जागेचं महत्व

आयुष्यात अक्षांश-रेखांशाचं महत्व

आता जास्त जाणवू  लागलंय

योग्य जागेवर असणारे म्हणजे

भाग्यवान असं वाटू लागलंय   II१II

तिकडे रॉकेट्सचा पाऊस पडतोय

जमीन भिजतेय रक्तानं

रडणाऱ्यांचे आक्रोश थांबतायत

उगी राहिल्यानं नाही, तर जीव गेल्यानं II२II

इकडे पाऊस पडतोय धावांचा

खेळाडू भिजताहेत घामानं

लाखभर प्रेक्षक करताहेत गर्जना

स्टेडियम भारलंय  चैतन्यानं   II३II

तिकडं खेडी ओस पडली आहेत

गोळीबाराच्या भीतीनं

तरुण मुलं होताहेत अपंग

राज्यकर्त्यांच्या हट्टानं  II४II

इकडं तरुण चालून गेले

आंतर राष्ट्रीय खेळांसाठी

गोळ्या झाडल्या, भाले फेकले

पण ते पदकं मिळवण्यासाठी   II५II

तिकडे लोक रस्त्यावर उतरतायत

निषेध व्यक्त करण्यासाठी

इथं लोक मिरवणुकी काढतायत

लाडक्या दैवतांच्या सन्मानासाठी  II६II

तिकडं घरदार उध्वस्त झाल्यानं

मुलं देशोधडीला लागतायत

इकडं हातात टिपऱ्या घेऊन

मुलं दांडिया खेळतायत   II७II

माणसं तशीच, रक्त तसंच

डीएनए देखील त्यांचा तसाच आहे

काय कारण असावं  की इकडं  शांती

आणि तिकडं वणवा पेटला आहे?  II८II

पाणी तेच माती तशीच

पण फरक का ? हे कोडं आहे

अक्षांश -रेखांश वेगळे आहेत

एवढाच फरक समजला आहे  II९II

पेराल तसं उगवेल म्हणतात

तिकडं संघर्षाचं पीक आलं आहे

इथं शांतीची बीजं रुजवली गेली

हे आपलं भाग्य  आहे   II १०II

                           २०/१०/२०२३ एकीकडे  रशिया -युक्रेन युद्ध सुरु असतानाच, ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमास -इस्राएल युद्ध सुरु झाले. दोन्ही ठिकाणी सैनिकी आणि नागरी जीव हानीच्या क्लेशदायक बातम्या येत आहेत. आपल्याकडे नुकताच गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा झाला आणि नवरात्राचा उत्सव जोरात सुरु आहे.  सप्टेंबर-ऑक्टोबर २०२३ मध्ये भारत आणि इतर अनेक देशांमधील तरुण-तरुणींनी  एशियाड खेळांमध्ये भाग  घेतला तर युक्रेन, रशिया, गाझा  पट्टी आणि इस्राएल या ठिकाणच्या तरुण-तरुणींच्या वाट्याला रक्तपात आला.

Similar Posts

  • नववर्ष २०२४

    क्षितीजाच्या रेषेखाली गडद केशरी सूर्य बुडाला कालौघाच्या तीरावरचा एक बावटा मागे पडला निर्गुण, निरव, निरंतर काळाचा हा प्रवाह वाहे उगम कुठे अन कुठे चालला हे ही कुणाला नच ठावे सरितेसम तो प्रवाह वाहे अमूर्त जल,…

  • पुढे कसे जाणार ?

    पुढे कसे जाणार ? काळ पुढे जातो, वय पुढे जाते आपणही तेच करायचे आहे भूतकाळात न अडकता प्रगतीच्या वाटेने जायचे आहे II१II डोळे समोर आहेत त्यातून धडा घ्यायचा आहे जमेल त्या मार्गाने पुढे काय याचा...
  • बळ अंगी येऊ दे

    प्रत्यक्ष दीस म्हणू कसा तुला माझ्या सीमांची जाणीव आिे मला। डोळे दिपवतो सूर्य माझे सहन होईल कसे तेज तुझे॥ १॥ अति अरुंद माझी नजर विराट तू डोळ्यांत कसा मावणार। दृष्टी माझी अपुरी पाहायला अणूरेणू सूक्ष्माहून...
  • नववर्ष २०२१

    नववर्ष २०२१ नवं वर्ष येतं आहे त्याशी नातं जोडा काय होणार, कसं होणार याची काळजी सोडा II१II कोविड साथ शमते आहे मेंदूचा लॉकडाउन काढा हे नाही, ते नाही वाचू नका पाढा II२II नको वांगी पुराणातली...
  • अशी उसनवारी नको

    अशी उसनवारी नको जयकरांची पिंकी आणि रेडकरांचा वरुण एकमेकांना ओळखत होते दोन वर्षांपासून वरून होता विशीत आणि पिंकी असेल अठराची कॉलेज मधे त्यांची नेहमी गाठ पडायची एके दिवशी वरुणने तिला व्हिडिओ पाठवला सुंदर कवितेत प्रेमाचा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *