भारतातील हरित क्रांती
भारतातील हरित क्रांती ही एक अत्यंत महत्वाची ऐतिहासिक घटना आहे. भारताचा आणि जगाचा इतिहास या घटनेने बदलला. या घटनेच्या वेळेची परिस्थिती थोडक्यात वर्णन करणारी ही एकांकिका आहे. दोन नावे काल्पनिक आहेत बाकीचे शक्य तितक्या अचूकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. २०२४ सालच्या फेब्रुवारीच्या ९ तारखेला भारत सरकारने डॉ. स्वामिनाथन यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारत रत्न बहाल केल्याची घोषणा केली. त्या निमित्ताने ही एकांकिका पुढे आणतो आहे.
स्थळ: पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे ऑफिस.
शास्त्रीजी त्यांच्या खुर्चीवर बसलेले आहेत. टेबलच्या दुसऱ्या बाजूला, समोर सेक्रेटरी श्री. लक्ष्मीकांत झा बसले आहेत, ते समोर वाकून, समोरच्या कागदावरच्या मजकुराच्या बाबतीत शास्त्रीजींना सांगत आहेत.
झा: वॉशिंग्टन मधील आपल्या दूतावासातील लोकांनी बरीच माहिती जमा केली आहे.
शास्त्रीजी: काय माहिती आहे? काय सुरु आहे अमेरिकेत?
झा: सर, अमेरिकेत कांही दिवसांपूर्वी एक पुस्तक प्रसिद्ध झालं आहे, त्यात जगातील अन्न उपलब्धते बाबत फारच नकारात्मक लिहिलं आहे.
शास्त्रीजी: कोण आहे लेखक या नव्या पुस्तकाचा?
झा: सर, विल्यम आणि पॉल पॅडॉक नावाचे दोन भाऊ आहेत.
शास्त्रीजी: त्यांनी म्हटलंय त्यात नवं असं कांही नाही, अनेक लोकांनी अशी विधानं केली आहेत या आधी.
झा: सर, काळजीची बाब अशी आहे की, आपल्या सूत्रांच्या माहिती नुसार ते आणखी एक पुस्तक लिहीत आहेत आणि त्या संदर्भात बोलताना त्यांनी भारताच्या संदर्भात अत्यंत घातक अशी विधान केली आहेत. त्यांच्या मतानुसार “भारतात कांही मदत पाठवणं म्हणजे समुद्रात मूठभर वाळू टाकण्यासारखं आहे. मदत वाया घालवण्या पेक्षा, त्या देशाच्या नशिबात जे लिहिलं आहे ते होण्याची दुरून वाट बघणं जास्त योग्य होईल”.
शास्त्रीजी: हंsss! आणखी काय माहिती आहे?
झा: सर, आणखी एक अमेरिकन प्रोफेसर भारताच्या परिस्थितीबाबतीत अतिशय नकारात्मक विचार मांडत आहेत, पॉल एरलीच असं त्यांचं नाव आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की भारतात पुरेसं अन्न धान्य उत्पादन होईल असं म्हणणारा कोणीही त्यांना भेटला नाही. त्यांचं भाकीत असं आहे की अन्न टंचाई मुळं असंख्य भूक बळी पडणार आहेत, सर्वत्र यादवी माजणार आहे, या देशाचं विघटन होणार आहे, किंबहुना त्या क्रियेची सुरवात झालेली आहे. सर, या अशा कल्पनांचा फैलाव झाला तर, आपल्याला अमेरिकेतून जे धान्य आयात करायचं असत त्यावर अतिशय प्रतिकूल परिणाम होईल, आणि अमेरिकेनं आपल्या देशाला होणाऱ्या धान्याच्या निर्यातीत नुसती थोडी कपात जरी केली तरी भीषण परिस्थिती ओढवेल.
शास्त्रीजी: हे रिपोर्ट्स काळजी वाटण्यासारखे म्हणण्यापेक्षा चीड आणणारे आहेत असं म्हणायला पाहिजे. आपली परिस्थिती अवघड असली तरी बाकीच्या देशांनी गिधाडाची भूमिका घ्यावी अशी नक्कीच नाही. पाश्चात्यांना भारत भूमीचा शोध लागला, पण भारताच्या आत्म्याचा शोध त्यांना अजून लागायचा आहे. त्यांना तो शोध लागेल, ती वेळ अजून यायची आहे, पण लवकरच येईल याची मला खात्री आहे.
झा: एक आशेचा किरण दिसतो आहे तो म्हणजे लेस्टर ब्राऊन नावाचे पर्यावरणवादी. असं समजलं आहे की त्यांनी अमेरिकन राष्ट्राध्यक्षाना या नकारात्मक जाहिरातबाजीकडं लक्ष न देता भारताला होणारी निर्यात सुरूच ठेवावी असा आग्रह केला आहे.
शास्त्रीजी: (सेक्रेटरीला उद्देशून) ठीक आहे, आता तुम्ही गेलात तरी चालेल.
(सेक्रेटरी ऑफिसच्या बाहेर जातात)
शास्त्रीजी: (वैयक्तिक सचिव रमण कडे पाहून), रमण, आजच्या चर्चा बैठकीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे नं ?
रमण: हो सर, सर्वांना त्यांच्या वेळेची माहिती देण्यात आली आहे, कागद पत्रांचे डोसीयर तयार आहे. सर, बैठकी सुरु होण्याआधी तुमच्यासाठी कांही अल्पोपहार आणू का?
शास्त्रीजी: नको, डोसियर तयार असेल तर दे, त्यावर एक नजर टाकतो.
(रमण कागद पत्रांचे डोसीयर टेबल वर ठेवतो, शास्त्रीजी कागद चाळू लागतात.)
(ऑफिसच्या दारात शिपाई रामसिंग येऊन उभा राहतो, शास्त्रीजी वरती बघून नजरेनंच विचारतात)
रामसिंग: सर, मंत्री साहेब आले आहेत.
शास्त्रीजी: त्यांना आत यायला सांग.
(अन्न आणि शेती खात्याचे मंत्री सी. सुब्रमण्यम आत येतात, हातात कागद पत्रांची फाईल आहे.)
सुब्रमण्यम: नमस्कार सर!
शास्त्रीजी: नमस्कार सीएस, या, बसा.
सुब्रमण्यम : काय योगायोग आहे, मी तुमची भेट घेण्याची तयारी करत होतो तेवढयात तुमचा निरोप आला. आधी तुम्ही कशासाठी बोलावलं आहे त्याची चर्चा करू या.
शास्त्रीजी: मामला जरा गंभीर आहे, गृह खात्याचे मंत्री गुलझारीलाल नंदा आणि माझी बैठक झाली, त्यांच्या कडून आलेली माहिती काळजाला घरं पाडणारी आहे. लागोपाठ दोन वर्षं दुष्काळ पडल्यानं लोकांची परिस्थिती फार वाईट झाली आहे. सरकारमान्य स्वस्त धान्याच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागत आहेत. लोकांना हातातलं काम सोडून तासन तास रांगेत उभं राहावं लागत आहे आणि तेव्हढं करून पदरी काय पडतं आहे तर परदेशातून आयात केलेला तांबडा गहू, मका आणि ज्वारी. गृहमंत्र्यांच्या म्हणण्या नुसार लोक फारच हैराण झाले आहेत.
सुब्रमण्यम : नंदाजींची आणि माझी देखील चर्चा झाली. सध्या परिस्थिती अशी आहे की एकामागून एक बोटी परदेशातून धान्य घेऊन बंदरात दाखल होत आहेत, पण आपली अन्नाची गरज एवढी मोठी आहे की ते अपुरं पडतं आहे.
शास्त्रीजी: कांही वेळेला मनात असा विचार येतो की माझे अगणित देश बांधव अर्धपोटी असताना मी रोज दोन वेळा का जेवावं?
सुब्रमण्यम: तुम्हाला इतकं काम करायचं असेल तर निदान दोन वेळेचं जेवण तर हवंच, पण एखाद्या वेळेला उपास करणार असाल तर मी ही तुमच्याबरोबर उपास करायला तयार आहे.
शास्त्रीजी: काय अवस्था झाली आहे आपल्या देशाची! एकेकाळी सुवर्ण भूमी म्हणून ओळखला जाणारा आपला देश आज या अवस्थेला येऊन ठेपला आहे, मुलांना दूध मिळत नाही, लोकांना पोटभर अन्न मिळत नाही. हे बदलायला हवं, आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. प्रत्येक दिवसाचा एकेक क्षण आणि शरीराची सारी शक्ती पणाला लावली पाहिजे. भारतीयांनी पूर्वी महान पराक्रम गाजवले आहेत, आता पुन्हा वेळ आली आहे तसे चमत्कार घडविण्याची! आपले जवान सीमेवर लढत आहेत, शेतकरी दुष्काळी परिस्थितीशी झुंजत जमीन कसण्याचा प्रयत्न करत आहेत, आता वेळ आहे वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांच्या करामतीची. जुने सर्व मार्ग आता बंद झाले आहेत, आता गरज आहे नवे पर्याय, नवे मार्ग शोधण्याची. मला वाटतं की वैज्ञानिकांनी आणि तंत्रज्ञांनी सर्वस्व पणाला लावलं तर यातून मार्ग निघू शकेल. तुम्हाला आज बोलावण्याचा उद्देश हाच आहे की आपल्याकडे असलेली सर्व वैज्ञानिक सेना आणि सामग्री या युद्धात उतरवा आणि या संकटाचा मुकाबला करा.
सुब्रमण्यम : मला वाटतं, या भूमीची पुण्याई फार मोठी आहे. मानव जातीच्या उद्धारासाठी इथं अवतार झाले, ऋषी, मुनी, तत्त्ववेत्ते झाले आणि आता फक्त आपल्यावरच नव्हे तर अनेक विकासनशील देशांवर आलेलं भुकेचं हे संकट निवारण्याचं काम देखील या भूमीवरूनच होणार आहे.
शास्त्रीजी: मला या पदाचा स्वीकार करून आता जवळ जवळ वर्ष होत आलं आहे. आपण प्रयत्न तर करतो आहोत पण आपल्याला सतत सतर्क राहायला हवं. तुम्ही सुरु केलेल्या कृषी मोहिमेचा मला आढावा घ्यायचा आहे, जसे आपण आपल्या जवानांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न करतो आहोत, तसेच आपली किसानांचेही हात बळकट केले पाहिजेत.
सुब्रमण्यम: काय योगायोग आहे पहा, नेमकं याच कारणासाठी मी आज तुमची भेट घ्यायचं ठरवलं होतं. आपण गेली तीन चार वर्षे ज्या गोष्टींसाठी आटापिटा करत होतो त्यातली कांही संशोधनं सफल होताना दिसत आहेत. आता वेळ आली आहे त्या संशोधनांना शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याची. त्यासाठी अफाट मेहनत करावी लागणार आहे, लक्षावधी शेतकऱ्यांना या नव्या कल्पना समजावून सांगाव्या लागणार आहेत, त्यातले कांही सुशिक्षित असणार आहेत तर कांही शेतकरी अशिक्षित आणि निरक्षर असणार आहेत. दुष्काळामुळं क्षीण झालेल्या त्यांच्या हाताना बळ येण्यासाठी सामग्री उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. आतापर्यंत या देशात कधीही झाली नाही एवढी मोठी मोहीम आपल्याला हाती घ्यावी लागणार आहे. त्यामधे मला तुमचा पूर्ण पाठिंबा हवा आहे. त्या मागची वैज्ञानिक पूर्वपीठिका आपल्याला माहित करून देण्यासाठी या संशोधनाचे सूत्रधार असलेल्या डॉ. स्वामिनाथन यांना मी आज इथं बोलावण्याचं योजलं होतं, त्याला तुमची परवानगी आहे नं?
शास्त्रीजी: हो, निश्चितच आहे, त्या संशोधनाबाबत सगळी माहिती मिळाली तरच मलाही योग्य निर्णय घेता येतील.
(रामसिंग शिपाई आत येतो आणि डॉ. स्वामिनाथन आले असल्याचं सांगतो, शास्त्रीजी त्यांना आत घेऊन येण्यास सांगतात. डॉ. स्वामिनाथन आत येतात, दोघांनाही अभिवादन करतात.)
शास्त्रीजी: या डॉ. स्वामिनाथन! मला असं वाटतं आपण तिथं सोफ्यावर बसून बोलू या.
(स्वतः उठून दोघांना सोफ्या कडं घेऊन जातात.)
सुब्रमण्यम: सर, डॉ. स्वामिनाथन हे या विषयातले तज्ज्ञ आहेत आणि अगदी सुरवातीपासून त्यांनी या मोहिमेवर काम केलं आहे, त्यामुळे या मोहिमेतील सर्व तांत्रिक मुद्दयांवर आपण त्यांच्या कडून माहिती घेऊ शकतो.
