इस्पितळातील खोली, प्राध्यापक देखणे कॉटवर झोपलेले आहेत. बाजूच्या दरवाज्यातून अट्टेण्डण्ट नर्स मुलगी आत येते. तिच्या हातात ट्रे आहे, त्यात कांही औषधं, मोसंब्याचा रस असलेला ग्लास आहे.

नर्स: सर, आता तुम्हाला औषधं  घ्यायची आहेत, त्या बरोबर थोडा मोसंब्याचा रस देखील घ्या. सकाळी आणला होता तर नको म्हणालात.

प्रा.: आता देखील नकोच आहे, आणि औषधं  देखील नकोत. औषधं  घ्यायचं बंद करायचं ठरवलं आहे मी आता.

नर्स: असं नका करू सर! तुम्हाला बरं  वाटायला हवं की नाही? औषधं  तर घ्यायलाच हवीत त्या बरोबरच पोटात काही  अन्न जायला हवं. काल  रात्री देखील नंतर जेवीन म्हणून ट्रे टेबलावर ठेवायला सांगितलं, आणि नंतर जेवलाच नाहीत!

प्रा. तेच तर सांगतोय मी.  आता अन्न, औषधं  यांची कांही गरज उरलेली नाही. आता फक्त एकच करायचंय, ते म्हणजे वाट बघणं!

नर्स: कोणाची वाट बघताय? गेले दोन दिवस तर भेटायला आलेल्यांनाही बाहेरच्या बाहेरच परत पाठवलं तुमच्या सांगण्यावरून. किती नाराज दिसत होते बिचारे!

प्रा. आता वाट बघायची ती एकाचीच, ज्याला भेटायला सगळे भितात त्याची, कारण आता माझ्या मनाची तयारी झाली आहे.

नर्स: सर, तुम्ही असं  बोललात की  मलाच भीती वाटायला लागते, मी येते पाच मिनिटांनी परत. तेंव्हा मात्र तुम्हाला औषधं आणि रस घ्यावेच लागतील.

 (ट्रे  टेबल वर ठेऊन. खोलीच्या बाहेर जाते.)

कांही सेकंदांमधे  परत दारात येते, तिथूनच बोलते.)

नर्स: सर! एक व्हिजीटर आले आहेत भेटायला, पाठवू का आत?

प्रा: नाही म्हणून सांग त्यांना. आय  अँम सॉरी, पण आता त्याला कांही इलाज नाहीये.

नर्स मागे वळते आणि पलीकडे जाते.

नर्स पुन्हा दारात येऊन बोलते.

नर्स: सर, मी त्यांना नाही म्हणाले, पण ते म्हणाले की  सर झोपले असले तरी मी नुसतं त्यांचं दर्शन घेईन.

प्रा. काय नाव सांगितलं त्यांनी?

नर्स: समीर आला आहे असं  सांगा म्हणाले.

प्रा.: कसा  आहे? उंच, शिडशिडीत?

नर्स: हो, कांहीसे तसेच आहेत.

प्रा: पाठव त्याला आत.

 नर्स जाते, दरवाज्यातून समीर आत येतो. उंच, शिडशिडीत पण भक्कम वाटणारा.

प्रा: ये, समीर ये!

समीर आत येतो, कॉटच्या बाजूलाच उभा राहून वाकून नमस्कार करतो.

प्रा: अरे, नमस्कार कशाला करायला हवा!

समीर : सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे आई, वडील, देव आणि गुरु यांच्या खेरीज कुणालाही वाकून नमस्कार करत नाही. तुम्हीच गुरु आहात  म्हणून करावासा वाटतो, आणि हो, मला आत येऊ दिल्या बद्धल मी आपला  अत्यंत आभारी आहे.

प्रा: अरे, आभार  कसले त्यात, तुला पाहून मलाही छान वाटलं. केंव्हा आलास भारतात?

समीर: काल आलो, घरी पोचे पर्यंत मध्यरात्र झाली होती.

प्रा: अरे, इतका धावत का आलास? जरा विश्रांती घ्यायची.

समीर: या वेळेला भारतात येण्याचं कारणच तुम्हाला भेटणं हे आहे, मग उशीर का करायचा? मित्रांना फोन केले तर त्यांनी सांगितलं की अशक्त पणाच्या सबबीमुळं  तुम्ही कोणालाही भेटत नाही आहात, मला भेटू दिलंत  म्हणून आभार मानले.

