त्या दिवशी रविवार असल्यानं मी निवांतपणे सकाळी दहा वाजता पिशवी घेऊन किरकोळ किराणा सामान आणण्यासाठी निघालो होतो. सोसायटी समोरचा लहान रस्ता संपल्यावर मुख्य रस्त्यावर आलो. कांही पावलांच्या अंतरावर चौक होता, चौकात वाहतुकीचा सिग्नल होता. मी बाजूच्या फूटपाथ वरून चालत होतो. चौकात समोरून येणारी वाहनं पलीकडच्या बाजूला सिग्नल हिरवा होण्याची वाट पहात थांबली होती. दुभाजकाच्या बाजूला सर्वात पुढं एक चकचकीत कार उभी होती, नक्की कुठली ते कळत नव्हतं, पण कुठली तरी भारी गाडी असावी. गाडीचा रंग जरा वेगळाच होता, त्यामुळं गाडीकडं लक्ष जात होतं.
“मजा आहे बेट्याची” गाडीकडं बघत मी स्वतःशी पुटपुटलो. गाडीचा मालक कोण असेल हे मला माहित नव्हतं, पण त्या रंगीत काचे मागं कुणीतरी नशीबवान माणूस बसला आहे, एवढी कल्पना मी करू शकत होतो.
चौक मागं टाकून मी चालत होतो, तेव्हढ्यात थोड्या वेळापूर्वी सिग्नलवर दिसलेली ती भारी कार हळूच मागून आली आणि मी जिथं होतो त्याच्या पाच दहा पावलं पुढं जाऊन थांबली. वाहन चालवणाऱ्याच्या बाजूची रंगीत काच खाली सरकली आणि एक चेहरा बाहेर डोकावला. तो माझ्याकडं का बघतो आहे या बद्दल मी विचार करत असतानाच त्यानं डोळ्यावरचा चमकणारा गॉगल काढला आणि माझ्याकडे बघून हसला. एव्हाना मी कारच्या अगदी जवळ पोचलो होतो आणि तो चेहरा मी ओळखला.
“अरे नानू तू !” मी जवळ जवळ ओरडलोच.
“हो, मीच! एव्हढा वेळ लागला का ओळखायला?” नानू म्हणाला.
“अरे ही भारी गाडी, हा चमकणारा गॉगल! कसं ओळखणार तुला? आणि किती वर्षं झाली तुला भेटून!” मी म्हणालो.
“फार कांही नाही, तीन चार वर्षं झाली असतील.” नानू म्हणाला.
“तीन चार वर्षात काय जादू झाली? एकदम सगळं भारी झालंय !” मी म्हणालो.
“तू गाडीत बस, आपण कुठेतरी बसून चहा घेऊ. वेळ आहे नं तुला ?” नानू म्हणाला.
“किरकोळ सामान खरेदीला निघालो होतो, कांही घाई नाही. पण आपण माझ्या घरीच जाऊ या तुला वेळ असेल तर” मी म्हणालो.
“मी एका कंपनीच्या ऑफिसमध्ये जात होतो, तुला रस्त्यात पाहिलं म्हणून थांबलो. पंधरा वीस मिनिटं आहेत माझ्याकडं. आत्ता बाहेरच चहा घेऊ, नंतर केंव्हातरी सावकाशीनं भेटू या” नानू म्हणाला.
मी गाडीत बसलो. थोडं पुढं उडुपी हॉटेल होतं, नानूनं हॉटेलच्या समोर गाडी थांबवली. नानूची गाडी, गॉगल भपकेबाज दिसत होता पण नानूचं वागणं आणि बोलणं यात कांही फरक पडला नव्हता. कोपऱ्यातलं एक टेबल बघून आम्ही बसलो.
“आज इतक्या दिवसांनी इकडं कुठं ? आणि रविवारी असं काय तातडीचं काम काढलं आहेस ?” मी विचारलं.
” जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या एका कंपनीनं मला काम दिलं आहे, त्यांच्या क्रिएटिव्ह सेक्शनचा सल्लागार म्हणून त्यांनी माझी नेमणूक केली आहे. आज कंपनीच्या अध्यक्षांना भेटणार आहे, त्यांनीच इन्फॉर्मल मिटिंगसाठी बोलावलं आहे, तिकडे जायचंय” नानू म्हणाला.
“अरे, व्वा! अभिनंदन! मी म्हणालो. “पण काय रे, तू क्रिएटिव्ह माणूस कसा झालास? तुझ्या डिग्रीचा तर कांही संबंध नव्हता या क्षेत्राशी?” मी विचारलं.
“कॉलेजमध्ये मला अभ्यासात रुची नव्हती हे तर तुला माहिती आहेच, हजेरी लावायला येत होतो, पासापुरते मार्क मिळत होते. मला कॉम्पुटरचं वेड लागलं होतं. माझ्याकडे नव्हता, पण लोकांना त्यांच्या कॉम्पुटरवर काम करून देत असे. का कोण जाणे, पण कॉलेजमध्ये वर्गात बसल्यावर माझं डोकं बंद पडायचं, पण कॉम्पुटर वर काम करायला बसलं की डोकं भन्नाट चालायचं. लोकांना मदत करता करता वेगवेगळे प्रोग्रॅम्स आणि वेगवेगळी ऍप्स वापरण्यात तरबेज झालो.” नानू म्हणाला.
“मग ग्रॅज्युएट झाल्यावर कांही आर्टचा कोर्स वगैरे केलास का ?” मी विचारलं.
“नाही रे, कॉलेज संपल्यावर वडिलांना गळ घातली एक कॉम्पुटर आणि प्रिंटर घ्या म्हणून, त्यांनी घेतला. एका मित्राचा कॅमेरा पडून होता तो उसना मागुन आणला आणि डिजिटल फोटोग्राफी सुरु केली. काम मिळायला लागलं होतं पण तेव्हढ्यात कोरोना सुरु झाला.” नानू म्हणाला.
“मग फोटोग्राफी बंद झाली का तुझी ?” मी विचारलं.
“हो, कांही दिवस काम बंद होतं, पण मी नवीन काहीतरी शिकत राहिलो.” नानू म्हणाला.
“मग हे क्रिएटिव्हचं काम केंव्हा शिकलास ?” मी विचारलं.
“वेगळं असं शिकलो नाही, पण त्याची एक गंमत झाली. आपल्या कॉलेजमध्ये एक पाटील होता, त्याची आणि माझी चांगली मैत्री जुळली होती. त्याच लग्न ठरलं, सगळी तयारी झाली आणि कोरोना सुरु झाला. लग्नाला दोन्हीकडची फक्त वीस-वीस माणसं हजर होती. हनिमूनला सुद्धा जात आलं नाही बिचाऱ्याला. तो तर फार हौशी, पण त्याचा विरस झाला.” नानू म्हणाला.
“अरेरे, वाईट वाटलं असेल न त्याला” मी म्हणालो.
“वाईट वाटलं? अरे, तो इतका नर्व्हस झाला की मला त्याच्याकडे बघूनच कसं तरी व्हायचं” नानू म्हणाला.
“मग काय केलं त्यानं?” मी विचारलं.
“त्यानं नाही केलं, मीच शक्कल लढवली. त्याचे त्याच्या बायकोचे आणि नातेवाईकांचे कांही फोटो मागून घेतले. वेगवेगळी अँप्स, त्या इमेजेस वापरून, मागं वेगवेगळ्या बॅकग्राउंड्स टाकून कॉम्पुटरवर नव्या इमेजेस बनवल्या. लग्नात काढतात तसे कांही, रिसेप्शनमध्ये काढतात तसे कांही, अगदी काश्मीरच्या बॅकग्राऊंडवर त्यांचे फोटो टाकून हनिमूनला गेले असते तर त्यांनी जसे फोटो काढले असते, तसे कांही फोटो बनवले” नानू म्हणाला.
“मग, आवडले का त्याला? मी विचारलं.
“अरे, तो आणि त्याची बायको यांना तर गंमत वाटलीच, पण इतर नातेवाईकही ते फोटो बघून चर्चा करू लागले. ते जसजसे फोटो बघू लागले तस तसे त्यांना असा भास होऊ लागला की ते खरेच आहेत. मित्राचा मूड बदलत चाललाय हे बघून मला खूप आनंद झाला. पण खरी गंमत नंतर सुरु झाली. त्या वेळेला अनेक लोकांची ही परिस्थिति झाली होती. त्यांनाही असे कांही फोटो बनवून घेण्याची इच्छा झाली. असे खूप फोटो मी बनवून दिले.” नानू म्हणाला.
“अरे, पण हे सगळं बनावट, कुणी तक्रार केली तर किंवा गैरवापर केला तर ?” मी म्हणालो.
“असे बनवलेले फोटो ही क्रिएटिव्ह आर्ट आहे अशी एक छोटीशी, सहजा सहजी न दिसेल अशी खूण मी त्यात टाकून ठेवलेली असते. हा हौस आणि मनोरंजनाचा मामला आहे. एक जण माझ्याकडे आला आणि म्हणाला माझ्या वडिलांना सिनेमाचे वेड आहे आणि जुन्या काळातल्या दोन तीन हिरोंचे ते जबरदस्त फॅन आहेत. त्याला त्या हिरोंबरोबर त्याचे वडील आहेत असे फोटो करून हवे होते. मी दिले बनवून. तो खुश त्याचे वडीलही खुश! मी सांगितल्या पेक्षा जास्त पैसे देऊन गेला ! हौसेला मोल नसतं म्हणतात नं त्याची मला रोज प्रचिती येतेय!” नानू म्हणाला.
