कांही दिवसांपूर्वी माझी कामं आटोपून मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (छशिमट) स्थानकावर पोचलो तेंव्हा संध्याकाळचे सात वाजले होते. पनवेलची लोकल फलाटावर उभी होती. गाडी प्रवाशांनी भरली होती आणि तरीही लोक डब्यांमध्ये चढतंच होते, मीही त्यापैकीच एक होतो. डब्यात शिरून आसनांच्या मधल्या मार्गिकेत उभ्या असलेल्या लोकांच्या मधून सरकत सरकत पुढे जात होतो कारण मला लांब पर्यंत जायचे होते. मार्गिकेच्या जवळ जवळ टोकापर्यंत मी पोचलो. माझ्या पुढे एक तरुण आणि एक वयस्कर महिला होती, बहुधा त्या तरुणाची आई असावी. लोकल सुटण्यासाठी अजून एक दोन मिनिटांचा अवधी होता. डब्याच्या आत शिरलेले कुणी उभे कुणी बसलेले, आपापल्या जागी स्थिरावले होते, बहुतेकांनी आपापले मोबाईल सुरु केले होते आणि त्यात ते गुंग झालेले दिसत होते. एव्हढ्यात शेवटच्या आडव्या रांगेतील आसनावर बसलेल्या प्रवाशांपैकी एक जण आसनावरून उठला आणि त्या वयस्कर महिलेला बसायला आपली जागा देऊन, मार्गिकेत उभ्या असलेल्या प्रवाशांमधून मार्ग काढत दरवाज्याकडं निघाला. मला ते जरा विचित्र वाटलं. आपली जागा देऊन स्वतः उभं राहणं ठीक, पण दरवाज्याच्या दिशेनं जाणं याचं मला आश्चर्य वाटत होतं. त्याच्या पुढं असं झालं की ती व्यक्ती डब्यातून खाली उतरली आणि लगेचच लोकल सुरु झाली. मला ते सगळं जरा विचित्र वाटलं. ती व्यक्ती माझ्या जवळून गेल्यानं माझ्या लक्ष्यात इतकंच राहिलं की त्या व्यक्तीनं रुंद उभे पट्टे असलेला बुश शर्ट घातला होता, चेहरा नीट पहिला नव्हता पण पुसटशी प्रतिमा स्मरणात होती.
त्यानंतर कांही दिवसांनी जवळ जवळ तसाच प्रसंग पुन्हा घडला, फरक एव्हढाच की या वेळी एका व्यक्तीनं माझ्यासाठी आपली जागा दिली आणि उठून निघून गेली. मी हातातलं सामान, गाडीतील गर्दी यांच्या विचारात असल्यानं फारसा विचार न करता त्या व्यक्तीचे आभार मानले आणि बसलो. माझ्या वयाकडं बघून मला स्वतःची जागा तरुण प्रवासी देतात याची मला आता सवय झाली होती. मात्र जागेवर स्थिर झालो आणि लोकल सुरु झाली तसे मनात विचार सुरु झाले. मला जागा देऊन निघून गेलेल्या व्यक्तीनंही उभ्या रुंद पट्ट्यांचा बुश शर्ट घातला होता. एकंदरच त्या व्यक्तीला आधी पहिलं असावं असं वाटायला लागलं, पण नक्की कधी, कुठं हे लक्ष्यात येईना. थोड्या वेळानं तो विचार मनातून निघून गेला.
काळ संध्याकाळी छशिमट वरून लोकल पकडली तेंव्हा गाडीला गर्दी तितकीशी नव्हती. मी डब्यात शिरलो, शेवटच्या आडव्या बाकावर एक जागा होती, तिथं मी जाऊन बसलो. मी बसल्यावर बाक पूर्ण भरला. आज मार्गिकेत कुणी ऊभं राहून प्रवास करत नव्हतं, दरवाज्या जवळ नेहमी प्रमाणं कांही तरुण मुलं उभी होती. लोकल सुरु झाली, मी हातातलं सामान सावरत व्यवस्थित बसण्यासाठी थोडा मागं सरकलो आणि दोन्ही बाजूंच्या प्रवाशांकडं, त्यांची कांही हरकत नाही नं हे जाणण्यासाठी दृष्टिक्षेप टाकला. एका बाजूच्या प्रवाश्याकडं पाहून असं वाटलं की या व्यक्तीला कुठं तरी भेटलो आहे. कांही क्षणात मला वाटू लागलं की मला एकदा आपली बसण्याची जागा देणारी व्यक्ती हीच असावी.
“एक्सक्यूज मी, कांही दिवसांपूर्वी तुम्ही मला तुमची बसायची जागा दिली होती का?” मी त्या व्यक्तीला विचारलं. “शक्य आहे” ती व्यक्ती म्हणाली.
“त्याआधीसुद्धा तुम्ही तुमची जागा एका महिलेला दिली होती असं मला वाटतंय” मी म्हणालो.
“तेही शक्य आहे” ती व्यक्ती म्हणाली. त्या व्यक्तीची उत्तरं तोकडी असली तरी त्यात नकारात्मकता नसल्यानं मी संभाषण सुरु ठेवलं “मला स्मरतं त्यानुसार दोन्ही वेळेस तुम्ही गाडीतून उतरून गेला होता, मला त्याचं आश्चर्य वाटलं होतं” मी म्हणालो.