शास्त्रीजी: मी या विषयातला तज्ज्ञ नसल्यामुळं माझ्या मनात बरेच प्रश्न आहेत, कांही शंका आहेत त्यांचं निराकरण करणं गरजेचं आहे. परंतु आपण असं करु या की प्रथम डॉ स्वामिनाथन यांना थोडा वेळ त्यांना असलेली माहिती सांगण्यासाठी देऊ या. डॉ. स्वामिनाथन अगदी प्रथमपासून पण थोडक्यात या विषयीची माहिती द्या.
स्वामिनाथन: सर, मी संशोधनासाठी अमेरिकेत वास्तव्याला असताना आपल्या देशातील अन्न धान्य परिस्थिती वर नजर ठेऊन होतो आणि आपल्या समस्येला कुठं उत्तर सापडतेय का हे पाहण्यासाठी जगातील अनेक देशात सुरु असलेल्या संशोधनाचा मी मागोवा घेत होतो. त्या दरम्यान माझी डॉ. नॉर्मन बोरलॉग यांच्याशी गाठ पडली.
शास्त्रीजी: ते अमेरिकन आहेत का?
स्वामिनाथन: नाही सर, माझी आणि त्यांची गाठ अमेरिकेत पडली असली तरी ते मेक्सिको देशातील गव्हाचे आनुवंश शास्त्रज्ञ आणि पैदासकार आहेत, म्हणजे गव्हाच्या झाडाचे गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीत कसे जातात याचा अभ्यास आणि त्या अभ्यासाचा गव्हाचे नवे वाण निर्माण करण्यासाठी उपयोग या विषयाचे ते तज्ज्ञ आहेत. माझं कार्यक्षेत्रही तेच असल्याने आमची खूप चांगली चर्चा झाली. त्यांचा अनुभव आणि ज्ञान हे तर बेजोड आहेतच परंतु मला सर्वात महत्वाचा वाटला त्यांचा मानवतावादी दृष्टिकोन. अन्नाचा तुटवडा हे जगातले सर्वात वाईट संकट आहे आणि भूक निवारण ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे असं त्यांचं ठाम मत आहे.
शास्त्रीजी: ही अतिशय चांगली गोष्ट आहे, ते आपल्या देशात आले होते का कधी?
स्वामिनाथन: हो सर, १९६३ साली ते आपल्या इथे येऊन गेले, त्या वेळी त्यांनी अगदी निक्षून सांगितले की चर्चा करण्यात वेळ घालवू नका, ताबडतोप कामाला सुरवात करा. त्यांना खात्री आहे की त्यांनी विकसित केलेल्या गव्हाच्या प्रकाराचा आपल्या देशात चांगला उपयोग होऊ शकतो.
शास्त्रीजी: असं काय वेगळं आहे आपल्याकडं वापरात असलेल्या आणि त्यांनी विकसित केलेल्या गव्हाच्या प्रकारात?
सुब्रमण्यम : सर, वेगळा गव्हाचा प्रकार हा या नव्यानं होत असलेल्या बदलाचा एक भाग आहे, त्याबरोबर शेतीचं सगळं तंत्रच बदलावं लागणार आहे.
शास्त्रीजी: आपल्या देशात बहुतांश शेतकरी अल्प भू धारक, अशिक्षित आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बळ आहेत याचं भान आहे नं तुम्हाला?
सुब्रमण्यम: अगदी याच कारणासाठी मी तुम्हाला सुरवातीलाच म्हटलं की या मोहिमेत मला तुमचा पूर्ण पाठिंबा हवा आहे. आपली मोहीम ही केवळ एक मोहीम नसून ती एक क्रांती असणार आहे. नेते सक्षम असतील आणि जनतेचं सहकार्य मिळालं तरच कोणतीही क्रांती यशस्वी होते. काम अवघड आहे, पण आपल्याला पर्याय कुठे आहे? भुकेच्या वणव्यात होरपळण्यापेक्षा तळपतं ऊन अंगावर घेत मेहनत केली तर प्राण वाचणार आहेत, देश वाचणार आहे.
शास्त्रीजी: खरं आहे तुम्ही म्हणताय ते, पण प्रथम आपण तांत्रिक बाजू समजून घेऊ या. डॉ स्वामिनाथन, गेली चार हजार वर्षे आपले शेतकरी जो गहू पिकवत आहेत तो नक्की कुठं कमी पडतो आहे? आणि या नव्या प्रकारांचा असा कोणता गुण आहे की ज्यामुळं ती कमतरता भरून निघू शकते?
स्वामिनाथन: सर पिकाला आवश्यक असणाऱ्या तीन गोष्टी म्हणजे योग्य हवामान, सुपीक जमीन आणि पाणी. या त्रिकोणाशी एखाद्या पिकाच्या वाणाचं सूत जमलेलं असतं. यांच्या साधारण परिस्थितीत सरासरी उत्पादन किती होऊ शकतं आणि उत्तम परिस्थितीत जास्तीत जास्त उत्पादन किती होऊ शकतं हे ठरलेलं असतं. आपल्याकडचे पारंपरिक वाण हे माफक सुपीकता आणि पाण्याचा वापर या परिस्थितीला योग्य असे आहेत.
शास्त्रीजी: म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का, की जास्त सुपीकता आणि पाणी हे आपल्या पारंपरिक गव्हाच्या वाणांसाठी अयोग्य आहेत?
स्वामिनाथन: अगदी बरोबर, मी परदेशातून परतल्यावर याच विषयावर प्रयोग केले की उत्पादन वाढविण्यासाठी आपण जास्तीत जास्त किती खत आणि पाणी वापरू शकतो. माझ्या असं लक्ष्यात आलं की जास्त खत आणि पाणी दिल्यास आपले पारंपरिक वाण उंचीनं वाढतात आणि मग त्यांच्या शेंड्याला जेव्हा लोम्ब्या लागतात त्यावेळी लोम्ब्यांचे वजन न पेलल्यामुळं झाडं वाकतात किंवा जमिनीवर लोळतात आणि पिकाची नासाडी होते.
सुब्रमण्यम : म्हणजे खत कमी घालावं तर उत्पादन कमी आणि जास्त घातलं तर पिकाची नासाडी अशी अडचणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. जेंव्हा लोकसंख्या कमी होती तेंव्हा येईल तेव्हढ्या उद्पादनावर गरज भागत होती, परंतु आता आपली लोकसंख्या साधारण ५० कोटी इतकी आहे आणि दरवर्षी त्यात सुमारे एक कोटी लोकांची भर पडते आहे, अन्न धान्याचं उत्पादन वाढविण्या खेरीज पर्यायच नाही.
शास्त्रीजी: आपल्याकडं इतकं खत आणि पाणी आहे तरी कुठं? आणि ते उपलब्ध झालं तरी ते वापरण्याच्या आर्थिक परिस्थितीत आपले छोटे शेतकरी आहेत का?
सुब्रमण्यम : दोन्ही प्रश्नांची उत्तरं आज तरी नकारात्मकच आहेत. आपल्याला रासायनिक खतांच्या उत्पादनात वाढ करावी लागेल. सरकारी यंत्रणेचा कामाचा वेग आणि सरकारी भांडवल पुरेसं पडणार नाही. आपल्याला खाजगी उद्योगांना कारखाने काढण्यासाठी प्रोत्साहन द्यावं लागेल आणि सरकारी पैश्याचा वापर करून खताच्या आणि इतर कृषी रसायनांच्या किंमतींवर सबसिडी द्यावी लागेल. या योजना कशा आखायच्या यावर मी काम करतो आहे. तुम्ही म्हणाल तेंव्हा त्या कामाचा आढावा घेऊ.
शास्त्रीजी: आपण ते करू शकतो परंतु मला असं वाटतं की शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालासाठी सरकारनं एक हमी भाव ठरवला पाहिजे. माझे सचिव श्री. झा यांच्या नेतृत्वाखाली आपण एक समिती स्थापन करू या. ही समिती तुमच्या खात्यात काम करेल आणि कोणत्या पिकासाठी किती भाव देता येणं शक्य आहे याचा अभ्यास करून आपल्याला अहवाल देईल.
सुब्रमण्यम: मला हे योग्य वाटतं आहे परंतु, मंत्रिमंडळाचा आपल्याला पाठिंबा मिळेल का ?
शास्त्रीजी: तुम्हाला काय म्हणायचं आहे ते मी ओळखलंय, आपले अर्थमंत्री याला तयार होणार नाहीत असं तुम्हाला वाटतंय? त्याची काळजी करू नका, भाव हमी देण्यासाठी मी कोणाचाही विरोध चालू देणार नाही. माझी चिंता वेगळीचं आहे धोरण ठरवणं आपल्या हातात आहे, परंतु निसर्ग आपल्या हातात नाही. डॉ. स्वामिनाथन, मला हे सांगा की आपल्या इथल्या वाणांच्या अंगी जास्त खत आणि पाणी वापरण्याचा गुण नाही तर मग डॉक्टर बोरलॉग यांच्या नव्या वाणांत तो कसा आला? आपल्या परिस्थितीत तो टिकून राहणार का नाही हे ही आपल्याला बघावं लागेल नाही का?
स्वामिनाथन: हो सर, प्रथम मी त्यातला तांत्रिक भाग आपल्याला सांगतो म्हणजे पुढचा खुलासा आपोआप होईल. डॉ. बोरलॉग यांनी अमेरिकेतील शास्त्रज्ञांकडं असे गव्हाचे प्रकार पहिले की ज्यांची उंची कमी असते. मुख्य म्हणजे कमी उंची हे झाड कमजोर असल्याचं लक्षण नसून तो त्यांचा नैसर्गिक आणि आनुवंशिक गुणधर्मच आहे. त्या झाडांना भरपूर फुटवे असतात, लोम्ब्या भरपूर आणि लांब असतात, फक्त त्यांच्या खोडाची उंची मात्र कमी असते आणि खोड पुरेसं कणखर असतं.
शास्त्रीजी: केवळ उंची कमी असल्यानं उत्पादनात वाढ होणार आहे का?
स्वामिनाथन: नाही, या वाणांचा खरा फायदा दिसून येतो तो वाढीव खत-पाणी दिल्या नंतर. आमच्या प्रयोगांमध्ये असं दिसून आलं की जसजसं खात पाणी जास्त मिळालं तसं तशी झाडं जास्त जोमदार झाली, फुटवे जास्त फुटले, लोम्ब्या मोठ्या झाल्या, दाणे जास्त भरले पण झाडांची उंची फारशी वाढली नाही आणि झाडं कापणी पर्यंत ताठ उभीच होती. झाडाच्या उंचीचा आणि उत्पादनाचा संबंध नाही असं या वाणांच्या बाबतीत आहे. हे अजून सर्व शास्त्रज्ञांना देखील पटलेलं नाही, परंतु हे मी स्वतः प्रयोग करून पडताळलं आहे, आणि डॉ. बोरलॉग गेली जवळ जवळ दहा वर्षं हे लोकांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत.
शास्त्रीजी: माणसांच्या बाबतीत उंचीचा आणि कार्यक्षमतेचा संबंध नाही हे मला चांगलं ठाऊक आहे (किंचित हसतात), त्यामुळं तसं गव्हाच्या बाबतीत होऊ शकतं यावर विश्वास ठेवण्याची माझी तयारी आहे.
स्वामिनाथन: हे प्रकार डॉ. बोरलॉग यांनी मेक्सिकोमध्ये नेऊन त्यापासून कांही वाण विकसित केले. मी त्यांना त्यातल्या कांही वाणांचं बियाणं पाठविण्याची विनंती केली होती, त्यांनी ते पाठवलं. त्याच्या चाचण्या मी गेली दोन वर्षं घेतो आहे. आपल्याकडच्या हवामानात देखील या वाणांची वाढ उत्तम झाली, वाढीव पाणी आणि खताच्या मात्रेला प्रतिसाद उत्तम मिळाला आणि भरघोस उत्पादन मिळालं. यंदाच्या चाचण्या फक्त प्रयोगाच्या स्वरूपात नसून, त्यात शेतकरी देखील सामील झालेले आहेत.
सुब्रमण्यम : यंदाच्या हिवाळ्याच्या दिवसात म्हणजे रब्बी मोसमातलं गव्हाचं पीक शेतात उभं असताना मी त्या शेतांना भेट देण्यासाठी गेलो होतो, तिथं मी जे कांही पहिलं ते डोळ्यावर विश्वास न बसावा असं दृश्य होतं. साधारण कंबरेइतक्या उंचीचा, गर्द हिरव्या रंगाचा गालिचा पसरावा असं ते शेत दिसत होतं, फुटव्यांची दाटी इतकी की इंचभर जमीन देखील दिसत नव्हती. लोम्ब्या इतक्या लागलेल्या होत्या की जणू त्यांचा एक थरच हिरव्या गालिच्यावर दिला आहे. असं दृश्य मी आयुष्यात प्रथमच पहिलं. ज्या शेतकऱ्याच्या शेतावर हे पीक लावलं होतं त्याला तर फक्त हर्षवायू व्हायचा बाकी होता. जिथं जिथं हे बियाणं पेरलं गेलं त्या सर्व ठिकाणांहून थोड्या फार फरकानं असेच रिपोर्ट्स आले आहेत.
शास्त्रीजी: डॉक्टर स्वामिनाथन, आपले गृहमंत्री सांगत होते की, जनतेमध्ये या अमेरिकन गहू आणि मका खाण्याच्या बाबतीत नाराजी आहे, लोकांना इलाज नाही म्हणून ते खात आहेत. हे नवे मेक्सिकन वाण असे लाल रंगाचेच असणार का? आपली जनता त्याचा स्वीकार करणार का?
स्वामिनाथन: हा मुद्दा सध्या कळीचा मुद्दा आहे. डॉक्टर बोरलॉग यांनी विकसित केलेल्या गव्हाच्या वाणांच्या दाण्यांचा रंग लाल आहे, कारण त्यांच्याकडं ती गरज आहे. ते बियाणं इथं लावल्यावर त्याला येतील ते दाणे लाल रंगाचेच असणार, परंतु त्या बाबतीत आम्ही सुरु केलेल्या प्रयोगांना देखील यश मिळतं आहे. आपण एक दोन वर्षांमधेच असे वाण विकसित करू की जे आपल्याला हवे तसे सोनेरी दाणे देतील पण त्यांच्या अंगी बोरलॉग यांच्या वाणांचे चांगले गुणधर्मही असतील. ही दोन-तीन वर्षंच अशी असतील की जेंव्हा आपल्याला लाल गहू वापरावा लागेल.
सुब्रमण्यम: सर, यासाठी आम्ही अत्यंत कसोशीनं आणि वेगळे प्रयत्न करतो आहोत. शेतकरी, व्यापारी त्यांना प्रायोगिक गव्हाचे नमुने दाखवतो आहोत, त्याचा परिणाम देखील चांगला दिसतो आहे. शेतकरी आणि व्यापारी यांच्यात एक नवा आशावाद निर्माण होतो आहे. आपल्या पसंतीच्या नव्या वाणांची निर्मिती झालेली बघण्यास ते उत्सुक आहेत पण त्याच बरोबर त्यासाठी थोडा वेळ लागणार आहे याची त्यांना जाणीव आहे.
शास्त्रीजींचा वैयक्तिक सचिव आत येऊन शास्त्रीजींच्या कानात कांही कुजबुजतो. ते त्याला मानेनं होकार देतात, सोफ्यावरून उठतात आणि जाऊन खुर्चीत बसतात. संरक्षणमंत्री आणि सैनिकी गणवेशातील एक व्यक्ती आत येतात. शास्त्रीजींकडे कांही कागद देतात, ते कांही कुजबुजतात आणि निघून जातात. शास्त्रीजी परत येऊन सोफ्यावर बसतात. त्यांचा चेहरा थोडा गंभीर झालेला आहे. कांही सेकंद कोणीच कांही बोलत नाही.
सुब्रमण्यम: तुमचा चेहरा गंभीर दिसतो आहे, कांही अप्रिय बातमी तर नाही नं?
(शास्त्रीजी सोफ्यावरून उठतात, हात मागे बांधून येरझाऱ्या घालतात)
शास्त्रीजी: तुम्हाला माहिती आहे की आपला शेजारी देश गेला कांही काळ फारच वल्गना करत आहे, आता त्यानं कुरापती काढायला सुरवात केली आहे. आपल्या सीमेला लागून असलेल्या अनेक ठिकाणी सैनिकी हल्ले, बंदुकीच्या फैरी झाडणं, तोफ गोळे डागणं हे प्रकार गेले कांही दिवस सतत सुरु आहेत. आपल्या देशात दुष्काळ पडल्यामुळं अन्न धान्याची टंचाई आहे, देशाची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे याचा आपलं शेजारी राष्ट्र गैरफायदा घेतं आहे. आधीच अर्धपोटी राहणाऱ्या माझ्या देशबांधवांना युद्धाला सामोरं जाण्याचं सांगायला माझं मन तयार होत नाही. आपल्या देशावर दुष्काळ, अन्न टंचाईचं संकट नसत तर आपण त्यांना चांगला धडा शिकवू शकलो असतो, पण सध्या तरी आपल्याला गप्प राहण्याखेरीज गत्यंतर नाही.
(सुब्रमण्यम आणि स्वामिनाथन एकमेकांकडे बघतात)
सुब्रमण्यम : सर, ती म्हण आहे न इंग्रजी मधे की प्रत्येक काळ्या ढगाला चंदेरी किनार असते म्हणून, मला वाटतं आपल्या देशावर आलेल्या साऱ्या काळ्या ढगांची चंदेरी किनार लवकरच दिसू लागणार आहे.
शास्त्रीजी: तुम्ही म्हणता तसं खरंच होईल अशी मी ही आशा करतो, पण तुम्हाला तसं वाटण्याचे कारण?
सुब्रमण्यम : सर, स्वामिनाथन आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं प्रचंड मेहनत केली आहे आणि त्यांचे प्रयत्न सफल होतील अशी लक्षणं दिसत आहेत.
(पंतप्रधान कार्यालयाच्या दारावरची शिपाई रामसिंग आत येतो, पंतप्रधानांच्या जवळ जाऊन त्यांना सांगतो की कृषिमंत्र्यांच्या कार्यालयातून त्यांना भेटण्यासाठी एक व्यक्ती आली आहे, त्या व्यक्तीचे कार्ड दाखवतो. शास्त्रीजी ते स्वामिनाथन यांच्याकडे देतात. स्वामी पंतप्रधानांना उद्देशून)
स्वामिनाथन: सर, मला वाटतं, आपण ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होतो तो क्षण जवळ आलेला आहे, तुमची परवानगी असेल तर डॉ. राव यांना आत बोलावू का?
शास्त्रीजी: जरूर बोलवा.
रामसिंग बाहेर जातो आणि डॉ. राव यांना घेऊन येतो, त्याच्या हातात एक फाईल आहे ती फाईल उघडून स्वामीनाथन यांच्याकडे देतात. स्वामिनाथन उभे राहून ती हातात घेतात, डॉ. राव हळू आवाजात त्यांना कांही सांगतात आणि बोटानं कागदावरच्या मजकुराकडे निर्देश करतात.
स्वामिनाथन यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकते, वरती बघून सुब्रमण्यम, शास्त्रीजींना उद्देशून
स्वामिनाथन: सर, बातमी अतिशय चांगली आहे, सर्व ठिकाणचे अहवाल एकच गोष्ट दाखवत आहेत की या वर्षीचं उत्पादन गेल्या वर्षी पेक्षा जास्त असणार आहे, इतकंच नव्हे तर सुरवातीचे अंदाज असे आहेत की पूर्वीचा उच्चांक यंदा मोडला जाणार आहे (फाईल सुब्रमण्यम कडे देतात).
सुब्रमण्यम: (कागदावर एक नजर टाकून शास्त्रीजींकडे देतात) एकंदरीत आतापर्यंत घेतलेले सर्व निर्णय आता योग्य ठरत आहेत. सर, आता मी तुम्हाला ही ग्वाही देऊ शकतो की वायव्य सीमेवरील कुरापतींना चोख उत्तर देताना आपल्याला अन्न धान्याची निर्यात करणाऱ्या देशांकडून होणाऱ्या आंतर राष्ट्रीय दबावाची तुम्हाला काळजी करावी लागणार नाही.
शास्त्रीजी: आता असं वाटतंय की आपल्या जनतेला मिळालेला अर्धपोटी राहण्याचा शाप आता संपणार आहे. आज पर्यंत जगानं अनेक क्रांत्या पहिल्या, त्यातल्या बहुतेक क्रांतिकारक हुतात्म्यांच्या रक्ताच्या रंगानं रंगलेल्या होत्या. आता विश्व् प्रथमच अशी क्रांती बघणार आहे की जी लोकांचे प्राण वाचविण्यासाठी असेल, शांततेच्या विजयासाठी असेल, शेतकऱ्यांच्या आणि कामकऱ्यांचा घामानं सुगंधित झालेली असेल आणि शेतावर डोलणाऱ्या पिकांच्या हिरव्या गार रंगानं रंगलेली असेल. माझा सीमेवरचा जवान आता जास्त त्वेषानं लढेल, कारण त्याला माहिती असेल की त्याचा किसान बंधु त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपली मान अभिमानानं उंचावण्याची आणि आपला राष्ट्रध्वज उंच उंच फडकविण्याची वेळ आता आली आहे.
(उठून दोघांच्या मधे उभे रहातात आणि दोघांच्या खांद्यावर हात ठेवतात.)
तुम्ही दोघांनी यासाठी जे असामान्य काम केलं आहे त्यासाठी आपला देश तुम्हाला कायम धन्यवाद देत राहील. तुम्हा दोघांचेही मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.
समाप्त.