प्रा: गेले दोनतीन दिवस कोणाला भेटलो नाही हे खरं  आहे, सगळ्यांना भेटून झालं  आहे. तू मात्र दूर असल्यामुळं भेटला नव्हतास. पण त्याही पेक्षा, तुझी गोष्ट फारच वेगळी आहे. तुझ्याशी बोलायचं म्हणजे, सोनार सोनं  घासून त्याचा कस  बघतात ना तसं असतं, अर्ग्युमेंट  मधे  दम  नसेल तर तुझ्यापुढं ते टिकत नाही. त्याच बरोबर  तुझं संशोधन कसं चाललं  आहे याचंही  मला कुतुहूल असतं.

समीर: सर, बोलता बोलता पुन्हा तुम्ही मला मी दगड आहे त्याच आठवण करून दिलीत, (मोठ्यानं हसतो), पण ते खरंच आहे, इतर लोक मला निव्वळ दगड समजायचे, तुम्ही मात्र मला सोनाराच्या दगडापर्यंत बढती  दिली.

प्रा: तसं नव्हतं म्हणायचं मला, तुझ्याशी वाद घालायचा म्हणजे दुसऱ्या माणसाचा कस लागतो असं मला म्हणायचंय.

समीर: ही सारी तुमची किमया आहे सर, या दगडावर तुम्ही एवढी मेहनत घेतली आहे ती त्या दगडात आता लोकांना मूर्ती दिसू लागली आहे. सारं श्रेय तुमचं आहे.  सर, मला थं आल्यावर समजलं  की  तुम्ही  अन्न  आणि औषधं घेण्याचं ठरवलंय, खरं आहे का ते?

प्रा: मला आता पूर्णपणे निष्क्रिय व्हायचंय, सगळ्या गोष्टींमधून अंग काढून घ्यायचंय, अन्न  आणि औषधं एवढाच  दुवा या जगाशी जोडत असेल तर तो ही आता तोडायला  हवा.

समीर: पण असं का म्हणून करायचं?

प्रा:  आपल्या कायद्यात जश्या  प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं जगता यावं यासाठी तरतुदी आहेत सं एखाद्याला सन्मानानं जगाचा निरोप घेता यावा यासाठी निष्क्रिय इच्छामरणाला देखील  परवानगी आहे. मला जे काही करायचं होतं  ते करून झालेलं  आहे, आता करण्यासारखं कांही राहिलं  नाही आणि माझ्याच्यानं आणखी कांही होणार पण नाही, मग कशाला नुसतं  मरणाची वाट बघत पडून राहायचं? आपण दोन  पावलं पुढं टाकून त्याला भेटण्यात गैर काय आहे?

समीर: सर, यात गैर काय आहे हा प्रश्न नाही, आत्तापर्यंत  तुम्ही हा निकष लावत नव्हता, कायदा आणि नैतिकता यांच्या पुढं जाऊन तुम्ही स्वतःचे नियम स्वतःसाठी केले होते आणि कसोशीनं पाळले होते, मग आता एखादी गोष्ट गैर नाही म्हणून करायची हे स्वतःचे अवमूल्यन काय म्हणून?  सर, प्रश्न म्हणून नव्हे तर शंका म्हणून एक विचारू का?

प्रा: हो विचार की!

समीर: सर, तुम्हाला अहंकार तर बिलकुल नाहीच, पण आपल्या अस्तित्वाशी एक थोडासा इगो जडलेला असतो त्याचा तर प्रॉब्लेम नाही नं?

प्रा: आपल्याला अस्तित्व आहे तो पर्यंत त्याची जाणीव राहणारच, आणि तेव्हढा  इगो अपरिहार्य आहे, त्याचा कांही प्रश्न आहे सं मला तरी वाटत नाही. फक्त एवढं वाटतं की आपला भार  दुसरया कोणावर पडू नये.         

समीर: सर, एखाद्या बंदिस्त जागेतले कण  सतत हलत असतात असं आपण म्हणतो.

प्रा: तू  ब्राउनीयन मुव्हमेंट बद्दल बोलतो आहेस का?