“माझं काम झालं की मी निघून जातो” ती व्यक्ती म्हणाली.
“यात कुठलं काम? मी तर तुम्हाला कांही सांगितलं सुद्धा नव्हतं, तरीही तुम्ही मला जागा दिली होती!” मी म्हणालो.
“कुणी सांगितलेलं काम नाही, ते माझं वैयक्तिक काम असतं” ती व्यक्ती म्हणाली.
“काय काम करता आपण?” मी विचारलं.
“तसा मी सेवा निवृत्त आहे” ती व्यक्ती म्हणाली.
“ओ! तुमच्याकडं बघून वाटत नाही तसं!” मी उद्गारलो.
“ईश्वराची कृपा! बासष्ठ पूर्ण झाली नुकतीच” ती व्यक्ती म्हणाली.
वयाच्या मानानं ती व्यक्ती खूपच सुदृढ आणि तरुण वाटत होती, “कुठं होता नोकरीला? मी विचारलं. “एका सिक्युरिटी एजन्सी मध्ये कामाला होतो, चांगली कंपनी होती. कंपनीच्या मालकांनी खूप चांगलं वागवलं. हा शर्ट त्यांच्याच गणवेशाचा आहे. वयाची साठ वर्षं झाल्यावर मुलगा आणि सून यांनी हट्टानं नोकरी सोडायला लावली” ती व्यक्ती म्हणाली.
“मग आता काय काम करता?” मी विचारलं.
“तीच तर अट घातली आहे घरच्यांनी, म्हणतात आयुष्यभर खूप काम केलंय, आता पगारासाठी नोकरी किंवा काम करायचं नाही, बाकी काय वाट्टेल ते करा” ती व्यक्ती म्हणाली.
“काय करता मग तुम्ही?” मी विचारलं.
“मी फारसा शिकलेला नाही, त्यामुळं लिहिणं-वाचणं याची सवय नाही, मनानं धार्मिकअसलो तरी देव देव करायची सवय नाही” ती व्यक्ती म्हणाली.
“वेळ कसा जातो मग तुमचा? मी विचारलं.
“तो फारसा प्रश्न नाही, मित्र, नातेवाईक खूप आहेत, त्यांना भेटणं, अडीअडचणीला मदत करणं, याला वेळ कमीच पडतो खरं म्हटलं तर!” ती व्यक्ती म्हणाली.
एव्हाना लोकल दोन स्टेशन्स सोडून पुढं आली होती. दर स्टेशनवर डब्यात लोक येतच होते, आता मार्गिकेत सुद्धा उभे राहणाऱ्यांची गर्दी झाली होती. माझ्या शेजारची व्यक्ती माझ्याशी बोलत असली तरी मार्गिकेत उभे असलेल्या लोकांना न्याहाळत होती.
“आता कुठं उतरणार?”, आपल्याला बसायची जागा देणाऱ्या त्या व्यक्तीला स्टेशनवरच निदान एक कप चहा तरी पाजावा असं वाटून मी विचारलं.
“ते अजून ठरलेलं नाही” ती व्यक्ती उत्तरली.
“म्हणजे?” आश्चर्याने मी उद्गारलो.
“संध्याकाळी जेंव्हा मला थोडा वेळ मोकळा मिळतो, त्या वेळात मी लोकलच्या एखाद्या डब्यात या आडव्या बाकावर बसतो. संध्याकाळी गाडीला भयंकर गर्दी असते. त्या वेळेस उभे राहून प्रवास करणाऱ्या एखाद्या गरजू प्रवाश्याला मी माझी जागा देतो आणि उतरून जातो” ती व्यक्ती म्हणाली.
“पण गर्दीत तुम्हाला जागा कशी मिळते?” मी विचारलं.
“मी गाडी फलाटाला लागण्याची वाट बघतो, गाडी लागली की लगेच जागा पकडतो. संध्याकाळच्या वेळेस टर्मिनसकडं येणाऱ्या गाड्या रिकाम्या असतात, टर्मिनसच्या आधी एक दोन स्टेशन्सवर मी गाडी पकडतो, टर्मिनसला पोचल्यावर डब्यात बसून राहतो, गाडी सुरु होताना किंवा पुढच्या स्टेशनला योग्य व्यक्ती दिसली की जागा देऊन टाकतो आणि उतरून जातो. माझ्याकडं लोकलचा पास आहे त्यामुळं कुठेही चढलं- उतरलं तरी चालतं” ती व्यक्ती म्हणाली.
एव्हाना तिसरं स्टेशन जवळ आलं होतं, मार्गिकेत उभ्या असलेल्या एका वयस्कर प्रवाश्याला पुढं येण्याची हातानं खूण करून ती व्यक्ती उठली आणि माझ्याकडं पाहून स्मित करून दरवाज्याच्या दिशेनं सरकू लागली. त्या व्यक्तीच्या पाठमोऱ्या आकृतीकडं मी बघत राहिलो. अंगात असलेला तो उभ्या पट्ट्यांचा बुश शर्ट पाहून मला राम-सेतूच्या बांधकामात जमेल तशी आणि जमेल तितकी मदत करणाऱ्या खारीची आठवण झाली.
-सुरेश गोपाळ भागवत (१३/१२/२०२५).