“या कंपनीत जॉईन होण्याचं कसं ठरलं?” मी विचारलं .
“त्याचीही अशीच गंमत आहे. मी ज्या कंपनीत चाललो आहे तिथं एक मित्र काम करतो तिथल्या स्टाफच्या वार्षिक पिकनिकचे फोटो बनवून दिले. कंपनीतील कांही सहकारी त्या समारंभाला येऊ शकले नव्हते पण फोटोत मी त्या सर्वांना समाविष्ट केलं होतं. मित्रानं ते फोटो कंपनीत दाखवले आणि त्यांना इतकी गंमत वाटली की त्यांच्या साहेबांनी मला इंटरव्ह्यूला बोलावलं आणि ऑफर दिली” नानू म्हणाला.
“पण ही एव्हढी भारी गाडी घेतलीस म्हणजे तुझं काम तर जोरात चाललं असेल नं ? मी विचारलं.
यावर विनू जोरात हसला. “आमच्या सोसायटीच्या जवळ एक कार दुरुस्तीचं गॅरेज आहे. गॅरेजच्या मालकाच्या मुलाचं अशाच प्रकारचं फोटोचं काम मी करून दिलं. ते पाहून तो म्हणाला “तू फोटोचं करतोस तसं मी गाडीचं का करू नये ?” माझे वडील त्यांची गाडी जुनी झाली म्हणून विकून टाकणार होते, गॅरेजवाल्याच्या मुलानं ती गाडी मला गॅरेजमध्ये आणून द्यायला सांगितलं. त्या जुन्या गाडीचं रंग-रूपच त्यानं बदलून टाकलं आणि अशी भारी गाडी बनवली. आता त्याच्याकडे जुन्या गाडीची “भारी इंपोर्टेड” गाडी करून घेण्यासाठी लोकांची रीघ लागलेली असते.” नानू म्हणाला.
पुस्तकी अभ्यासात रस नसलेला नानू किंवा त्याच्या माहितीतीला तो गॅरेजवाला त्यांच्या परीनं अडचणीच्या परिस्थितीतून कसा मार्ग काढत आहेत याचं मला आश्चर्य आणि कौतुक वाटत होतं.
आमचा चहा घेऊन झाला होता, वेटर बिल घेऊन आला, मी पैसे देऊ करत होतो तर नानूनं मला रोखलं आणि बिल आणि टिप वेटरच्या हातावर ठेवली.
“चल आता निघायला हवं, पटकन तुझी खरेदी कर, जाता जाता तुला घराजवळ सोडतो” नानू म्हणाला.
नानूच्या गाडीत बसलो असताना मनात विचार आला, भूमितीमध्ये सरळ रेषा हे दोन बिंदूंच्या मधील कमीत कमी अंतर असते, पण आयुष्याच्या वाटचालीत, सुरवात आणि यश या दोन बिंदूंच्या मधला मार्ग नाकासमोर बघून चालणाऱ्यांपेक्षा अडी-अडचणींची वळणं आणि नव्या कल्पनांची कुरणं पार करत मार्गक्रमण करणारे अग्रणी असू शकतात.
“आता कोविड तर गेला, मग आता तशी कामं असणार का ?” मी विचारलं.
“कोविड हे निमित्त होतं, त्याच्यामुळं या कामाची सुरवात झाली, पण या मागचं तत्व वेगळंच आहे. अस्सल आणि अव्वल यांना महत्व आहे, पण किती लोकांना ती परवडतात? ती परवडण्यासाठी लागणारी क्षमता थोड्या लोकांकडं असते, परंतु हौस ही एक अशी बाब आहे की जी सर्वांना असते, आणि जो पर्यंत हौस आहे तो पर्यंत बनावटचा वट आहे” नानू म्हणाला.
एव्हाना आम्ही माझ्या घराजवळच्या चौका पर्यंत आलो होतो. नानूनं गाडी थांबवली, उतरताना मी म्हणालो “जरा लवकर लवकर भेटत जा, नाही तर इतका बदलशील की तुला ओळखणं ही अवघड होईल”.
“त्याची काळजी नको, वरवरचं बनावट असलं तरी मूळ बनावट तीच राहते” बनावट वर हलकासा श्लेष करून नानू निघून गेला.
-सुरेश गोपाळ भागवत (१६/१/२०२४).