समीर: हो सर. ते कण  आपल्या परिस्थितीत एका जागी स्थिर राहूच शकत नाहीत, त्यांची हालचाल होणार हा निसर्गाचा नियमच आहे. अशा वेळी एखाद्या कणाचा दुसऱ्या कणाला धक्का लागला तर त्यानं काय सॉरी म्हणायचं ? की दुसरयाला  धक्का लागू नये म्हणून अंग चोरायचं? असं कांही होऊच शकत नाही. एकाचा  धक्का दुसऱ्याला लागणार हे अटळ आहे, आणि त्यांना ते मान्य करावंच लागेल. आपण काय वेगळे आहोत? आपणही कणांची,  अणु रेणुंची प्रचंड संरचना आहोत. एका संरचनेचा भार केंव्हातरी दुसरया संरचनेवर पडणार यात अनैसर्गिक असं काय आहे

प्रा. म्हणजे एक रेणूंची संरचना एवढाच आपल्या अस्तित्वाचा अर्थ आहे का?

समीर: अस्तित्वाचा अर्थ काय याच उत्तर मी तुम्हाला देण्या इतकं मला ज्ञान नाही, पण अस्तित्वच महत्व काय हे मी तुम्हाला निश्चित सांगू शकतो. सर, बोलणारा, चालणारा  दगडाचा देव जर इतक्या लोकांना एकत्र बांधून ठेवतो, जगण्यासाठी उत्साह देतो तर तुम्ही तर चालते बोलते देव आहात  आमच्यासाठी!

प्रा. परंतु माझी वेळ आता संपत आली आहे असं मला वाटतं.

समीर: आम्हा सर्वांना तुम्ही वाढ दिवसाच्या शुभेच्छा देताना जीवेत  शरद:  शतं  असं  म्हणता, मग ते तुम्हाला लागू नाही का

प्रा: त्यात पुढं  असं  अभिप्रेत  आहे की  सर्व अवयव देखील कार्यक्षम असतील, माझं  आता तसं  राहिलेलं नाही

समीर: सगळ्या अवयवांनी काम केलच पाहिजे असं  थोडंच  आहे? स्टीफन  हॉकिंगची फक्त बुबुळं  हालत होती, तरीही त्यांनी जगण्याची इच्छा सोडली नव्हती.  प्रत्येक व्यक्ती हे एक कॉम्बिनेशन आहे, अगदी युनिक, त्याची परिस्थितीही युनिक! तो विधाता जिथं कुठं  आहे तिथून पाहतो आहे की  कोणतं रेणवीय कॉम्बिनेशन आणि परिस्थिती ही कुठं पर्यंत मजल मारतेआपण कोण आहोत ते मधेच थांबवणारे?

प्रा: बऱ्याच वेळेला एखादी गोष्ट सोपी करण्याच्या नादात आपण त्यातला गाभा गमावून बसतो, मनुष्य प्राण्याला रेणूंची संरचना म्हणणं म्हणजे तसं  केल्या सारखं होईल.

समीर: मान्य आहे सर, आपल्या अस्तित्वातील चेतना हा भाग आपण सध्यापुरता बाजूला ठेवू कारण त्याला विज्ञानाच्या कक्षेत बसवायचं की दैवी म्हणायचं याचं  देखील उत्तर आपल्याकडं नाही. आपण त्यापासून पळून जात नाही आहोत, तात्पुरता बाजूला ठेवतो आहोत किंवा कोणत्याही एका बाजूनं  गृहीत धरतो आहोत असं म्हटलं तरी चालेल. परीक्षेत नाही का आपण अवघड प्रश्न शेवटी सोडवायला ठेवतो! (हसतो)

प्रा: हं!

समीर: माझं पीएचडीचं संशोधन सुरु असतानाच मला  एका गोष्टीची कल्पना आली  की एखादी गोष्ट होणार  किंवा नाही हे आपल्या हातात नसतं, ते आपल्या मनावर नसतं, ती  एक त्यावेळेची आणि त्या माणसांची मिळून विशिष्ट शक्यता बनते. मी कोणतीही शक्यता सत्यात उतरविण्याच्या पक्षात काम करत आलो आहे, आणि तुम्हाला ते खरं  वाटो अगर वाटो हे मी तुमच्या कडूनच शिकलो आहे. शक्यतेला  देखील एका संधीची गरज असते, ती तुम्ही देत गेलात, आम्हीही तेच शिकलो.                    

प्रा: पण मला तर सं  कांही शिकवल्याचं आठवत नाही.

समीर: एकझॅक्टली  सर! हे सगळं आम्ही तुमच्या सहवासानं  शिकलो.  सर, माझे मित्र मला चेष्टेनं जेम्स बॉण्ड म्हणायचे.

प्रा: ते कशासाठी?

समीर: अशासाठी की  मी कोणत्याही असाइनमेंटला कधी नाही म्हणत नाही आणि ती पूर्ण करण्यासाठी मी काय आवश्यक असेल ते करतो, अगदी वाट्टेल ते करतोधावाधाव करतोउपाशी राहतो, जागरणं करतो, काम पूर्ण होईपर्यंत मला दुसरं कांही सुचतंच नाही. मला लोकांनी खूप समजविण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या असं लक्ष्यात आलं की  इतर लोक जो चोखाळताहेत तो मार्ग माझा नाही. त्यांच्या सारखं वागून मला सुख मिळण्याऐवजी मानसिक त्रास होऊ लागला. आय वेन्ट बॅक टू माय  अर्लीयर वेज. सर, निसर्गानं  प्रत्येकाला वेगळं बनवलं आहे असं आपण म्हणतो, पण सर्वांनी सारखं वागलं पाहिजे अशी अपेक्षा करतो. आय डोन्ट ऍग्री विथ  दॅट! निसर्गानं  मला जसं बनवलं  आहे तसं  राहूनच मला मार्ग सापडणार आहे, आणि ते आवश्यक आहे कारण अज्ञात असलेल्या विश्वात पाऊल  टाकायचं ते एकट्यालाच टाकायचं असतं, ते ज्ञात झाल्यानंतरच इतर लोक तुमच्या पर्यंत पोचतात.

प्रा: लोक याला हट्टीपणा म्हणतात.

समीर: खरं  आहे, मी त्याला सक्रिय ध्येयवाद म्हणतो आणि मुख्य म्हणजे माझ्या या सक्रिय ध्येयवादाचं बीज तुम्हीच रुजवलेलं आहे. तुमच्या परिस्थितीत ज्या गुणधर्माला आत्यंतिक कार्यनिष्ठा  असं म्हणता आलं असतं होता तो माझ्या परिस्थितीत सक्रिय ध्येयवाद बनून पुढं आला.  

समीर: सर, तुम्हाला मी आणि माझ्या अनेक मित्रांनी गुरु मानलं आहे.

प्रा: अरे, मी तुम्हाला केवळ विज्ञान विषय शिकवला, मी केवळ एक शिक्षक आहे.

समीर: शिक्षक, अध्यापक, कोच, ट्रेनर वगैरे तात्पुरते असतात, त्या विषया पुरते आणि ठराविक वेळे पुरते, माझ्या दृष्टीनं गुरु म्हणजे आपली बुद्धी जिथं  चालत नाही तिथं  आपल्या वतीनं विचार करून योग्य सल्ला देणारा, त्याला विषयाचं  बंधन नाही आणि वेळेचंही बंधन नाही. तुम्ही आमहाला वर्गात शिकवलं त्यापेक्षा किती तरी जास्त शिक्षण आणि मार्गदर्शन वर्गाच्या बाहेर केलं. मी परदेशात असताना देखील स्वतःशी असा बोलत असे की  अमुक अमुक प्रश्नावर सरांनी कसा विचार केला असता, आणि एकलव्याला द्रोणाचार्यांच्या मातीच्या पुतळ्यानं मार्गदर्शन   केलं  सं  तुम्ही माझ्या मनात राहून केलं.

प्रा: अरे मी वेगळं असं  काय केलं? एक गोष्ट मात्र खरी की एखाद्या विद्यार्थ्या समोर असलेली समस्या मी माझी समस्या समजून त्यावर विचार करत असे, आणि शिक्षा करण्यावर माझा फारसा विश्वास नव्हता. मुलं शाळाकॉलेज मधे  शिक्षणासाठी येतात शिक्षा भोगायला नव्हे हे मी सतत लक्ष्यात ठेवत असे.

समीर: आठवतंय सर मलाएका जुनियर लेक्चररशी वाद घातल्यावर त्यांनी  मला शिक्षा करण्यासाठी तुमच्याकडं आणलं होतं. तुम्ही मला दिवसभर तुमच्या ऑफिस मधे बाजूच्या एका खुर्चीवर बसवून ठेवलं, भेटायला आलेल्या इतरांबरोबर  मला ही  चहा  दिलात. एका शब्दानं रागावला नाहीत की  कांही नाही, मला सोडून देताना फक्त एवढं म्हणाला होतात की  “आय  होप अवर  नेक्स्ट मीटिंग विल  बी फॉर    बेटर रिझन“. शाळेत असताना मी खूप शिक्षा भोगल्या, मार देखील खाल्ला, पण त्यानं कांही फरक पडला नाही. तुम्ही  केलेल्या शिक्षेनं मात्र माझ्या  मेंदूला विचार करायला लावला. तिथूनच माझ्या आयुष्यानं  वेगळं  वळण घेतलं. आणि ही कहाणी माझी एकट्याची नाही, तुमच्या हाताखालून गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर तुमच्या सद्विचारांची छाप पडलेली आहे. विज्ञानाचा विषय हे फक्त तुमची  आणि विद्यर्थ्यांची गाठ पडण्याचं निमित्त होतं  सर!         

 प्रा: पण तो आता इतिहास झाला, आता मी तुम्हाला विषयाचं  काय किंवा इतर काय कोणतंही मार्गदर्शन करू शकणार नाही. नुसतं एका जागी  वेदना सहन करत पडून रहाणं याला माझ्या दृष्टीनं कांही अर्थ नाही. का सहन करायच्या या वेदना?

समीर: मला तुमच्या या प्रश्नाचं आश्चर्य वाटतं आहे सर! तुमच्या सारख्या स्वभावाच्या आणि बुद्धिमत्तेच्या व्यक्तीनं  आमच्या सारख्या विद्यार्थ्यांबरोबर वर्षामागून वर्षे काढताना किती वेदना सहन केल्या असतील? स्वतःची वैयक्तिक प्रगती, महत्वाकांक्षा बाजूला ठेवून, हे इतरांच्या दृष्टीनं सामान्य सं काम करताना तुम्हाला किती मानसिक त्रास झाला असेल याची मी आता कल्पना करू शकतो. मला माहिती आहे तुम्ही ते मान्य करणार नाही, पण मी तुम्हाला वेदना झाल्या का हे विचारणारही नाही कारण मला त्याबद्दल खात्री आहे. मी फक्त एवढं विचारीन की त्या वेदनांपेक्षा या वेदना फार जास्त आहेत का?

प्रा: काम करताना आलेल्या अनुभवांना मी वेदना म्हणणार नाही, मला काम करताना जे समाधान मिळत होतं त्याचं मोल होतं ते, आणि मुख्य म्हणजे तेंव्हा डोळ्या समोर ध्येय होतं, आता ते राहिलेलं नाही.

समीर: सर, मी जे काय पाहिलं आणि अनुभवलं त्यात माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे ती म्हणजे आईबाप अपत्यांचं, आजोबाआजी नातवंडांचं कौतुक करतात आणि पुढच्या पिढ्या आधीच्या पिढ्यांचा आदर करतात. याचं एक कारण म्हणजे कांही मूल्यं म्हणजेच  कौटुंबिकसामाजिक ध्येयं  ही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिली जातात, तो  त्यांच्यातील संबंधांचा महत्वाचा धागा असतो.   विद्यार्थीशिक्षक यांच्यात काय वेगळं असतं. तुमच्या ध्येयातून आमच्या महत्वाकांक्षा फुलल्या, मग आमची ध्येयं  तुमची होऊ शकत नाहीत का? आणि  शारीरिक वेदनांसाठी वेदनाशामक औषधं  आहेतच की.                .   

प्रा: औषधं का घ्यायची? केवळ आहेत म्हणून? त्याला कांही अर्थ उरत नाही.

समीर: सर, तुमच्या प्रश्नातच तर उत्तर आहेएव्हरेस्ट प्रथम चढून गेलेल्या सर एडमंड हिलरी यांना कोणीतरी विचारलं होतं की तुम्ही एव्हरेस्ट का चढलात? यावर ते म्हणाले  होते, ”बिकॉज इट इज देअर!” तुम्ही औषधं  घ्यावी याचं कारणही  तेच आहे, बिकॉज दे  आर देअर! सर, औषधं नसती तर कांही प्रश्नच नव्हता, पण ती असताना घेणं निश्चितच योग्य वाटत नाही

प्रा.:  सर एडमंड हिलरी यांची गोष्ट वेगळी होती, मी एक सामान्य माणूस आहे.

समीर: सर, तुम्हाला तसं वाटत असलं तरी आमच्यासाठी तुम्ही असामान्य आहात. बाय    वे, तुम्ही सामान्य  म्हणालात त्यावरून आठवण झाली,  सर, सामान्य माणूस हा आपलं  जग चालतं त्याचा कणा  आहे, दुर्दैवानं  सामान्य माणसाला सर्व गोष्टी समजावून घ्याव्या इतकं ज्ञान नसतं आणि तेवढा वेळ देखील नसतो. नेमका याचाच फायदा घेतात स्वतःला सामान्यांपेक्षा मोठा समजणारे. सर, मी कधी राजकारणात रस घेतला नाही, पण मला हा प्रश्न पडतो की रशिया आणि अमेरिका  यांच्या धोरणांमागचं तत्वज्ञान जर एकमेकाच्या विरुद्ध आहे तर दोघंही  फक्त आपणच मानव जातीचं कल्याण करू शकतो असा दावा कसा करू शकतात? आणि ते देखील एका शतका पेक्षा जास्त काळ!

प्रा: त्यांची भिन्न तत्वज्ञानं विशिष्ट काळ, जागा  आणि परिस्थिती यांच्या साठी योग्य होती.

समीर: एक्झॅक्टली, सर! ती तत्वज्ञानं मांडली  गेली तेंव्हा जग लहान लहान तुकड्यांमधे विभागलेलं होतं. अंतर, समुद्र, पर्वत, दळण वळणाचा अभाव, सीमित माहिती आणि संपर्काची साधनं  या साऱ्या अडथळ्यामुळं कांही किलोमीटर्स वर काय चाललंय हे समजत नव्हतं. आता तसं राहिलेलं नाही, जग खरंच लहान झालय, एका ठिकाणी झालेली घटना दुसऱ्या ठिकाणी क्षणात माहिती होते, कांही  मिनिटात मदत पोहोचविता येते आणि कांही तासांमधे आपण हवं तिथं पोचू शकतो.

प्रा: हे सगळं झाल्यानं माजाचे प्रश्न सुटले असं  म्हणता येईल का?

समीर : निश्चितच नाही. त्याला कारण आहे, ते म्हणजे या सर्व गोष्टींवर असलेला काही लोकांचा पगडा. लोकांपर्यंत माहिती पोचत नाही, पोचतो तो प्रोपोगंडा. इतकं ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आजूबाजूला असूनही सामान्य माणूस त्यापासून सूज्ञ होत नाहीये तर तो प्रोपोगंड्यामुळं गोंधळून जातो आहे.

प्रा: यात नवीन असं कांहीच नाही, कांही लोक इतर लोकांवर वरचष्मा गाजवणार हे नेहमीच होत आलं आहे.

समीर: आता परिस्थिती वेगळी आहे. दोन गोष्टी झाल्या आहेत, एक म्हणजे जग लहान झालंय, जोडलं  गेलंय आणि दुसरं  म्हणजे वातावरणातील बदला मुळं सगळे एकाच रांगेत बसणार आहेत. पूर्वी दोज हू  हॅव आणि दोज  हू हॅव नॉट असे वेगळे थर देशा देशांमधे  होते. वातावरण बदलामुळं सर्वांनाच हॅव नॉट प्रकारात जावं लागणार आहे. जग हे एका अर्थानं लेवल फील्ड होणार आहे.

प्रा: पण हे सगळे आडाखे आहेत, अचूक विज्ञान नाही.

समीर: तेच म्हणायचंय मला! लोकांपर्यंत अचूक विज्ञान पोचायचं असेल तर त्यांच्या प्रत्त्येक समस्येचा एक सोपा प्रश्न  आणि त्याचं  एक सोपं उत्तर असं व्हायला हवं. गेले कांही महिने मी या विषयावरच  काम करतो आहे.

प्रा: म्हणजे तू  आधीच विषय सोडून आता या विषयात संशोधन करतो आहेस की काय?

समीर: तेच तर मला तुम्हाला सांगायचं आहे. आमची पूर्ण टीम सध्या अशा विषयावर काम करते आहे की प्रत्येकाला हवं त्या क्षणी वैज्ञानिक माहिती मिळेल आणि ती देखील अत्यंत सोप्या पद्धतीनं. तशा अनेक साईट्स आहेत, पण आमचं लक्ष्य आहे ते म्हणजे निर्णायक घटना, निर्णय घेणाऱ्या व्यक्ती आणि त्यांचे निर्णय.

प्रा: हे जरा विस्तृत करून सांगशील का?

समीर: सांगतो नं! आपण म्हणतो अमुक घटने मुळं इतिहासाला कलाटणी  मिळाली, खरं  तर हे  छोट्या प्रमाणावर सतत  घडत असतं, मोठ्या घटनांची चर्चा होते  इतकंच. त्या क्षणी खरी माहिती  उपलब्ध असेल तर खूप फरक पडेल. अश्वत्थामा कोणता मेला यातलं सत्य द्रोणाचार्यांना समजलं असतं तर युद्धाचा इतिहास बदलला असता.

प्रा: पटतंय तू म्हणतोस ते, पण यातलं काय काय शक्य आहे?

समीर: सर, संगणक आणि माहिती तंत्रज्ञानात आता अशी प्रगती झाली आहे की, जगातल्या बहुतेक व्यक्तींची, घटनांची माहिती आपण संगणकावर मिळवू शकतो. तुम्हाला हॉस्पिटलमधे दाखल केलं आहे हे मला माझ्या पद्धतीनं संगणकावर शोधता आलं, मला हे कोणीही कळवलेलं नाही. ज्या ज्या घटनांमधे इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर होतो त्यातली माहिती कोणाच्याही परवानगी शिवाय आणि नकळत मिळवता येते. त्या माहितीचं संस्करण करून त्यातून बोध काढण्याचं प्रशिक्षण आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे आमच्या संगणकांना देतो आहे. आम्हाला आतापर्यंत जे त्यातून साध्य  करता लं ते खरोखरच अचंबित करणारं आहे, कांही गोष्टी तर विश्वास बसण्या सारख्या आहेत.

प्रा: म्हणजे नक्की काय?

समीर: मी आधी म्हटल्या प्रमाणं जिथं जिथं इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर होतो तिथली माहिती मिळविता येते, परंतु आम्ही एक प्रयोग असा  केला की जिथं माहितीचा कांही स्रोत नाही त्याबाबत काय? आश्चर्य म्हणजे आमच्या संगणकानं  एका विशिष्ट ठिकाणी कांहीतरी घडतं आहे सं भाकीत केलं आणि नंतर असं समजलं की एका युनिव्हर्सिटीमधे संपूर्णपणे इन हाऊस अशी  संगणकावर आधारित  गुप्त यंत्रणा तयार करण्यावर संशोधन सुरु आहे, त्याचा इंटरनेटवर किंवा मीडिया वर  कुठेही उल्लेख नाही. आमच्या संगणकानं  त्या भागातील इतर माहितीच्या आधारे हा अंदाज केला आणि तो खरा ठरला.

प्रा: हे म्हणजे ब्लॅक होल दिसता  त्याचा शोध लावण्या सारखं आहे!

समीर: एक्झॅक्टली! आमचे संशोधन सं  असणार आहे की कोणती माहिती सत्य आहे आणि कोणती असत्य ते लोकांना समजेल, एखादी गोष्ट जाहिरात आहे की प्रोपोगंडा  आहे  याचा खुलासा लोकांना होईल, म्हणजे एव्हरी वन विल  बी  ऑन    राईट फुटींग एव्हरी मिनिट.

प्रा: हे सगळं  खरंच एक्सायटिंग आहे.

समीर: तेच तर मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे. माझ्या संशोधनातून जे रिझल्ट्स मिळणार आहेत ते बघायला तुम्ही असायलाच हवं. माझ्या दृष्टीनं  ते रिझल्ट्स मिळविण्या इतकंच ते तुम्ही पाहणं  आवश्यक आहे. विदाउट यू  अराउंड, आय विल बी रोबो वर्किंग इन लॅब.  सर, मी याच आशेनं  आलो आहे की तुमचं असणं किती महत्वाचं  आहे, माझ्यासाठी आणि तुम्हाला ओळखणाऱ्या सर्वांसाठी सुद्धा, हे तुम्हाला सांगावं. मला असं वाटतं  की  तुम्ही तुमचा निर्णय बदलून आताच्या आता औषधं  आणि अन्न  घ्यायला सुरवात करावी.

प्रा: समीर, मला जरा अडचणीत टाकलं  आहेस तू. मी मोठ्या मुश्किलीनं सर्वातून अंग काढून घेतलं  होतं, माझी खात्री होती की  माझा आता कांही  उपयोग राहिलेला नाही, पण तू जे काय बोलतो आहेस त्यावरून माझ्या मनात माझा निर्णय पूर्णपणे बरोबर आहे की  नाही या बाबत संभ्रम  निर्माण झाला आहे. माझ्या मनाला अजून खात्री पटत नाही की मी माझा निर्णय बदलावा.

समीर: तुम्ही थोडा आमच्या दृष्टिकोनातून विचार केलात तर तुमचा निर्णय बदलावा सं वाटेल तुम्हाला. ते एका क्षणात देखील होऊ शकतं. आपण म्हणतो नं सर, अमक्या अमक्याला एकदम ज्ञान झालं, माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे.

प्रा: माझा विश्वास आहे की  नाही ते सांगता येत नाही पण माझी तशी श्रद्धा आहे.

समीर: मी जरा जास्तच शंकेखोर आहे नं  त्यामुळे आधी माझा विश्वास नव्हता, पण अनुभवानं माझ्या लक्ष्यात आलं की, तसं  होणं शक्य आहे. आपल्या मेंदूतील न्यूरॉन्स माहिती साठवतात, सं त्या दुसऱ्या न्यूरॉन्स बरोबर हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करत असतात. जेंव्हा विशिष्ट न्यूरॉन्सचा एकमेकांशी संपर्क होतो तेंव्हा त्यांच्यातील माहिती एकत्र होते आणि त्यातुन ज्ञान निर्माण होतं.

प्रा: शक्य आहे.

समीर: म्हणूनच गेली कांही मिनिटं  मी तुमच्या विशिष्ट न्यूरॉन्सना आवाहन करतो आहे की  प्लीज एकमेकांशी हातमिळवणी करा आणि सरांच्या मनात निर्णय बदलण्याचा विचार येऊ द्या.

प्रा: मी तुला नाउमेद करू इच्छित नाही पण मोठ्या मुश्किलीनं घेतलेले निर्णय असे मिनिटात बदलता येतात का?  समीर: सर, मी आता जे कांही बोलणार आहे ते म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्या सारखं  होणार आहे, पण ते केल्या शिवाय मला गत्यंतर नाही.

प्रा: मी आता सगळ्याच्या पलीकडे गेलो असल्यानं, मला त्यात कांहीही वावगं वाटणार नाही.

समीर: मग ठीक आहे. आपण म्हणतो  अर्जुन त्याच्या भावनांपुढे हतबल झाला होता तेंव्हा श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली आणि अर्जुनाचा विचार बदलला. मी असं  वाचलं आहे की गीता सांगण्यासाठी श्रीकृष्णाला ४५ मिनिटं  लागली. मी असं  म्हणेन की अर्जुनाला सगळी  माहिती तर होतीच, श्रीकृष्णाचं बोलणं ऐकल्या नंतर त्या सर्व माहितीचं  ज्ञानात रूपांतर झालं, सगळ्या न्यूरॉन्स एकत्रित झाल्या आणि अर्जुनानं निर्णय बदलला. तसं असेल तर माझ्या प्रयत्नांना यश का येऊ नये? त्यांच्यात आणि आपल्यात फरक एवढाच आहे की तिथं श्रीकृष्ण बोलत होता थं अर्जुन बोलतोय.

प्रा: तुझ्या बोलण्यानं माझा निर्णय हा मला वाटलं तितका योग्य आहे का? असा प्रश्न मनात डोकावतो आहे.     समीर: सर, तुमच्या निर्णयाला योग्य किंवा अयोग्य म्हणण्याचा अधिकार मला नाही, परंतु या निर्णयाची आवश्यकता नाही सं मी म्हणू शकतो. जे होणारच आहे त्यात आपल्या निर्णयाची गरज नाही, नाही का? तुम्ही वय झाल्यामुळं  होणाऱ्या गैरसोयीला कंटाळला असाल तर मी हे तुम्हाला छातीठोक पणे  सांगतो की  तुमची सुश्रुषा करायला सगळे आनंदानं तयार आहेत.

(नर्स पुन्हा येते)

नर्ससर घेताय नं औषध?

समीर: सिस्टर, मला वाटतं सरांनी आधी थोडा रस  घ्यावा, नाही का? औषध थोड्या  वेळानं घेतलं तरी  चालू शकेल.

(नर्स प्रश्नार्थक मुद्रेनं प्राध्यापकांकडं आणि समीरकडं आलटून पालटून पहाते)

नर्स: ते ही योग्य आहे.

प्रा: सिस्टर, द्या तो रसाचा ग्लास इकडं.

नर्स: (आनंदानं) व्हेरी नाईस! मला वाटतं  मिस्टर समीर इतक्या दुरून आले आणि त्यांनी तुम्हाला समजावलं, तेंव्हा सरांना रस  देण्याचा मान मिस्टर समीर यांना मिळायला हवा.

ग्लास समीरच्या हातात देते, समीर प्राध्यापकांच्या तोंडाला रसाचा ग्लास लावतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.