहतील अशी ठेवणार आहे असं  म्हणाले होते” दिनू म्हणाला.

“आहे का अशी एखादी पेटी घरात?” पप्पूनं  विचारलं.

“हो, बाबांनी कांही दिवसापूर्वी एक मोठी ब्रिफकेस सारखी पेटी विकत आणली होती, ती यातल्याच एखाद्या कपाटात असेल” दिनू म्हणाला.

थोडं हुडकल्यावर शेजारच्या कपाटात ती पेटी सापडली. तिला दोन्ही बाजूला कॉम्बिनेशन प्रकारची कुलुपं होती. “युरेका! आपली समस्या बहुतेक सुटली आहे पप्पू म्हणाला.  त्यानं पुन्हा एकदा ओळी  वाचल्या, मग कागदावर लिहिलेल्या आकड्यावर नजर टाकली आणि म्हणाला “अर्पून पलाश  पत्रासी  या नंतरची ओळ आहे मंत्रोच्चारण इथेच सरले, याचा अर्थ ४३२४४३ एव्हढीच संख्या आपल्याला घ्यायची आहे.”त्यानं पटकन डाव्या बाजूच्या  कॉम्बिनेशन कुलुपाचे  आकडे फिरवून  ४३२ ही  संख्या आणली  आणि  ते कुलूप उघडलं. तिन्ही भावंडांच्या तोंडून आश्चर्याचे उद्गार बाहेर पडले. मग पप्पूनं  उजव्या बाजूच्या कुलुपाची आकडे ४४३ असे जुळवले आणि तेही कुलूप उघडलं. ब्रीफकेस उघडल्यावर आत चेकबुकं, पासबुकं, महत्वाचे कागद आणि कांही रोख रक्कम अशा सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. तिन्ही भावंडांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि आनंद दिसत होता तर पप्पूच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं.

“अरे पप्पू  तुझे आभार कसे मानावेत हेच समजत नाही. आम्ही गेले आठ दिवस हैराण होतो, काय करावं सुचत नव्हतं. तू आलास आणि  नुसत्या तर्कानं आमचा प्रश्न सोडवलास. खरंच हुशार आहेस हो!” दिनू पप्पूची पाठ थोपटत म्हणाला.  “चला आता पुन्हा  चहा करते सर्वांसाठी” अनु म्हणाली.

ते सगळे चहा घेत असताना बाबा आले. ते घरात येताच दिनू उत्साहानं त्यांना म्हणाला “बाबा, कागदपत्रं      सापडली!”

“हो, नं?! तुम्ही उगीचच माझ्या मागे लागला होता की  मी कुठे ठेवली म्हणून, आता सापडली की नाही तुझ्या जवळंच” बाबा दिनूला उद्देशून म्हणाले.

बाबा  खुर्चीवर बसताच पप्पू समोर आला आणि त्यानं बाबांना वाकून नमस्कार केला आणि विचारलं “ओळखलं का मला?”

“अरे विसरेन कसा, प्रफुल्ल नं तू? कसा आहेस? किती दिवसांनी दिसतो आहेस!” बाबा त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले.

“तसा मी ठीक आहे, पण ओळखलं का विचारलं एव्हढ्यासाठी की आमच्या पिढीची स्मरणशक्ती विश्वास ठेवण्यासारखी राहिली नाही, पप्पू तिघा भावंडांकडं पहात डोळे मिचकावून म्हणाला. या वर सगळे दिलखुलास हसले.

(ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून २०१३ साली म्हणजे, मोबाईल नुकतेच सामान्यांच्या हाती आले होते पण तरीही सर्वांकडे नव्हते आणि ऑनलाईनचा जमाना सुरु झाला नव्हता तेंव्हा लिहिलेली आहे.)

–  सुरेश गोपाळ भागवत (२६/७/२०२५). 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *